प्रत्येकाच्या आयुष्यात पायऱ्यांना खूप महत्त्व असतं. माझ्याही आयुष्यात पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. लहानपणी माडीवर जाणाऱ्या पायऱ्यांवर बसून मैत्रिणीशी कितीतरी वेळा गुजगोष्टी केल्या आहेत. उन्हाळ्यात आईला चोरून लोणच्याच्या फोडी इथेच खाल्या आहेत. या जिन्यातल्या पायरऱ्यांना टेकून तासंतास बसून गोष्टीची पुस्तके वाचली आहेत. पायऱ्यां म्हणजे त्या चढल्यावर कुठेतरी पोहोचणार हे मात्र नक्की असते. मराठवाड्यात खूप बारवा आहेत. बाराव म्हणजे चौकोनी विहीर. चहु बाजूने बांधलेली पायऱ्या उतरत उतरत थेट पाण्यापर्यंत जायची वेगळीच मजा यायची त्यावेळी.
तरुणपणी तर असे वाटायचे एशियाटीक वाचानालायाच्या पायऱ्यांवर बसून दिवसेंदिवस फक्त पुस्तकच वाचावे आणि खिशाला परवडली तर भेळ खावी. जाता येता बस मधून या पायाऱ्या दिसत असतं. मग पुढे मुंबईला आले आणि बघता बघता मुंबैकर झाले.
पण, आता मंत्रालय जळल्यानंतर नवीन मंत्रालयाचे बांधकाम झाले आणि भारदस्त मंत्रालयाचा दर्शनी भागाच्या जागी बांधल्या गेल्या पायऱ्या. या पाया-या मुळीच शोभत नाहीत. कारण पूर्वीचे भव्य गेट आता लुप्त झाले आहे. बर या पाय-यारून कुठेच जाता येत नाही. त्या कुठे पोहोचतच नाही. बरे या पायऱ्यांवर कुणी बसतही नाही कारण इथे जाणारे कडक इत्रीचे लोक पायऱ्यांवर बसणे योग्य समझत नाही आणि तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक तिथे पायरीवर जाऊ शकत नाही.
कशासाठी बांधल्या असतील या पायाऱ्या? कोणासाठी बांधल्या असतील? की वर्षानुवर्ष फिरत असलेल्या फायली आणि त्यातले विषय कधीच तडीस जात नाही त्याचे प्रतिक दाखविण्यासाठी बांधल्यात या पायऱ्या? की इथे काम करणा-यांना कुठलीच गोष्ट तडीस न्यायाची नाही हे सांगत आहे या पारऱ्या?
- श्रद्धा बेलसरे-खारकर