तीन साल, बेमिसाल?

Update: 2017-05-24 13:46 GMT

एका आर्थिक दैनिकाने बड्या कंपन्यांच्या सीईओंच्या मुलाखतींच्या आधारे एक पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक नेतृत्व, पायाभूत सुविधांवर त्यांनी दिलेला भर आणि भ्रष्टाचारावर केलेला हल्ला याबद्दल सर्वांनी मोदींना सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त पैकीच्या पैकी गुण दिले! मात्र त्याचवेळी सरकारच्या एकूण कामगिरीवर 10 पैकी 7 गुण दिले. तसेच रोजगारनिर्मिती आणि बँकांकडची कर्जे ही प्रमुख आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी केलेल्यांपैकी 47 टक्के सीईओंनी सांगितले की, उत्पादन व सेवांची सध्या मागणी जेमतेम आहे. 57 टक्के म्हणाले की, मेक इन इंडिया कार्यक्रमाची प्रगती सुमार आहे. सामान्य लोकांपैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांच्या मते, मोदी सरकारने अपेक्षेइतकी वा त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. गुलाबी वृत्तपत्राने केलेली पाहणी म्हणून त्याकडे तुच्छतेने पाहणे योग्य ठरणार नाही. भाजपला वेगवेगळ्या निवडणुकांत तुफान यश मिळाले आहे. त्यामुळे मोदी सरकारबद्दलचे जनतेचे परसेप्शन हे अजूनही पॉझिटिव्हच आहे. सर्जिकल स्ट्राइक व नोटाबंदीमुळे, हा ठोस निर्णय घेणारा नेता आहे व तो गरिबांच्या बाजूचा आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्यात मोदींनी यश मिळवले आहे.

यावेळी आठवतो, तो थोडा मागचा इतिहास. 1971 सालच्या लोकसभा निवडणुकांत इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या 520 पैकी (आर - रूलिंग विंग) 362 जागा मिळवून दिल्या. पक्षाच्या जागा 93ने वाढल्या. त्यावेळी इंडियन नॅशनल काँग्रेसला (ओ -ऑर्गनायझेशन विंग) 16, जनसंघाला 22, स्वतंत्र पक्षाला 8, संयुक्त समाजवादी पक्षास 3, प्रजासमाजवादी पक्षास 2, भारतीय कम्युनिस्ट पक्षास 23 व मार्क्सवादी पक्षास 25 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रपती निवडणुकीत इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराऐवजी व्ही. व्ही. गिरींना समर्थन दिल्यामुळे काँग्रेस फुटली. परंतु गरिबी हटाओची घोषणा देऊन इंदिराजींनी दणदणीत यश मिळवले. 2014 मध्ये भाजपला 30 टक्के मते मिळाली, तर इंदिराजींच्या पक्षास तेव्हा 43.7 टक्के मते प्राप्त झाली होती.

मार्च 1971 मध्ये निवडणूक पार पडली. त्यानंतर लगेच सुरू झालेल्या बांगलादेश युद्धात पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानला पूर्ण लोळवले. तेव्हा त्यांचा जगभर गुणगौरव होऊ लागला. परंतु त्यानंतर साडेतीन वर्षांतच त्यांना आणीबाणी पुकारण्याची दुर्बुद्धी झाली आणि 1977च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पालापाचोळा झाला.

मी इंदिरा गांधींची भाषणे ऐकलेली आहेत. ‘हमारे ऑपोझिशनवाले कहते हैं इंदिरा हटाओ. मैं कहती हूँ गरिबी हटाओ’... ! नोटाबंदीनंतर मोदींनी विरोधकांची अशीच खिल्ली उडवली. विरोधी नेते, सिंडिकेटवाले भांडवलदारांचे बगलबच्चे असल्याचा इंदिराजींचा आरोप होता. विमुद्रीकरणानंतर मोदी हसत हसत विरोधी नेत्यांची कळ काढू लागले. ‘अरे, आप ऑपोझिशनवाले लोग इतने पसीने पसीने क्यूँ हो गये?’ ही त्यांची टीका होती. म्हणजे विरोधकांकडे काळा पैसा आहे, असेच ते सुचवत होते.

