छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्ष नावाच्या पक्षाचा खरा चेहरा महोदय रावसाहेब दानवे यांनी उघडा पाडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसं करावं याचा घालून दिलेला आदर्श न घेता या उपटसुंभांनी त्यांचं केवळ नावच पळवलं. तूर खरेदी करा अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना रावसाहेब दानवे यांनी ‘साले’ असं म्हणणं हा केवळ अन्नदाता शेतकऱ्यांचा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांचा अपमान आहे.
रावसाहेब दानवे हे येत्या काळात मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असा प्रचार त्यांच्या गोटातून सतत केला जायचा. बरं झालं दानवेंचा खरा चेहरा लवकर समोर आला. नाही तर हा साला मुख्यमंत्री वगैरे झाला असता. बरं हे फक्त जीभ घसरणं वगैरे नाहीय. काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसेंनी शेतकऱ्यांच्या मोबाईलच्या रिचार्जचा मुद्दा काढला होता. काही काळासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाखाली आलेल्या एका संपादकाने शेतकऱ्यांच्या बायकांच्या अंगावरच्या दागिण्यांचा मुद्दा काढला होता. हे सर्व सहज होत नाही. ही मानसिकता आहे. ही मानसिकता मिळालेल्या राक्षसी बहुमताने वाढत चाललीय. भाजपच्या नेत्यांना भानही राहिलेलं नाहीय की हे बहुमत देणारी सामान्य जनता आहे. या सामान्य माणसाच्या काठीलाही आवाज नाही, पण ती जेव्हा चालते तेव्हा तिचा दणका इतका जोराचा असतो की तोंडातून आवाजही निघत नाही.
काही वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असंच असंवेदनशील वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी इतकं फोडून काढलं की त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजकीय करीअरला घसरण लागली. अजित पवारांनी प्रायश्चित्त केलं पण तरी त्यांना लोकांनी अजून माफ केलेलं नाही. आज भाजपचे नेते एकामागून एक भयंकर वक्तव्यं करत आहेत. त्यांना कशाचीच चिंता वाटत नाही. लोकांना आपल्या खिशात ठेवल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झालीय. ज्यांना ज्यांना सत्तेची मस्ती चढलीय त्यांना मला इतकंच सांगायचंय की विरोधी पक्षाचा नालायकपणा हा ही तुमच्या विजयातील महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही लायक आहात म्हणून निवडून येताय हा तुमचा भ्रम आहे.
सर्वांत जास्त संतापजनक आहे, झालेली चूक मान्य न करता त्यावर बालिश खुलासे करणं. दानवेंनी खुलासा केला आहे की, हा कार्यकर्ता आणि त्यांच्यामधला संवाद आहे. तूर प्रकरणावर राज्य आणि केंद्र सरकारने काय काय उपाययोजना केल्या याची माहिती कार्यकर्त्यांना देत असताना हे वक्तव्य केलं गेलं. रावसाहेब दानवेंना या राज्यातील जनता डोक्यावर पडलीय असं वाटतंय का? तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहात, तुम्ही कार्यकर्त्यांशी असं बोलता का? असं वागता का? बरं सरकारने तूर खरेदी केली म्हणजे तुम्ही उपकार केलेत का? तुम्ही कुठे तुमच्या खिशातले पैसे खर्च केलेयत. दानवेंना माझा सरळ प्रश्न आहे, सरकार तुमचं, पोलीस तुमचे, गृहखातं तुमचं, खरेदी केंद्रे तुमची, आदेश तुमचा, तूर लावा ही विनंती तुमची.. सगळं तुमचं. मग विक्रमी पीक आलं ही चूक शेतकऱ्यांची कशी? तूर खरेदीत 400 कोटींचा घोटाळा झाला हे तुमचा लई कार्यक्षम मुख्यमंत्री स्वत: तोंड वर करून सांगतो कसा? या भ्रष्टाचाराला राज्याचा मुख्यमंत्री-गृहमंत्री जबाबदार नाही का? शेतकऱ्यांची किती थट्टा तुम्ही करणार आहात. अस्वल जसं गुदगुल्या करून करून मारतं तसं तुम्ही शेतकऱ्यांना मारताय. वर कुणी विचारलं तर शेतकऱ्याचं पोर म्हणून खुलासा करताय. शेतकऱ्याचा मुलगा असं सांगीतल्यावर तुम्हाला काहीही बोलायचं लायसन्स मिळतं का?
राज्यातील शेतीच्या समस्येवर सध्या मंथन सुरू आहे. विरोधकांच्या संघर्ष यात्रा सुरू आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून सरकार संवाद यात्रा करणार आहे. तिथे शेतकऱ्यांच्या अंतयात्रा निघत आहेत. दानवेंसारखे बेजबाबदार नेते काहीबाही बोलून जखमेवर मीठ चोळतायत. लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मुली आत्महत्या करतायत, नैराश्यग्रस्त झाल्यायत. त्याच महाराष्ट्रात दानवे कोट्यवधी रूपये खर्च करून मुलाचं लग्न पार पाडतात. यांच्या भावना, संवेदनाच मेल्यायत की काय असं वाटतंय. त्याशिवाय एखादा माणूस असं बोलूच शकत नाही.
चोर तर चोर वर शिरजोर अशी एक मराठी म्हण आहे. दानवेंच्याच मुशीत तयार झालेला भाजपचा एक प्रवक्ता खुलासे करत सुटल होता की, दानवेंनी ‘साले’ नाही तर ‘सारे’ असं म्हटलं होतं. मला तर प्रवक्त्याचा खुलासा ऐकून त्यांच्याच भाषेत प्रश्न पडतोय. या ‘साऱ्यांना’ हे सर्व सूचतं कसं. हे ‘सारे’ कुठल्या मुशीत तयार झालेयत. या ‘साऱ्यांना’ त्यांच्या आईने काही शिकवण दिलेली नाही का? त्याही पेक्षा मोठा प्रश्न आहे की इतकं सर्व होऊनही या ‘साऱ्यांना’ राज्यातील ‘सारे’ शेतकरी मतदान तरी का करतात?
राज्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची आस आहे. मायबाप सरकार फितूर झाल्यासारखं वागतंय. समस्या सांगितली की डायलॉगचा मारा करतंय. बोलायला कोणंच कोणाच्या मागे नाही. ‘सारे’ एकापेक्षा एक... राज्यातील शेतकऱ्यांची सध्यातर अशी अवस्था झालीय की, सल्ला नको, कर्जमाफी नको.. पण हे ‘सारे’ कुत्रे आवरा..!
- रवींद्र आंबेकर