संगीतमय पाढे शिकवणारी अनोखी मराठी शाळा...

राज्यातील आणि जळगाव जिल्ह्यातील एकमेव संगीतमय पाढे शिकवणारी अनोखी मराठी शाळा पाहायला मिळत आहे. या शाळेत विद्यार्थी संगीतमय ठेक्यावर पाढे पाठ करताना दिसून येत आहेत. वाचा या अनोख्या शाळेची कथा...

Update: 2023-02-17 08:14 GMT

विद्यार्थ्यांनी पाढे पाठ करावेत, त्यांचे पाढे पाठ असावेत हा शिक्षक आणि पालकांचा अट्टाहास असतो. यासाठी ब‌ऱ्याचदा शिक्षक प्रयत्न देखील करतात. परंतु पाढे पाठ करणे हे गणिताच्या विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणे वाटते. मात्र संगितमय ठेक्यावर पाढे पाठ करण्याचा आगळा वेगळा, अनोखा आणि आनंददायी उपक्रम पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षकांनी राबवला आहे. यास विद्यार्थ्यांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ओठावर १२ पर्यंतचे पाढे रेंगाळू लागले आहेत. खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमांची परिसरासह तालुक्यात चर्चा होत आहे.

विद्यार्थ्यांच्या आवडीचे रूपांतर त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केले तर त्यांना आनंदही मिळतो आणि शिक्षणही होते. आनंददायी शिक्षणाची संकल्पना हीच असावी हा विचार घेऊनच खडकदेवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत परिपाठ घेतल्यानंतर संगीतमय पाढे हा उपक्रम हाती घेतला जातो. तो आता यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या उपक्रमासाठी खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक शरद हिम्मत पाटील, उपशिक्षिका श्रीमती भारती पंढरीनाथ खैरनार, उपशिक्षक अजित भाईसाहेब चौधरी, उपशिक्षक विरेंद्र विजयसिंग पाटील, उपशिक्षिका श्रीमती संध्या रामदास पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. या शाळेत बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी, शेत मजुरांची मुले आहेत. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांचे ३० पर्यंत पाढे पाठ होत आहेत. प्रत्येक पाढ्याला संगितमय रित्या शिकवले जात आहे. त्यामुळे विद्यार्थीही आवडीने पाढे पाठ करतात. यात नाविन्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत पाढे पाठ करण्याचा कंटाळा येत नाही. त्यामुळे संगितमय पाढे शिकवणारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनोखी ठरली आहे.

Tags:    

Similar News