लहानपणी गावाकडे नंदीबैल यायचा. त्याच्याबरोबरचा माणूस त्याच्यापुढे एक मृदुंगासारखे वाद्य वाजवायचा. त्याचा ‘बुगु बुगु’ असा आवाज येत असे. तो बैलाला घेऊन प्रत्येक घराच्या दारापुढे जात असे. त्याला प्रश्न विचारायचे आणि बैलाने मान हो किंवा नाही अशी हलवून त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असा खेळ होता. लोकांनी खुश होऊन दिलेल्या बक्षीसावर बैल आणि त्याचा मालक यांचा उदरनिर्वाह चालत असे. बैलवाला विचारे ते प्रश्न सहसा असे असत - ‘यंदा पाउसपाणी चांगले असेल का?’ ‘यंदा या घराला चांगली सोईरिक मिळेल का?’ ‘घरात पाळणा हालेल का?’ नंदीबैल मान डोलवायचा. बैलवाला मग म्हणे, ‘बघा नंदी मान डोलावतो आहे. म्हणजे औंदा पाणी चांगलं येणार. पिकपाणी बी चांगलं येणार. यावर पुन्हा बुगुबुगु वाजायचे. नंदीबैल शिकवल्याप्रमाणे मान हलवायचा. कुठल्याच प्रश्नाला तो सहसा नकारार्थी उत्तर ध्यायचा नाही. काही वेळा मात्र मोनोटोनी तोडण्यासाठी मुद्दाम प्रश्नच नकारार्थी उत्तर यावे असा विचारला जाई. म्हणजे, “घरावर काही संकट येणार आहे का?’ बैल नकारार्थी मान हलवून ‘नाही’ म्हणे. भोळ्याभाबड्या गावकऱ्यांना असे अनुकूल भविष्य ऐकून बरे वाटे आणि बैलवाल्याची बरी कमाई होत असे.
या अनुकूल हुकुमी उत्तर देण्याच्या क्रियेला मग ‘मान काय हलवतोस नंदीबैलासारखी असा वाक्यप्रचार रूढ झाला. आपण आजूबाजूला सहज नजर टाकली तर अशा होयबांची फार चलती असते. मोठ्या साहेबाने म्हंटलेल्या प्रत्येक गोष्टीला “हो, हो” म्हणणारा कनिष्ठ सहकारी सगळ्यांना आवडतो. त्याला फारसे काही करायचे नसते. फक्त प्रश्नाचा रोखावरून वरिष्ठांना होकारार्थी उत्तर हवे आहे; की नकारार्थी तो बरोबर हेरून फक्त तशी मान हलावायची असते.
याच बैलाची गोष्ट आपण आज वाचणार आहोत. आपला देश शेतीप्रधान आसा डांगोरा आपण पिटत असतो. पण शेती करणारा शेतकरी मात्र कायम गरिबीत, दुःखात कर्जात असतो. त्याच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. ग्राहकाला वस्तू महाग मिळते पण मधले दलाल पैसे खाऊन गब्बर होतात. ही आजची वस्तुस्थिती आहे. अगदी शेती तज्ज्ञ जाणता राजा काहीही म्हणत असला तरीही . जेथे शेतकऱ्याला काही किंमत नाही तिथे त्याच्या वावरात असलेल्या बैलांना कोण विचारतो. दुष्काळात तर जनावराच्या छावण्या उभाराव्या लागतात. यातही फार मोठा घोटाळा होतो अशा बातम्या आपण कायम बघतो. वाचतो. आणि शांतपणे पचवतो सुधा. याच बैलाच्या जीवावर शेती करणारे लोक आता स्वताच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा बैलाच्या शर्यती व्हाव्यात म्हणून प्रयत्नशील होते. आता तर त्यांना बैलगाड्याच्या शर्यतीला राजमान्यता मिळाली आहे.
गावाकडच्या यात्रा जत्रांमध्ये अशा स्पर्धा होतात. शंकरपाट असे त्याला म्हणतात. गावाबाहेरच्या एखाद्या माळरानावर ओळीने बैल गाड्या उभ्या असतात. त्यांना पाळण्यासाठी मार्ग ठरवून दिलेला असतो. शेतकरी नवे कपडे घालून, फेटे बगैरे बांधून झोकात येतात. बैलांनाही सजविले जाते. शिट्टी वाजली की बैल गाड्या धावायला लागतात. जो बैल मागे पडतो त्याचा मालक बैलाच्या पाठीवर कोरडे ओढतो. जीवाच्या आकांताने बैल धावू लागतात. ढोल ताशांच्या गजरात, बैलाच्या डोळ्यातील पाणी आणि तोंडातील फेस कुणाला दिसताच नाही.
पूर्वी राजे महाराजे, आपले शोक पुरे करण्यासाठी कोंबड्यांच्या झुंजी लावीत. हत्तीचीही साठमारी करीत, एक मोठ्या हौद्यात दोन हत्तींना भरपूर दारू पाजून एकमेकांवर सोडीत. त्यांचे तुंबळ युद्ध होई. एखादा हत्ती मागे सरकू लागला तर त्याला लोखंडी अंकुशाने टोचल्या जाई. पुन्हा दोन्ही हत्ती त्वेषाने एकमेकांवर धावून जात. एकमेकांना जखमी करत. आणि राजे, त्यांच्या सरदारांबरोबर हा खेळ मोठ्या चवीने बघत असत.
आता राजेशाही गेली, लोकशाही आली. लोकशाहीतील हे छोटेमोठे राजे असले शोक पुरे करण्यासाठी पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती सुरु करतात हे बघून मन विषण्ण होते. दिवसेंदिवस आपण प्रगती करतो असे मानतो. पण अशा खेळांमुळे माणसातील पाशवी वृत्ती जागी ठेवतो. बहिणाबाईनी म्हटलेले शब्द आठवतात -
“माणसा, माणसा,
कधी होशील माणूस?”
माणसातील माणूसपण मला तर शेकडो मैल दूर वाटते आहे.
- श्रद्धा बेलसरे खारकर