असे काय घडले अंनिसने बुवाचे घर बांधून द्यायचे ठरविले?
"जरी या मांत्रिकाने भूत दाखवण्याचे आणि उतरवण्याचे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक केली असेल तरीही लोकांनी नासधूस केलेले त्याचे घर अंधश्रद्धा निर्मूलन समिति पुन्हा नीट व्यवस्थित करून देईल हे येथे मी जाहीर करतो".. असे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे शब्द होते. याविषयीची आठवण डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितली आहे.
असे काय घडले होते की ज्यामुळे अंनिसने बुवाचे घर बांधून द्यायचे ठरविले? घटना आहे तीस वर्षांपूर्वीची. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळील खंजिरे मळ्यात भुते दाखवणाऱ्या नाथपंथीय मांत्रिक गुरुने स्विकारलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान!!
महादेव चव्हाण नावाच्या ६५ वर्षाच्या मांत्रिकाने सांगली अंनिसचे आव्हान स्वीकारले होते. हे आव्हान होते भूत दाखविण्याचे. सांगली-कोल्हापूर परिसरातील अंनिसचे आव्हान स्वीकारणारा हा पहिलाच मांत्रिक होता! ६ डिसेंबर १९९० रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजता भूत दाखवीन असे त्यांनी पत्रकारांसमोर जाहीर केले. या चव्हाण मांत्रिकास गुरु मानणारा ज्योतिषी क्षितिज क्षितीज शिंदेने भूत दर्शन निश्चित होणार असे सांगून वृत्तपत्रातून आव्हान स्वीकारले असे जाहीर सांगितले . भूत पाहायला मिळणार या आशेने जवळपास दोन हजार लोक त्यादिवशी मांत्रिकाच्या घरासमोर सकाळीच जमा झाले होते! हे घर खंजिरे मळा, शिरोळ रोड येथे उघड्या माळरानावर होते. जत्राच भरलेली होती तेथे! सांगली अंनिसने हा कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने करायचे ठरविले होते. प्रश्न समितीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीचा होता.
एक आठवडा अगोदर डॉक्टर दाभोळकर यांना मी याची कल्पना दिली होती. भूत दाखवण्याचे आव्हान स्वीकारलेल्या मांत्रिकासाठी चाचणी नियमांचा एक मसुदा मी तयार केलेला होता. तो डॉक्टर दाभोळकर यांना फोनवरून मी सांगितला. त्यावर अशी शंका निर्माण झाली की समितीच्या नियमानुसार रुपये १००० डिपॉझिट मांत्रिकाने आपणास द्यायला हवेत तरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दोन लाख रुपयाचे चमत्कार, भूत व अतिंद्रिय शक्ती सिद्ध करण्याचे आव्हान हे नक्की समजण्यात येईल. यावर मी त्यांना म्हणालो की, समजा त्याने ते पैसे भरण्यास नकार दिला तर आपण मसुद्यामध्ये निव्वळ भूत दाखवण्याचे आव्हान स्वीकारले आहे असे आपण नमूद करूया. डाॅ. दाभोळकरांना हे पटले असावे. एक कलम असेही टाकण्यात आले की भूत दाखवण्यासाठी एक तास देण्यात येईल. तो तास सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या दरम्यानचा असेल. जे मांत्रिकानेच सांगितले आहे. ते समितीस मान्य आहे. भुताचे अस्तित्व मांत्रिकाने अशा पद्धतीने दाखवावे: १. टाळी देऊन २. समिती कार्यकर्त्यांना इजा करून. या मसुद्यावर मांत्रिकातर्फे क्षितीज शिंदे या ज्योतिषांनी सही देखील केली.
प्रत्यक्ष आव्हान स्वीकारण्याच्या दिवशी समितीचे आम्ही सर्वजण सकाळी ९ ला पोहोचलो. ११ वाजेपर्यंत जवळपास पाच हजार लोक तो पर्यंत जमा झाले होते!! भूत बघण्यासाठी !!
मी ११ वाजता मांत्रिकाच्या कुटीत गेलो आणि चला भूत दाखवायला लोक बाहेर जमलेत असे म्हणालो. तसा तो पटकन म्हणाला.. " डॉक्टर भूत बित काय नसतं. माझी चूक झाली डॉक्टर." मी म्हणालो, " जमावासमोर हे सांगा की भुतं असतं हे मी खोटं बोललो. मला माफ करा. असं तुम्ही सांगणार नसाल तर आम्ही जातो". महादेव चव्हाण आणि क्षितीज शिंदे माळरानातवर उभ्या असलेल्या त्या प्रचंड जनसमुदायासमोर येऊन म्हणाले... " भूत नसतं. मला माफ करा "... तसे लोक ओरडू लागले. आरडाओरडा करू लागले. एक जण ओरडून म्हणाला, " हम तो देल्ही से आये है. और आप हमे उल्लू बना रहे है?"
