नेहमीप्रमाणे विक्रमादित्याने खांद्यावर प्रेत घेतले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. यावेळी त्याने नेहमीच्या उदास काळोख्या रस्त्यांऐवजी दिल्लीतील चमचमत्या इंद्रपुरीतून जायचा मार्ग निवडला होता. मोठमोठे रस्ते, जणू दिवस वाटावा असे प्रखर दिवे, आजूबाजूला उंचचउंच इमारती, प्रयेक घरासमोर बगीचा असलेली टुमदार घरे, अलिशान बंगले असलेला तो भाग होता. मध्येच चकचकीत अशा देशीविदेशी गाड्या सुळकन जवळ येत आणि कळेपर्यंत चटकन निघूनही जात. प्रेतात बसलेला वेताळ जरा गोंधळलाच. पण लगेच त्याने विक्रमादित्याला विचारले,
‘राजा, तू मला आज हे कुठे आणले आहेस?’
राजा उत्तरला, ‘अरे तुलाही कंटाळा आला असेल ना, त्याच त्या अंधाऱ्या स्मशानात राहण्याचा, म्हणून मी तुला आज देशाच्या राजधानीच्या आतल्या रस्त्याने आणले आहे. या दिल्लीचे तख्त मिळविण्याचा रक्तरंजित इतिहास तर तुला माहित असेलच. नसेल तर तो मी तुला पुढे कधीतरी सांगेनच.’
त्याचे बोलणे मधेच थांबवून वेताळ म्हणाला, ‘रक्तरंजित म्हणजे? थोडे समजावून सांग ना.’
‘इथले वैभवशाली सिंहासन मिळविण्यासाठी कधी मुलाने बापाचा खून केला आहे तर कधी भावाने भावावर तलवार उपसली आहे. त्यामुळे रक्ताने हे सिंहासन अनेकदा डागाळले आहे. म्हणून त्याचा इतिहास रक्तरंजित आहे असे इतिहासकार म्हणतात. अगदी पुरोगामी, डाव्या इतिहासकरांनीही या सत्याला उदार अंत:करणाने संमती दिली आहे. या सिंहासनावरील काही राज्यप्रमुखांच्या हत्या तर अगदी अलीकडेही झाल्या आहेत.’
सगळी झगमग बघून चकित झालेला वेताळ म्हणाला, ‘विक्रमादित्या, बापरे, या सुंदर शहराकडे बघून तर तू म्हणतोस तसे काही वाटत नाही.’ पण मग आज हे एकाच माणसाचे फोटो असलेले पोस्टर सगळीकडे का दिसत आहेत ? आज विशेष काही आहे का या शहरात?’
त्यावर विक्रम म्हणाला, ‘वेताळा, नव्या राजाला राज्याभिषेक होऊन ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सगळीकडे मोठा सोहळा साजरा होतो आहे. हा सोहळा संपूर्ण जम्बूद्वीपात सुरु आहे. ही मोठी चित्रे त्याच राजाची आहेत शेजारी त्याचा प्रमुख आमात्य आहे.’
‘असा काय विशेष पराक्रम केला आहे बुवा या राजाने?’ विक्रमादित्याला वेताळाच्या प्रश्नात एखाद्या पत्रकाराची चिकित्सक बुद्धी दिसू लागली. यावर त्याने शांतपणे उत्तर दिले, ‘या चक्रवर्ती सम्राटाने अवघ्या ३ वर्षात सगळे जग पादाक्रांत केले आहे. आता जगभरचे सगळे छोटेमोठे राजे याला ओळखतात. देशविदेशात याच्या तडाखेबंद भाषणाने जनता मंत्रमुग्ध होते. याने प्रजेला ५ वर्षात श्रीमंत व सुखी करण्याचे वचन दिले आहे.’
‘अरे वा विक्रमादित्या, हा राजा तर मला अगदी तुझ्यासारखा वाटतो. तीन वर्षात जग पादाक्रांत करणे हा मात्र मला एक जागतिक विक्रमच वाटतोय.? त्याचे पराक्रम आणखी पुढे सांग...’
‘सम्राट नुसता जगज्जेता नाही. तो तर प्लुटोच्या राज्यशास्त्राच्या कल्पनेप्रमाणे तत्वज्ञही आहे म्हणतात. तो जनतेची अध्यात्मिक उन्नती साधावी म्हणून नेहमी प्रवचने करीत असतो. त्यामुळे हल्ली त्याच्या राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे सर्व जनता आनंदात आहे आणि सर्वत्र जल्लोष सुरु आहे.’
‘राजा तू म्हणतो ते खरे असेल तर मग मला सांग, हे मोर्चे कुणाचे दिसताहेत? मोर्चातील लोक तर आक्रोश करताहेत असे दिसते त्या पोस्टर्सवरील चित्रात!’
‘वेताळा, तुला तर मनुष्यस्वभाव माहीत आहे ना? काही माणसे कायमच अतृप्त असतात. त्यांना कुणाचेच यश, वैभव बघवत नसते. शिवाय आता आपल्या काळासारखी राजेशाही राहिली नाही. लोकशाही नावाची एक नवीच व्यवस्था कार्यरत आहे. तिच्यात कुणालाही काहीही अधिकार असतात, बाबा! राजाच्या यशाबद्दल असलेल्या मत्सरातून काही लोक त्याला अपशकून करण्याचे असे उद्योग करीत असतात. लोकशाहीत त्याला अनुमती असते.’
