विक्रमादित्याने यांत्रिकपणे प्रेत खांद्यावर टाकले आणि तो चालू लागला. प्रेतात बसलेल्या वेताळाने आपले अंग राजाच्या खांद्यातून वर येणाऱ्या हाडांवर नीट अॅडजेस्ट करून घेतले आणि राज्याच्या प्रत्येक पाउलागणिक बसणारे धक्के पचवीत तो बोलू लागला. “राजा, तुझी ही चिकाटी मला नेहमीच प्रभावित करते. पण रोजरोज त्याच रस्त्याचा तुला कंटाळा येत नाही का? आता तुझ्याप्रमाणे मलाही हा स्मशानाचा परिसर बोअर होऊ लागलाय ! चल, आपण आज दुसरीकडे कुठेतरी जावू”. विक्रमादित्याला वेताळाची सूचना आवडली. आपला हा ओझे वाहण्याचा प्रवास काही फार काळ चालणार नाही हे अनुभवाने त्याला ठाऊकच होते. त्यामुळे ‘फॉर अ चेंज’ वेताळाची सूचना स्वीकारायला काहीच हरकत नाही असे वाटून विक्रमादित्याने रस्ता बदलला. तो महाराष्ट्रातल्या दक्षिण मुंबई परीसराकडे वळला.
“राजा, इतक्या उंच गगनचुंबी इमारतींत कोण राहत असावे बरे?”
‘अरे बाबा, हे मुंबईतील श्रीमंतांचे सुरक्षित बेट! इथे मोठमोठे व्यापारी, धनिक आणि उद्योगपती राहतात.’
“पण, श्रीमंतांचे तर बंगले असतात ना? मग या इमारती इतक्या उंच का?”
“इथे जागेची फार टंचाई आहे. म्हणून उंचचउंच इमारती बांधून कमी जागेत जास्त घरे बसविली जातात.”
हे ऐकून वेताळाने एक सुस्कारा सोडला. म्हणजे मोठ्या शहरातली श्रीमंती काही फार सुखकारक नसते तर! त्याने मनात खुणगाठ बांधली. पण लगेच राजाची पाऊले कुलाब्यातल्या झोपडपट्टीकडे वळली. त्या बैठ्या घरांकडे पाहून वेताळाने विचारले,
‘हे लोक फारच श्रीमंत असतील ना? यांची घरे तर बैठी आहेत.”
त्यावर राजा हसून म्हणाला, ‘हे लोक तर फारच गरीब आहेत. या त्यांच्या झोपड्या आहेत.’
‘पण मग त्या अलिशान महालाच्या शेजारी या झोपड्या कशाला?’
‘या झोपड्यांतील लोक श्रीमंताकडे झाडूपोछाची, सुरक्षारक्षकांची कामे करतात.” राजाने उत्तर दिले. म्हणून या झोपड्या कधीही नष्ट होऊ शकत नाहीत.
वेताळाला लक्षात आले केवळ परलोकातच आश्चर्ये असतात असे नाही तर!
दोघे पुन्हा फेरफटका मारू लागले. मंत्रालय, विधानभवन अशा अनेक वास्तूंची ओळख करून घेत ते मंत्रालयाजवळ आले. नंतर तिथूनच थोडं पुढे गेल्यावर वेताळाला काही इमारतीसमोरच्या लाल दिव्यांच्या गाड्या दिसल्या.
‘हे काय, इथे या गाड्यांवर लाल दिवे कशाला आहेत?’ त्याने न राहवून विचारले.
‘यांना सनदी अधिकारी म्हणतात. मंत्रालयातील आय.ए.एस./आय.पी.एस.लोकं राहतात इथे. यांना मंत्र्यांसारखेच सामान्य माणसांनी आणि वाहतूक पोलिसांनीही घाबरावे हा गुप्त संदेश देण्यासाठी ते दिवे लाल ठेवले आहेत !
‘हे सरकारी नोकरच आहेत ना? मग त्यांना कुणी का घाबरायचे?’
‘अरे, वेताळा, हे लोक सरकारी कागद हवे तसे रंगविण्यात फार पटाईत असतात आणि त्यांच्या नावात लिहिल्याप्रमाणे ते नेहमी, ‘आय. अॅम (आल्वेज) सेफ राहत असतात आपल्या दिव्य लोकशाहीत !
आता हळूहळू वेताळाची एक्साईटमेंट कमी होऊ लागली. म्हणजे आपल्यापेक्षाही खतरनाक लोक असतात तर! आणि त्यांना सगळेच घाबरतात म्हणे! हे लक्षात आल्याने वेताळाला कॉम्प्लेक्स येऊ लागला.
