मुंबईमध्ये बघा प्रत्येक उपनगराचा एक राजा असतो. ‘लालबागचा राजा’, ‘बोरिवलीचा राजा’, ‘दादरचा राजा.’ भक्तगण त्याची ‘अगदी नवसाला पावणारा’ अशी जाहिरातही करतात. मला नेहमी प्रश्न पडतो की मंत्रालयात असा गणपती का बसवत नाहीत? ‘मंत्रालयाचा राजा’ म्हणून! आणि हो. त्याची जाहिरात करायची गरज पडणार नाही किंवा पब्लीसिटीसाठी वेगळे बजेटही लागणार नाही. कारण इथे प्रत्येक घडलेल्या घटनेची बातमी होते.
दररोज सर्व महाराष्ट्रातून, अगदी खेड्यापाड्यातून हजारो लोक मोठ्या आशेने इथे येतात. आधी शिवाजी महाराजांकडे बघतात. पण ‘नक्की काम होईल, काळजी करू नकोस.’ असा आशीर्वाद द्यायला एखादा गणपती असेल तर किती बरे वाटेल ना? हिंदी सिनेमात नाही का मोठ्या दवाखान्यात असा एखादा देव असतोच जो बरोबर हिरोच्या आर्त प्रार्थनेला धावून येतो. आपल्याला मात्र कधी पावत नाही .
इतके दिवस असा देव इथे का नाही याचे उत्तर मात्र मला परवा मिळाले. अहो, शासनाच्या एका अधिका-यानेच एक पत्रक काढले होते म्हणे, मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात आता देवदेवतांचे फोटो चालणार नाहीत म्हणून. मग बाकीचे सगळेच दूर राहिले.
बिचा-या देवांच्या तसबिरींना जी.आर.चा फटका बसला. या फटक्यापासून देवांना सहाव्या मजल्या वर बसलेल्या “ देवा “ लाही वाचवता आले नाही. भल्याभल्यांना वाटेला लावणाऱ्या कुणा कलुषा गुरूजीं त्याच्या पेनच्या एका झटक्यात देवांना बाद ठरवून टाकले. कलियुगात देवाचेही काही चालत नसावे.
काही भक्तांनी ओरड केली आणि म्हणे पुन्हा एका झटक्यात तावडेगुरुजींनी देवाला आत येण्याची परवानगी दिली.
मला वाटते आता नव्याने बाधालेल्या पंचतारांकित मंत्रालयाच्या आतमधल्या वातानुकुलीत सभामंडपात एक मंत्रालयाचा राजा बसवावाच. कधीमधी मुख्यमंत्री त्यांच्या सुविद्य पत्नीसह पूजा करतील. कधी मंत्रालयासमोर उपोषण करणा-या जोडप्याला घेऊन त्यांच्या हस्ते पूजा करवून फोटो इव्हेंट घडवतील. तिथे एक सेल्फी पाईंट आपोआप तयार होईल .
हिमालयात म्हणे कधीकधी परीस सापडते. त्यासाठी तिथल्या घोड्यांच्या टाचेला लोखंडी नाल लावतात, परिसाचा स्पर्श झाला तर आपोआप सोने व्हावे म्हणून. मंत्रालयात येणारे भक्त असेच नवस करतील. बघताबघता त्याची कीर्ती वाढत जाईल. सरकारच्या तिजोरीतही भर पडेल. शिवाय एखादे दिवशी सलमानभाईलाही पूजेला बोलावता येईल. म्हणजे नव्या सरकारचा ‘सर्वधर्मसमभाव’सुद्धा सिद्ध होईल.
हा एक मात्र अडचण आहे. विरोधी पक्षनेते म्हणतील ‘हा राजा सत्ताधारी पक्षाने बसवला असल्याने नवसाला कधीच पावत नाही.’ पण नाही त्याची काळजी नको करायला कारण कुठलीही प्रसिद्धी चांगली प्रसिद्धी असते. विचारा हव तर देवबाबुना !
श्रद्धा बेलसरे खारकर
email - shraddhabelsaray@yahoo.com
Phone - 8888959000