युनिवर्सिटी ऑफ 'वाल्या'

Update: 2017-04-28 17:05 GMT
युनिवर्सिटी ऑफ वाल्या
  • whatsapp icon

महाराजाने फर्मान सोडले की, आजपासून नवीन अभ्यासक्रम सुरु करायचा. हा नवाच प्रयोग असल्याने यासाठी नावीन विद्यापीठच काढावे लागेल. त्यांच्या या फर्मानामुळे अधिकारी अचंबित झाले. नक्की काय करावे हे त्यांना समजेना.

साहेब, नक्की काय करायचे आहे?

हा कुठला अभ्यासक्रम आहे?

साहेब म्हणाले, आपल्याकडे अनेक लोक येतात, जातात. नवीन येणाऱ्या लोकांना आपल्याकडे आल्याचा काहीतरी फायदा व्हायला हवा. आणि ही कल्पना माझी नसून आपले नवे कुलगुरु नागभूषण मध्यंतरी त्यांना मुंबईचे लोक ब्रिजभूषण म्हणत आणि आता ते भारतभूषण होऊ इच्छीतात असे मा. महालकर साहेब आहेत.

समजले सर. महालकर सरांच्या योजना फार मोठ्या असतात. प्रत्येत ठिकाणी जाण्यासाठी आडवाट त्यांना मंजूर नाही. ते नेहमीच प्रशस्त महामार्ग बांधतात. पण मला या नव्या विद्यापीठात कोणाला प्रवेश द्यायचा व कुठली डिग्री द्यायची हे समाजावून सांगा.

सोपे आहे. आपल्याला फक्त 'वाल्यां'ना प्रवेश द्यायचा आहे.

'वाल्या' म्हणजे काय सर?

एवढे पण समजत नाही?

सॉरी सर ! पुन्हा एकदा समजवून सांगाल का?

अरे, आपल्या संघटनेत लोक येतात. त्यातले काही लोक 'वाल्या' असतात. म्हणजे त्यांच्याकडून काही छोटेमोठे गुन्हे घडलेले असतात.

अरे बापरे !

फार मोठे नाही रे, म्हणजे बँकेचे कर्ज बुडवणे, मारामाऱ्या करणे असे किरकोळ गुन्हे, सामान्य माणसाच्या हातून होत असतात. पण त्याला तुम्ही लोक चक्क गुन्हेगार म्हणता. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही. तोवर कायद्यानेच त्याला गुन्हेगार म्हणता येत नाही.

साहेब, पण त्याला वाल्या का म्हणायचं?

तुमचा संस्कृतीचा काही अभ्यास दिसत नाही. अहो, आपल्याकडे एक जूनी कथा आहे. वाल्या नावाचा एक साधा माणुस होता. तो उपजिवीकेचे काही साधन नसल्यामुळे जंगलातून जाणाऱ्या वाटसरुंना लुटायचा, मारायचा, दरोडेखोरी करायचा. असा एक गुन्हा घडला की एक खडा रांजणात टाकायचा. असे त्याचे सात रांजण भरलेले होते.

एकेदिवशी त्याला जंगलात फिरत असताना त्यांची नारदमुनीशी भेट झाली. त्यावेळी नारद मुनींनी त्याला विचारले की, "तुझ्या या कृत्याने तुझ्या घरातील मंडळी खुश आहेत का?" वाल्या करता हा प्रश्न मोठा अवघड होता. तरीही तो म्हणाला, "मुनीवर, मी घरी जाऊन त्यांना विचारतो आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जाऊ नका."

वाल्या परत आला तेव्हा त्याचा चेहरा पडलेला होता. खालच्या मानेनेच त्याने नारदमुनींना सांगितले, "मुनीवर, ज्यांच्यासाठी एवढे सगळे मी केले, त्यांच्यापैकी कुणीही माझ्या पापात सहभागी व्हायला तयार नाहीत. आता तुम्हीच काही मार्ग सांगा." नारदमुनींनी त्याला सगळी वाईट कामे सोडून, प्रायश्चित म्हणून राम नामाचा जप करायला सांगितला. मात्र आयुष्यात देवाचे नाव घ्यायची सवय नसल्याने त्याला राम म्हणायचा त्रास होऊ लागला. म्हणून तो मरा म्हणू लागला. परंतू मरा म्हटले तरी त्याचे राम नाम झाले आणि त्याचा उद्धार झाला. पुढे लोक त्याच्या घोर तपश्चर्येमुळे त्याला वाल्मिकी ऋषी म्हणू लागले. त्यांनीच पुढे रामायण महाकाव्य लिहीले.

साहेब, पण आपल्याकडच्या वाल्यांना आपण वाल्मिकी कसे करणार? त्यांना जप तप करायला सांगणार का?

छे ! छे ! असं काही नाही. आत सगळ्या क्षेत्रांत आधुनिकीकरण होत आहे. आता मोठी तपश्चर्या करण्याची गरज नाही. आपणच मुळात इतके पुण्यवान आहोत की, एखाद्या वाल्या आपल्या नागपूरच्या सिल्क गार्डनच्या भगव्या छत्रछायेकडे आला आणि त्याने कमळाला स्पर्श केला की, तात्काळ त्याचा वाल्मिकी होणार आहे.

अरे बापरे ! साहेब हे सगळं अकल्पितच आहे.

अरे, बघत काय बसलास, आता तू वाल्या युनिव्हर्सीटी म्हणून स्थापन कर आणि तेथे हा नवा अभ्यासक्रम सुरु कर.

सर, या अभ्यासक्रमाला नाव काय देऊ ?

"वाल्या टू वाल्मिकी व्हाया कमळ"

 

श्रद्धा बेलसरे-खारकर

 

Similar News