कोरोना काळातही सुरु होती 'टॅब'वरची शाळा
कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. पण या संकटातही जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात डिजिटल शाळा चालण्याचा यशस्वी प्रयोग केला गेला आहे. आमचे सीनिअर करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा स्पेशल रिपोर्ट.....;
जालना : प्रत्येक मुलाच्या हातात टॅब असणारी शाळा सध्या जालना जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील दहिफळ भोंगाणे हे सहाशे लोकसंख्या असणारे छोटे गाव आणि या गावात सध्या भरते आहे डिजिटल शाळा...गाव छोट असल्याने शाळेचा पटही तसा कमीच, म्हणजे फक्त बावीस विद्यार्थी....या शाळेत वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन काळात सुद्धा ही शाळा सुरूच होती, कारण येथील प्रत्येक विध्यार्थ्यांकडे स्वतःचा टॅब आहे... प्रत्येक मुलाला टॅब घेण्यासाठी गावातून पालकाने प्रत्येकी सहा हजार रुपये जमा केले आणि शाळेची ओळख टॅब शाळा म्हणून झाली...
शाळेत टॅब आले मात्र त्याला इंटरनेटचा खर्च कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला...त्यामुळे यावर पर्याय म्हणून दोन 'डोंगल'ची सोय करण्यात आली आणि कोविड काळातही ही शाळा नेहमीप्रमाणे रोज भरली. मात्र यासाठी सर्व धडपड करणारा चेहरा म्हणजे या शाळेचे शिक्षक पेंटू मैसनवाड खरतर पेंटू मैसनवाड यांनी मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी टॅबचा प्रयोग गेल्या वर्षीच हाती घेतला होता म्हणजेच कोरोनाचे संकट सुरू होण्यापूर्वी... प्रत्येक मुलाला टॅब मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत करोना आला नव्हता. पण आला तर या भीतीपोटी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा डिजिटल करण्याकडे त्याचा प्रयत्न होता.
यासाठी त्यांनी गावातील महिला पालकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात आपल्या मुलींनी आयुष्यभर खुरपणीचेच काम करावे असे कोणाला वाटते?, शेतीत राबण्याऐवजी आपल्या मुलाने अधिक पुढे जावे असे वाटते की नाही, असे काही भावनिक प्रश्न विचारले. त्याचा पालकांच्या मनावर परिणाम झाला आणि पाच दिवसांत प्रत्येकाने सहा हजार रुपये गुरुजींकडे जमा केले आणि त्यातून टॅब आले....
टॅब आल्यानंतर प्रश्न होता इंटरनेटचा कारण गावात 'रेंज' नव्हती. म्हणून दोन 'डोंगल' घेऊन ती गावात बसविण्यात आली, त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद असतानाही दहिफळ भोंगाणे गावाची एक तासाची शाळा कोविड काळातही सुरू राहिली. त्यातून या शाळेचा ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. म्हणतात ना केल्याने होत आधी केलंच पाहिजे आणि तेच करून दाखवलं आहे दहिफळ भोंगाणे गावच्या गावकऱ्यांनी व शिक्षकांनी...