लोकांमध्ये संतापची लाट पसरली. बातमी पसरली की चव्हाण-शिंदे जोडीने भूत नसतं हे कबूल केलं आहे!
...आणि अशा गोंधळातच साताऱ्याहून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आले. ते येण्यापूर्वीच हे सर्व घडून गेले होते. त्यांनी आल्या आल्या मला विचारले.." काय झालं?" मी म्हणालो, "त्यांनी पळ काढला". क्षितीज शिंदे तोवर बाहेर आले. ते पाहून काही लोक 'भूत दाखवा भूत' म्हणत त्यांच्या अंगावर धावुन गेले. परिस्थिती चिघळत गेली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी ५००० लोकांसमोर फक्त एकच पोलिस बंदोबस्तासाठी हजर होता! तोही शिट्टी वाजवत इकडे तिकडे पळत होता!! परिस्थिती आटोक्याबाहेर गेली. मी, डॉक्टर दाभोळकर आणि समितीचे कार्यकर्ते जवळच्या गवताच्या गंजीच्या भाऱ्यावर चढून लोकांना शांत करू लागलो. लोक ऐकत नव्हते. डॉक्टर दाभोळकर आणि मी खाली उतरून कुटीत शिरलो. चव्हाण आणि क्षितीज शिंदे पूर्ण भेदरलेले होते. आम्ही त्यांना पर्याय सुचवला.
'तुम्ही लेखी स्वरुपात भूत नसतं हे लिहून द्या ते आम्ही लोकांना दाखवतो, म्हणजे लोक शांत होतील! ' दोघेही तयार झाले. त्यांनी लेखी लिहून दिले. ते पत्र घेऊन आम्ही बाहेर आलो. लोकांना दाखवलं आणि... अचानक लोकांनी दगड उचलून चव्हाण यांच्या घराच्या दिशेने भिरकवायला सुरवात केली. शिंदे-चव्हाण दोघेही कुटीत घाबरलेल्या अवस्थेत बसले होते. मी आणि दाभोळकर आत जाऊन त्यांना धीर दिला. लोकांना शांत करण्यासाठी प्रा. प्रकाश मेटकर, डाॅ. भरमगुडे, राजाराम मस्के, लिलाताई जाधव, बेबीनंदा चिगटेरी, इत्यादी सर्व कार्यकर्ते हात उंचावून विनवणी करीत होते. लोक म्हणत होते...
" तुम्ही बाजूला व्हा. यांनी आम्हाला फसवले आहे. आजवर आम्हाला भूत आहे असे सांगून आमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलाय..." वगैरे. तुफान दगडफेक चालू झाली. महादेव चव्हाण मांत्रिकाचे छप्पर पूर्ण फाटलं. त्याच्या कुटीत छप्परेखाली आम्ही चौघे!! दाभोळकर क्षितीज शिंदेच्या जवळ उभे होते आणि मी मांत्रिक चव्हाणच्या जवळ उभा. त्यांना दगड लागू नये, इजा होऊ नये यासाठी आम्ही दोघे प्रयत्न करत होतो. वरतून छपरातून दगड आमच्या आजुबाजुला पडतच होते. आम्ही दोन कोपर्यात जीव मुठीत धरून उभे होतो. इतक्यात पोलिसांची जीप आली. त्या जीपमध्ये मी शिंदेला आणि दाभोळकरांनी चव्हाणला दगड चुकवत अक्षरशा कोंबले. गाडीवर लोकांनी दगडफेक चालू केली. दगड चुकवत रानारानातून नांदणी गावांमध्ये आम्ही पोलिस ठाण्यांमध्ये पोहोचलो. पोलीस स्टेशन मध्ये दोघांनी भूत नसतं हे इन्स्पेक्टर समोर सांगितले परंतु चव्हाण मांत्रिक मात्र रडत म्हणू लागला...'माझे छप्पर पूर्णपणे लोकांनी उद्ध्वस्त केले आहे'. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व या गोष्टीविषयी बोलत असताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मला म्हणाले,
" आपण त्याच्या घराच्या डागडुजीचा खर्च उचलूया. तुला काय वाटते?"
