दुबईमध्ये आता उडत्या टॅक्सी

Update: 2017-03-31 06:23 GMT

जेम्स बॉन्ड सिनेमांच्या फँन्सना त्याची हवाई खुर्ची आठवत असेल. त्या ऑटोमॅटीक खुर्चीचे बटन दाबताच ती हवेत झेप घ्यायची आणि जेम्स बॉन्डला इप्सित स्थळी पोहोचवायची. अगदी त्याच प्रकारची ड्रोन टॅक्सी दुबईमध्ये लवकरच लॉन्च होणार आहे.

दुबईच्या ट्रान्सपोर्ट विभागाने नुकतीच हवेत उडणार्‍या या “वन सिटर” टॅक्सी सेवेची सुरवात करण्याची घोषणा केली आहे. जुलै २०१७ मध्ये ही सेवा सुरु होत असून एहांग या चीनी कंपनीसोबत याबाबतीत करार झालेला आहे. एहांग कंपनी या प्रकारच्या टॅक्सीं लवकरच दुबईच्या आकाशात उडवणार असून जगातील हा अश्या प्रकारचा पहिलाच प्रयोग असणार आहे.

‘एहांग 184‘ ही टॅक्सी ईलेक्ट्रीकल एनर्जीवर चालणारा ‘स्वयंचलित ड्रोन’ असून यात एकावेळी एकच व्यक्ति बसू शकेल. तसंच त्यात ड्रायव्हरची गरज असणार नाही. म्हणजेच या टॅक्सी ड्रायव्हरलेस आहेत. या टॅक्सीच्या आत एक स्क्रीन असेल ज्यावर गंतव्याचे ठिकाणावर क्लिक केल्यास ही ड्रोन टॅक्सी तत्काळ उड्डाण घेऊन हव्या त्या ठिकाणी घेऊन जाईल. अर्थात ग्राउंड कंट्रोल ऑफिस मधून 4G नेटवर्क च्या आधारे या ड्रोन टॅक्सीवर मॉनीटरींग करून नियंत्रण ठेवण्यात येईल. या ड्रोन टॅक्सीचा वेग साधारण १०० किमी प्रति तास एवढा असेल.

सध्या दुबईमध्ये अधूनमधून या ड्रोन टॅक्सींचे उड्डाण परीक्षण बघायला मिळत आहे. त्यांच्या ऑफिशियल लाँचकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. ट्रॅफिक समस्येवर तोडगा म्हणून हवाई ड्रोन वाहनांच्या नव्या युगाची ही नांदी आहे.

 

  • जयश्री इंगळे

Similar News