इमान कि (नियत) तबियत ठीक नही !

Update: 2017-04-28 10:22 GMT

फेब्रुवारी महिन्यापासून इमान हे नाव सर्वांच्या तोंडी आहे. पेपरमध्ये रोज काही न काही छापून येत आहे. जगातील सर्वात वजनदार महिला, इजिप्तची रहिवासी. तीचं वजन ५०० किलो असावे असा अंदाज होता. तिचे वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन तिला मुंबईत सैफी रुग्णालयात आणण्यात आले शस्त्रक्रिया करून वजन कमी करण्यासाठी. जगात कोणीही तिच्यावर उपचार करायला तयार नव्हते. पण डॉ. मुफझ्झ्ल लकडावाला आणि त्याच्या टीमने हे साहस केले. तिला आणण्यासाठी केलेली तयारी प्रचंड होती. तिला लागणारी बेडशीट स्पेशल होती. तिचा बेड, तो उचलणारी क्रेन, तिचा विमानप्रवास, तिला हॉस्पिटल च्या आत नेण्यासाठी करावी लागणारी तोडफोड, आणि या सर्वांसाठीचा प्रचंड खर्च. मोठ कठीण काम होते.

बरे ती अनेक वर्षे न चालल्याने पायाचे आणि पाठीचे स्नायू अत्यंत कमकुवत झाले होते. कितीही वजन कमी झाले तरी ते स्नायू उरलेले वजन उचलू शकतील याची कुठचीही खात्री नव्हती. तीन वर्षापूर्वी तिला अर्धांगवायु झाल्याने एक बाजू तर निकामीच होती. त्यातून तिला फुफुसांचा विकार होता ज्यात फुफुसंची प्रसरण क्षमता अतिशय कमी झाली होती. तीही सुधारण्याची काही शक्यता नव्हती. हृदयाचाही काही त्रास होता.

अशा स्थितीत शस्त्रक्रिया केली तर अचानक वजन मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे जाड निबर कातडी अक्षरश: लोंबू लागते आणि रुग्ण अतिशय कुरूप आणि भयप्रद दिसू लागतो. त्यासाठी जसे वजन उतरत जाते तसे त्वचा कमी करण्याच्या अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतात.

या भानगडीत पित्ताशयात खडे होणे आणि विविध भागात हर्निया होणे हे तर पाचवीलाच पुजलेले असते. कापलेल्या पोटाचे म्हणजे जठराचे टाके उसवून त्यातून पोटातील एसिड लीक होऊन पोटाच्या आत, आतड्यांच्या भोवती ऐसिड बर्न होऊन त्रास होतो तो वेगळाच. इमानला तिच्या अर्धांगवायुच्या उपचारांसाठी रक्त पातळ ठेवण्यासाठी औषधे चालू होती. ती बंद केली नाही तर शास्त्रक्रीयेदरम्यान खूप रक्तस्राव होतो आणि ती बंद केल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या मेंदूत जाऊ शकतात. इमानला तसेच काही झाले असावे. कारण शास्त्रक्रीये नंतर तिला सतत फिट येवू लागल्या. पूर्वी काही तरी गिळू शकणारी इमान आता अन्न पोटात ढकलण्यासाठी जठरात टाकलेल्या नळीवर विसंबून राहू लागली.

म्हणजे शस्त्रक्रिया पूर्ण यशस्वी पण रुग्णाची तब्येत पूर्वीपेक्षा फारच खालावली. हे अशा सर्जरी मध्ये बरेचदा होते. शस्त्रक्रियेपूर्वी सर्जन या सर्व गोष्टी रुग्णाला आणि नातेवैकाना सांगतोच सांगतो. हे सर्व स्वीकारूनच रुग्ण शस्त्रक्रियेला तयार होतो.

मी डॉ मुफझ्झ्लला ओळखतो. तो ही सर्व माहिती रुग्णाला सांगतोच सांगतो. तोच काय बहुतेक सगळे सर्जन या शस्त्रक्रियेमुळे होऊ शकणार्‍या दुष्परिणामांची इतकी खोलवर ओळख करून देतात की त्यानंतर रुग्ण तयार कसे होतात याचे अनेकाना नवल वाटते. असे नसेल कुठे तर ते असायला हवे.

इमानच्या केसमध्ये फार गाजावाजा झाला तो अवांतर गोष्टींचा. पेपरवाल्यानी तर अशी काही प्रसिद्धी दिली कि कोणाला वाटावे की हा डॉक्टर अशी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करतोय आणि तो हे सर्व पब्लिसिटीसाठी पैसे देऊन छापून आणतोय. मुफीने मला वाटते ह्या शस्त्रक्रिया हजारोनी केल्या आहेत आणि गेली अनेक वर्षे तो हे काम करतोच आहे. त्याला किंवा सैफी हॉस्पिटलला पब्लिसिटीची मुळीच गरज नाही.

पण पेपरमध्ये ही शस्त्रक्रिया किती धोकादायक आहे आणि अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेचे किती दूरगामी परिणाम होतात ते कुठेच पुढे आले नाही. या सर्व गोष्टी माहिती नसत्या आणि मग ‘ऑपरेशन यशस्वी पण पेशंट पूर्ण अयशस्वी’ अशी स्थिती आली असती किंवा इमान अजून जास्ती त्रासात रुतली असती तर इमानच्या बहिणीने ‘आम्हाला फक्त पब्लिसिटी साठी आणले, मूफीने फसवले हे सर्व आरोप मान्य केले असते. पण या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना असूनही जर असे आरोप होत असतील तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे.

ज्याने या सर्जरीसाठी सर्जनकडे चौकशी केली असेल त्यांना किंवा ज्यांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली असेल त्यांना विचारा ते सांगतील की ही सर्व माहिती आम्हाला सर्जनने दिली होती म्हणून.

म्हणूनच म्हणावेसे वाटते “इमान की (नियत) तबीयत ठीक नाही !

Similar News