मी त्यांना म्हणालो, " या क्षणाला मला हे अवघड वाटत असले तरी ते करण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते " तसे दाभोळकर उभे राहिले आणि म्हणाले,
" आमचा लढा अंधश्रद्धांविरुध्द आहे. आमचा लढा हा कोणत्याही एका व्यक्ती विरोधात नाही. अंधश्रद्धा विरोधाच्या लढाईत व्यक्ती ही अंधश्रद्धांची वाहक व बळी असते हे आम्ही मानतो. आणि मांत्रिक हा सुद्धा एक माणूस आहे. त्यामुळे त्याच्या घराच्या संपूर्ण डागडुजीची जबाबदारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती घेईल. तसे या ठिकाणी मी लेखी आश्वासन देईन.."
डॉक्टर दाभोळकर यांच्या या बोलण्याने मांत्रिक चव्हाण आणि शिंदे दोघेही अवाक झाले. अंधश्रद्धांचे निर्मूलन करत असताना व्यक्तीवर हल्ला चढवण्याऐवजी व्यक्तीच्या अंधश्रद्ध कृत्यांवर हल्ला चढवला जाणे हे जास्त विवेकी असतं हे दाभोळकरांनी तिथे जमलेल्या सर्वांच्या लक्षात आणून दिलं...! आज परिस्थिती काय आहे?
खुद्द दाभोळकरांच्या या संदेशाच्या विपरीत कृत्य धर्मांधांनी केलेले आहे. दाभोळकर यांच्या विचारांवर हल्ला चढवण्याऐवजी दाभोळकरांवर हल्ला करत खून करून स्वतःच्या धार्मिक वृत्तीचं हिणकस प्रदर्शन केलेलं आहे.
धर्म आजवर विवेकाचा पाठपुरावा व प्रसार करणाऱ्यांना मारत आलेला आहे, मग ते चार्वाक असोत, पानसरे असोत, कलबुर्गी किंवा गौरी लंकेश. संतांना मृत्यू आल्यावर ईश्वराने विमान पाठविले ही थाप जो धर्म, जी संस्कृती वर्षांनुवर्षे मारत राहते ती टाकावूच ठरते.
आज देखील विवेकाचा आवाज उठविणाऱ्या अनेकांवर खोटेनाटे आरोप थापून तुरुंगात डांबण्यात आले आहे. विवेकावर हल्ला चढवण्याची धर्माची हिम्मत होत नाही. कारण धर्म हा भक्ती आणि श्रद्धा नावाच्या फसव्या खांबांवर उभा असतो आणि शोषण हा त्याचा व्यवसाय बनतो. धर्मातील फोलपणा विवेक दाखवून देतो. जर धर्माने विवेकावर हल्ला चढवला तर धर्माचे विवेकी पण उजळून निघेल. पण धार्मिकांना हे करता येत नाही. कारण धर्म-संस्कृतीचे पालन श्रद्धेशिवाय होऊ शकत नाही. आणि श्रद्धा चिकित्सेला प्रचंड घाबरते. विधायक धर्म चिकित्सा देखील श्रद्धाळूंना गर्भगळीत करून सोडते. म्हणून ते विवेकवाद्यांना मारत सुटतात. विवेकवाद्यांना मारणार्या धार्मिकांना विरोध तर सोडून द्या साधा प्रश्न विचारायचे देखील धाडस दाखवले जात नाही.
डॉक्टर दाभोळकर यांचा खून अशा या धर्माने पाळलेल्या आणि श्रद्धेच्या चिखलात रूतलेल्या लोकांनी केलेला आहे यात शंकाच नाही. अशा या पिलावळीचे सरकार आपल्या या पिल्ल्यांना अभय न दिल्यासच नवल ! नरेंद्र दाभोलकरांचा देव करून पुष्पक विमानातून पुष्पवृष्टी करून खून लपविण्याचे षडयंत्र धर्माने आखले असेलच. सहिष्णुतेचा ढोल पिटण्याची सोय यातून उभी राहिलच.
दशकाच्या उंबरठ्यावर दाभोलकरांचा शहीद दिन आला तरी तपास आणि गुन्हेगारांचे शोधकार्य दशावतारी स्टाईलने सुरूच राहील... युगानुयुगे. ब्रम्हांडात विलीन करण्यासाठी!!
"जरी या मांत्रिकाने भूत दाखवण्याचे आणि उतरवण्याचे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक केली असेल तरीही लोकांनी नासधूस केलेले त्याचे घर अंधश्रद्धा निर्मूलन समिति पुन्हा नीट व्यवस्थित करून देईल हे येथे मी जाहीर करतो".. हे शब्द होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे.. डॉ. प्रदिप पाटील यांनी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त जागवलेली आठवण....