‘आणि तिथे तो एक अशक्त माणूस झाडावर लटकवलेला दाखविला आहे त्या चित्रात, त्याचे काय? चेह-यावरून तो शेतकरी वाटतो.’
‘ते जाऊ दे! व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणतात ना! तू आपला आनंदसोहळा बघ. स्मशानाबाहेराचे आनंदी जग अनुभव की जरा. बघ कसे सुगंधी वातावरण आहे, सगळीकडे! केवढी रोषणाई, शिवाय सर्वत्र कमळाचा कसा दरवळ येतो आहे.’
‘राजा, मला एक सांग, ३ वर्षापूर्वी या राजाचा राज्याभिषेक झाला असे तू म्हणालास. मग या राजाच्या पूर्वी राज्यशकट कोण हाकत होता?’
‘होता एक एक शांतस्वभावाचा राजा. त्याला कुणी मौनीबाबा म्हणत. आता तो कुठे आहेस हे मात्र विचारू नकोस.’
‘ठीकाय. नाही विचारत, पण मग जुन्या राजाचे सरदार तरी असतील ना? ते कुठे आहेत?’
‘पानिपतची परंपरा. राजा पडला की सरदारच काय, सैनिकही पळून जातात ना! पण हो. त्या राजवटीतला एक राजपुत्र आहे अजून, राजधानीत.’
‘तो काय करतो? त्याचा नव्या सत्ताधाऱ्यांवर काही अंकुश असेल ना?’
‘नाही नाही, तो सहासहा महिने दाढी वाढवून फिरत असतो. मध्येच कधीतरी जोरदार भाषण करतो, तर कधी सहा महिने दुसऱ्या देशात फिरायला जातो. तो आणि त्याची आई, म्हणजे राजमाता, नेहमी आजारी असते. तरीही अधूनमधून ते दोघे आपले अस्तित्व दाखवतात.’
आता दिल्ली संपून समोर स्मशान दिसू लागले होते. संपूर्ण रस्ताभर विक्रमादित्याचे मौन आधीच मोडणारी उभयपक्षी चर्चाही संपत आल्यामुळे आता वेताळ पुन्हा पहिल्या पदावर येणार नाही अशी अंधुक आशा त्याला वाटू लागली. पण दैवगती कुणाला चुकलिये? शेवटी तिला तोंड द्यावेच लागणार असे विक्रमादित्याच्या लक्षात आले, कारण अचानक पाठीवरून त्याच ओळखीच्या आवाजात पुढचे वाक्य आले. ते ऐकून राजाची घोर निराशा झाली.
वेताळ त्याच्या ठेवणीतल्या प्रोफेशनल आवाजात म्हणाला, ‘राजा, आता या आपल्या सगळ्या संभाषणातून निर्माण झालेले माझे तीन प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे माहित असूनही जर तू दिली नाहीस तर काय होईल याची तुला कल्पना आहेच!’
विक्रमादित्याने थकून पाठीवरील ओझे एकदा नीट सावरून घेतले आणि शपथेत अडकलेला तो बिचारा वचननिष्ठ राजा येणाऱ्या कुट प्रश्नांची लक्षपूर्वक वाट पाहू लागला.
कुत्सितपणे हसत वेताळ म्हणाला, ‘विक्रमादित्या, जनतेचे स्वप्न पूर्ण न करणारा, तिला खोटी आश्वासने देणारा हा राजा लोकप्रीयतेच्या प्रत्येक परीक्षेत पास कसा झाला ते सांग. आता माझा दुसरा प्रश्न - सत्तेवर अंकुश न ठेवणारा राजपुत्रही जनतेने कसा काय आजवर चालवून घेतला ?आणि तिसरा प्रश्न त्या सहनशील जनतेचे शेवटी काय झाले?’
राजा चांगलाच विचारात पडला. यावेळी प्रश्न चक्क तीन होते. तो मनातल्या मनात विचार करून प्रश्नांची उत्तरे शोधू लागला. उत्तरे काही सापडेनात. पण एखाद्या शब्दकोड्याचे उत्तर शोधताना जसा एखादा शब्द खूप त्रास देतो. त्याचा जितका शोध घ्यावा तितके उत्तर अवघड होऊन बसते. कारण नेमका तितकीच अक्षरे असलेला, तसाच अर्थ निघणारा, त्यातील एखादे अक्षर त्या जागेत चपखल बसणारा चुकीचा शब्द काही आपला पिच्छा सोडीत नाही ! सारखा तोच मनात येत राहतो, तसे राजाचे झाले. त्याच्या मनात जाहिरातीच्या जिंगलसारखे तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा उमटत होते, -
‘टिंग टँग .....दोघेही नापास, जनता भकास... आणि जाहिराती मात्र झकास.’ टिंग टँग, ....दोघेही नापास.....
विक्रमादित्य अजून चालतोच आहे. फक्त विचारात बुडाल्यामुळे आता त्याची चाल बरीच मंदावली आहे.