Sambhaji Bhide मनोहर भिडेला अटक होणार का ?

मनोहर भिडे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहे. भीमा कोरेगाव दंगलीत सुद्धा त्याचे नाव होते. परंतु त्यामध्ये त्याची साधी चौकशी देखील झाली नाही. आता महात्मा गांधीजींबाबत त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तरी त्याला अटक होणार का ?जाणून घ्या अशोक कांबळे यांच्या या लेखातून..;

Update: 2023-07-29 12:37 GMT

सोलापूर / अशोक कांबळे : राज्यात जोरदार चर्चेत असलेले नाव म्हणजे मनोहर उर्फ संभाजी भिडे होय. गेल्या अनेक वर्षापासून वादग्रस्त व्यक्तव्यामुळे हे गृहस्थ सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असतात. सातत्याने नवनवीन वाद निर्माण करून लोकांत संभ्रम निर्माण करणे हा मनोहर भिडे याचा ठरलेला अजेंडा होय. त्यामुळे विचारवंत आणि साहित्यिकात देखील उलट - सुलट चर्चाना उधाण आले आहे. मनोहर भिडे शिवप्रतिष्ठानचा सर्वेसर्वा असून त्याच्या अनुयायांना धारकरी म्हणून संबोधले जाते. मनोहर भिडेचे सांगली,सातारा,कोल्हापूर या भागात मोठे प्रस्थ आहे. मनोहर भिडे हे नाव भीमा कोरेगाव दंगलीत प्रथम समोर आले. भीमा कोरेगाव ची दंगल घडवण्यामागे भिडेचा हात होता,असा देखील आरोप त्याच्यावर आहे. भिडेच्या संघटनेचा संबंध आरएसएस आणि भाजपशी असल्याचा आरोप अनेकदा होतो. यामुळे भाजपा भिडे चा कर्ता करविता आहे का ? असा संशय उपस्थित केला जातोय. काल संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेक आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे. यामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण,आमदार यशोमती ठाकूर,आमदार जितेंद्र आव्हाड आघाडीवर होते. अधिवेशनात सरकारकडून फक्त कारवाईचे आश्वासन देण्यात आले असून येत्या काळात भिडेचे काय होणार,असा सवाल निर्माण झाला आहे.

भिडेचा थोडक्यात इतिहास

भिडे यांचे कुटुंब सुरुवातीपासून आरएसएसशी सलग्न असल्याचे सांगितले जात आहे. मनोहर भिडे याने अनेक वर्षे आरएसएस या संघटनेत काम केले असल्याची माहिती समोर येतेय. आरएसएस मध्ये काम करत असताना त्यांचे सहकाऱ्यांशी वाद-विवाद झाल्याने त्याने सांगली जिल्ह्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची संघटना स्थापन केली. त्या माध्यमातून कामाची सुरुवात केली. संघटना चालवत असताना आरएसएसला आव्हान देण्याचे काम काही काळ केले होते. या भिडेच्या संघटनेचे काम सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात चालते. भिडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पुण्यात वारीत घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्यावर डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

भिडे आणि वाद नेहमीचाच

भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत असल्याने सामाजिक वातावरण दूषित होत आहे. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीपासून तो चर्चेत आला. विशेष म्हणजे या दंगलीचा ठपका त्याच्यावर असताना देखील आजपर्यंत त्याला अटक झालेली नाही. अटक न होण्यासाठी राजकीय पक्षच जबाबदार असल्याचा आरोप अनेकदा होतो. भिडेला अभय का आणि कोण देत आहे. याचा तपास होणे गरजेचे आहे. परंतु सरकार मनोहर भिडेकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याने दररोज वादग्रस्त विधाने करण्यास त्याला कोणतीच अडचण येत नाही. काही दिवसापूर्वी त्याने एका महिला पत्रकाराला "आधी कुंकू लाव,मग मी तुझ्याशी बोलतो",असे विधान केले होते. त्यामुळे देखील त्याच्यावर टीका झाली होती. परंतु त्यानंतर देखील त्याने आपली वादग्रस्त विधाने सुरूच ठेवली. स्वातंत्र्याबद्दल ही अपशब्द काढले होते. त्यानंतर ही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. काही वर्षांपूर्वी भिडे याने त्याच्या बागेतील "आंबे खाल्ल्याने मुले होतात" असा अजब दावा केला होता. नुकतीच कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीत भिडेच्या धारकऱ्याचा हात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनाकडून करण्यात येत आहे. काल परवाच महात्मा गांधी यांच्या वडीलाबद्दल चुकीचे विधान करून भिडेने पुन्हा एकदा सामाजिक वातावरण बिघडवले त्यामुळे समाजाच्या सर्वच स्तरातून त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आला आहे.

भिडेला अटक का होत नाही?

अनेकदा वादग्रस्त विधाने करूनही गुन्हे दाखल होत नाही. भीमा कोरेगाव सारख्या संवेदनशील घटनेत नाव असतानाही त्याला अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही. इतर संशयित आरोपीस अटक झाली. परंतु या दंगलीत नाव असणाऱ्या भिडेची साधी चौकशी सुद्धा झाली नाही. उलट हे महाशय पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना राजरोसपणे भेटत असतात. त्यामुळे त्याला सरकारचे अभय असल्याचे बोलले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल चुकीचे वक्तव्य करूनही त्याच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी भिडेला अटक का होत नाही,असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सरकारवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला पण त्याला अटक कधी होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags:    

Similar News