गडचिरोलीच्या बोधीची दखल घेतली युरोपियन देशाने.
उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती.
जागतिकदृष्टया प्रतिष्ठित मानली जाणारी ‘इरासमूस मुंडस’ ही शिष्यवृत्ती गडचिरोली जिल्ह्यातील स्कॉलर अॅड. बोधी रामटेके यांना जाहीर झाली आहे. ही शिष्यवृत्ती युरोपियन शिक्षण व संस्कृती एक्झिक्युटिव्ह कमिशनमार्फत देण्यात येते. यासाठी जगभरातून केवळ पंधरा स्कॉलरची निवड करण्यात आली असून त्यामध्ये अॅड.बोधी रामटेके यांचा समावेश आहे. इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन यापैकी एका देशात पुढील दोन वर्षे बोधी रामटेके कायद्याचे उच्च शिक्षण घेणार आहेत. यामध्ये जगातील विविध चार नामांकीत विद्यापीठाच्या संयुक्त अभ्यासक्रम असणार आहे. वयाच्या अवघ्या २४ वर्षी या तरुणाने वंचित तसेच आदिवासी घटकासाठी केलेल्या कामाची थेट दखल घेत युरोपियन देशाने त्यांना ही मानाची शिष्यवृत्ती बहाल केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे नवोदय विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुण्यातील नामांकित आय.एल. एस. विधी महाविद्यालयात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘पाथ’फाऊंडेशनच्या माध्यमातुन राज्यातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
या कामाची घेतली जागतिक दखल
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन प्रश्नांना वाचा फोडली.
कोरो इंडिया या संस्थेद्वारा समता फेलोशीप मिळवून संविधानिक मुल्यांवर काम व 'संविधानिक नैतिकता' हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील १२०० विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले.
गडचिरोलीतील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील गरोदर महिलांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या, यासाठीच्या याचिका महत्वपूर्ण ठरल्या.
आदिम समुदायांना न्यायव्यवस्थेत येणा-या अडचणींवर संशोधन करुन इजिप्त देशात आतंरराष्ट्रीय परिषदेत अहवाल सादर केला.
दुर्गम गावात आवश्यक रस्ते व पुल यांबाबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांना पत्र लिहिले. जनहित याचिकेच्या माध्यमातून गडचिरोलीतील दुर्गम वेंगणुर भागातील १५०० नागरिकांना रस्ता व पुल मिळावा यासाठी न्यायिक लढा दिला.
कायद्याची सोप्या भाषेत माहिती देणारे 'न्याय' हे पुस्तक लोकप्रिय व वंचित घटकांसाठी महत्वपूर्ण ठरले.
दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विधी संशोधक म्हणून करत असलेले काम उल्लेखनीय ठरले.
तळागाळातील घटकांसाठीच शिक्षणाचा उपयोग
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा व आई-वडील-मित्रांचे प्रोत्साहन माझ्या वाटचालीत महत्त्वपुर्ण आहे. समाजातील वंचित, आदिवासी समुदायाचे प्रश्न प्रत्यक्ष जमीनीपातळीवर काम करतांना अनुभवले. उच्चशिक्षण घेवून जागतिक स्तरावर येथील प्रश्न मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, हे प्रत्येक सुशिक्षितांचे स्वप्न असायला हवे. युरोपीयन देशांनी विश्वास दाखवून दिलेली ही संधी पुढील काळात वंचित घटकांसाठी रचनात्मक काम उभे करण्यासाठी बळ देणारे असल्याची प्रतिक्रिया बोधी रामटेके यांनी दिली आहे.