इंदिरा गांधींनी काँग्रेस फोडली व पक्षात एकाधिकारशाही प्रस्थापित केली. नमोंनी पक्ष न फोडता हे साध्य केले... आपल्या अखेरच्या सभेत इंदिराजींनी ‘माझ्या शरीरातील रक्ताचा थेंब अन् थेंब मी देशासाठी खर्च करायला तयार आहे’ असे भावपूर्ण उद्गार काढले. उलट नमोंनी गुजरातमध्ये गोरक्षकांनी दलितांना काठीने सडकून काढल्याची घटना घडल्यावर अनेक दिवसांनी तोंड उघडले. ‘अगर मारना है, तो मुझे मारो, लेकिन मेरे दलित भाईयों को नहीं’ असे ते म्हणाले. इंदिरा गांधींनी देशाबाहेरच्या शक्ती भारतास धोका निर्माण करत असल्याची टीका (परकीय हात) सतत केली. मात्र भारताची एकसंधता व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न त्या सतत मांडत. तर मोदी राष्ट्रवादी भावनेस खतपाणी घालण्यासाठी मेक इन इंडिया, स्टँडअप/स्टार्टअप इंडिया/डिजिटल इंडिया अशा घोषणा देतात. त्यांचे समर्थक विद्यापीठांमधून ‘राष्ट्रवादी’ धिंगाणा घालतात.

माझे विरोधक गरिबांचे शत्रू आहेत, असे इंदिराजी सुचवत. त्यासाठी त्यांनी बँक राष्ट्रीयीकरणाचा उपयोग करून घेतला. जनधन योजनेद्वारे मोदी तेच करत आहेत.

मात्र काही झाले, तरी इंदिरा गांधींनी कधीही धार्मिक विद्वेष जागवला नाही. गेल्या तीन वर्षांत हिंदुत्ववादाने कधी नव्हे इतके हिंस्र रूप धारण केले आहे. शिवाय इंदिरा पर्वात त्यांची अधिकारशाही असली, तरी इतर नेत्यांना थोडेतरी मतस्वातंत्र्य होते. आज भाजपमध्ये शाह-मोदींविरुद्ध ब्र काढण्याची कुणाची हिंमत नाहीच. तसे कोणी केले, तर राजकीय एन्काउंटर झालाच समजा. पण आम्हाला हे धोरण बरोबर नाही वाटत, असेही क्वचितच कुणी सांगू शकते.

इंदिराजींइतकेच मोदीही लोकांच्या भावनांना हात घालतात. मात्र बेलछीला अत्याचारग्रस्त दलितांकडे धावत जाणाऱ्या (खरे तर हत्तीवरून) अशा इंदिरा गांधी होत्या. आदिवासींबद्दल त्यांना ममत्व होते. आणि सायलेंट व्हॅली प्रकल्पाच्या वेळी घेतलेल्या भूमिकेच्या निमित्ताने पर्यावरणाबद्दलची त्यांची जाणही दिसून आली. मात्र दुसरीकडे, अखलाक असो की रोहित वेमुला असो; दंगलग्रस्त/पीडित/हत्या झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्याला डोळा भिडवणे मोदी टाळत आले आहेत. मध्यमवर्गीयांना जेव्हा इंदिराजींचा तिरस्कार वाटत होता, तेव्हा गरीब, दलित, महिला, मुसलमान हे बाईंच्या मागे उभे होते. आज गरीबविरोधी धोरणे राबवूनही गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत सर्वच जण मोदींचे भजन करत आहेत. इंदिराजींनी पहिल्या टप्प्यात 1966-1977 असे सलग 11 वर्षे राज्य केले, मोदीही याची पुनरावृत्ती करतील!

हेमंत देसाई

Hemant.desai001@gmail.com

Similar News