‘विचारायचे म्हणून त्याने विचारले,
“यांना ही घरे काय कायमची मिळतात का?”
“नाही, नाही! ही घरे त्यांना सरकारने नोकरी असेपर्यंतच राहायला दिलेली असतात. निवृत्त झाल्यावर त्यांना ती सोडावी लागतात.”
“अरेरे, मग हे कुठे जात असतील रहायला?”
“त्यांची इतर ठिकाणी अलिशान घरे असतात. आपापल्या राज्यात बंगलेही असतात. ते त्यांनी भाड्याने दिलेले असतात.”
“मग ते लगेच जात असतील आपल्या बंगल्यात रहायला ?”
“नाही बाबा ! आपले सरकार इतके मेहरबान असते की निवृत्त झाल्यावरही ३ महिने याच घरात रहायची सवलत त्यांना दिली जाते ! पण निवृत्तीनंतरही याच घरात राहता यावे म्हणून आणि लाल दिव्याची गाडी रहावी म्हणून यांच्यातील काही चतुर अधिकारी कुठल्या तरी सरकारी समितीवर, आयोगावर, महामंडळावर निवृत्तीच्या आधीच वर्णी लावून घेतात. त्यांचे घर आणि गाडी पुढच्या ५ वर्षासाठी मग सुरक्षित होऊन जाते.”
आता तर वेताळाला आपल्यापेक्षाही जास्त लोक ज्यांना घाबरतात त्या अधिका-यांचा रागच येऊ लागला होता. तरीही त्याने संभाषण सुरु ठेवण्यासाठी विचारले,
“चतुर लोक म्हणजे कोण?”
इकडे विक्रमादित्य आज खुशीत होता कारण कोणतीही अट न घालता वेताळ त्याच्याशी बोलत होता आणि त्याला मौन धारण करण्याची गरज पडली नव्हती. पण म्हणतात ना, चांगला काळ फार काळ टिकत नाही. तसेच झाले! विचारमग्न विक्रमादित्याच्या खांद्यावरून वेताळाचा खणखणीत आवाज आला.
“राजा, महाराष्ट्रात स्वत: प्रेमाने लावलेल्या झाडावर, दोरीने फास लावून, आपल्या मालकीच्या शेतात इथले शेतकरी आत्महत्या करतात. मग त्यांची अशी अवस्था होण्यास कारणीभूत असलेल्या मंत्र्यांना आणि तुझ्या या अधिका-यांना फक्त काही महिन्यांसाठी मिळणा-या सरकारी घरांचा इतका मोह का पडतो?” शेवटी विक्रमादित्यावर टेन्शन कायम ठेवण्यासाठी वेताळाने नेहमीची धमकीही देऊन टाकलीच.
“तू माझ्या या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर माहित असून दिले नाहीस तर काय होईल तुला माहित आहेच. तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील हे मी तुला पुन्हा १०१ व्यांदा सांगायला नको ना?”
विक्रमादित्याने थोडाही विचार न करता तात्काळ उत्तर दिले, “वेताळ महाराज, आमच्या राज्यात अलीकडे एक गाणे फार लोकप्रिय झाले होते. ते तुम्हाला कदाचित माहित नसेल. कारण स्मशानभूमीवर होणा-या कार्यक्रमात ते ऐकू येण्याची शक्यता कमीच आहे. गाण्याचे बोल होते, “मला जाऊ द्याना घरी आता वाजले की बारा!” ते गाणे या सरकारी अधिका-यांना खूप आवडले होते. सिनेमात या गाण्यावर नाचणा-या नट्यांना कोणत्यातरी सरकारी समारंभात, सरकारी खर्चाने बोलवून, त्यांनी अनेकदा ते एन्जॉयही केले. अनेकदा ऐकल्यावर या अधिका-यांच्या लक्षात आले की आपण इतके प्रयत्न करूनही महाराष्ट्राचे अजून पूर्ण १२ वाजलेलेच नाहीत. आपल्याला अजून खूप ‘काम करायचे’ शिल्लक आहे. मग म्हणे मुख्यमंत्र्यांकडे एकदा त्यांनी हे गाणे गुणगुणून दाखविले, अर्थात थोडा बदल करून ! “मला राहू द्या ना घरी...अजून वाजले नाहीत बारा !”
-श्रद्धा बेलसरे-खारकर