मुंबई : राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या (Maharashtra State Board) निकालाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय असून बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे सीबीएसई प्रमाणेचं हा फॉर्म्युला असणार आहे. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के या सूत्रानुसार विभागणी करण्यात आली आहे.
सीबीएसई (CBSE) मंडळाप्रमाणे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या 30:30:40 या सूत्रावर आधारित असणार आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) व इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) असे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे, शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
निकाल तयार करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाकडून निकलासाठी मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्यासह कमाल 7 सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. शिवाय, दहावी प्रमाणे बारावी अंतर्गत मूल्यपामनाद्वारे निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग विद्यार्थ्यांसहित) ऑनलाईन , दूरध्वनीद्वारे एकास एक वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करून नोंदी करून गुण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 31 जुलै पर्यत बारावीचा निकाल राज्य मंडळाकडून जाहीर केला जाणार आहे.
देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिता लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधीत घटकांशी चर्चा करून मुल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केली. देशपातळीवर एकसूत्रता व समानता यावी यासाठी एकच मुल्यमापन प्रक्रिया असावी अशी आग्रही मागणी राज्य सरकारने केली होती. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली होती.