गुजरात सरकारने सहावी ते १२वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात आता भगवत गीतेचा समावेश करण्याचा निर्णय़ घेतला आहे. १७ मार्च रोजी गुजरात सरकारने हा निर्णय जाहीर केला. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीतेचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली आहे.
शालेय अभ्यासक्रमात भगवत गीतेचा समावेश करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग आहे, अशी भूमिका जितू वाघानी यांनी मांडली आहे. भगवत गीतेमध्ये देण्यात आलेली मूल्य आणि तत्व ही या धोरणात बसत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आधुनिक आणि पुरातन संस्कृती, परंपरा आणि ज्ञानपद्धती यांचा मिलाफ असून यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या श्रीमंत आणि विविधतेतील एकता जपणाऱ्या संस्कृतीचा अभिमान वाटेल, असे त्यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना जितू वाघानी यांनी सांगितले की, सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी सर्वांगी शिक्षण विषयांतर्गत भगवत गीतेचा समावेश असेल. तर नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी प्रथम भाषेच्या अभ्यासक्रमात गीतेचा समावेश करण्यात येणार आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी भगवत गीतेबद्दल काय म्हटले आहे याचाही समावेश या अभ्यासक्रमातील काही धड्यांमध्ये असेल. त्याचबरोबर भगवत गीतेचा अभ्यासक्रम हा पर्यायी नसून मुख्य विषयांतर्गत त्याचा समावेश करण्यात आला आहे.