बावन्न वर्षे संघाच्या शाखेवर तिरंगा का लावला नाही ? ते आधी सांगा !
घर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्य दिनाला देशातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार आहे. या मोहिमेच्या निमित्ताने बावीस वर्षे संघाच्या शाखेवर तिरंगा का लावला नाही असा परखड सवाल विचारला आहे वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी...
येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. हा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. तशा सुचना राज्य सरकारांनाही देण्यात आल्या आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून 'घरघर तिरंगा !' अशी घोषणा आपल्या इव्हेंटप्रिय प्रधानमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठीचे आदेश व्यवस्थेला दिले आहेत. त्यासाठी अख्ख्या देशाची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. सगळे अधिकारी हातातले काम सोडून याच मोहिमेत सहभागी झालेत. प्रत्येक घरात पोहोचून तिरंगा झेंडा वाटायचा आहे. तो प्रत्येक घरावर लावला जावा यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा ते राष्ट्रध्वज गोळा करून नष्ट करायचे आहेत. हातातली सगळी कामे सोडून प्रशासन याच कामात व्यस्त आहे. या मोहिमेला देशाच्या सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी देशभक्तीचे स्वरूप दिले आहे. पुढील काही दिवस घरा-घरावर तिरंगा लावणे हेच आमच्या देशभक्तीचे सर्टीफाईड देशकार्य असणार आहे. या मोहिमेला कुणी विरोध केला, मतभिन्नता दाखवली तर तो गद्दार, देशद्रोही किंवा पाकधार्जिणा असणार आहे.
या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या रक्तात देशप्रेम आहे. या मातीत ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे तो देशभक्तच आहे. भले तो कोणत्याही जातीचा असला, धर्माचा असला तरी तो देशभक्तच आहे. त्याला कुणी देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटण्याची गरज नाही. सर्वांनाच तिरंग्याबद्दल प्रेम, आत्मियता व श्रध्दा आहे. प्रत्येक भारतीय माणसाचा मानबिंदू तिरंगा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमानाने घरावर तिरंगा फडकवेल यात शंका नाही. कारण त्याच तिरंग्यासाठी या देशातल्या हजारो लोकांनी बलिदान दिले आहे. अनेकांनी छातीवर गोळ्या झेलल्या पण तिरंगा मातीत पडू दिला नाही. धनसुख वाणी, शामलाल या छोट्या छोट्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या पण तिरंगा मातीत पडू दिला नाही. देश अजून धनसुख वाणीचे, तमाम स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान विसरलेला नाही आणि संघाच्या शाखेवर बावन्न वर्षे तिरंगा फडकवला गेला नव्हता हे ही विसरला नाही.
याचा निषेध म्हणून काही लोकांनी आंदोलन केले. नागपुरातल्या संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबागेत घुसून तिथे तिरंगा फडकवला. त्या आंदोलकांच्यावर रेशीमबागवाल्यांनी केस केली. त्यांना अटक करावयास लावली. ही घटना २६ जानेवारी २००१ साली घडली. बाबा मेंढे, रमेश काळंबी आणि दिलीप चट्टानी अशी त्यांची नावे आहेत. याच बहाद्दूरांनी संघाच्या कार्यालयात घुसून तिरंगा फडकावला होता. राष्ट्रप्रेमी युवा दलाचे ते कार्यकर्ते होते. या कार्यकर्त्यांची २०१३ मध्ये कोर्टाने निर्दोष सुटका केली. ज्यांनी संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकावला त्यांना गुन्हेगार ठरवून तुरूंगात पाठवणारे, केस टाकून अटक करायला लावणारे देशभक्तीची भाषा कुणाला शिकवत आहेत ? संघाला तिरंग्याचे वावडे नव्हते तर कार्यालयावर तिरंगा फडकावणा-यांना माफ का केले नाही ? त्यांच्यावर केस का टाकली ? त्यांना तुरूंगात का पाठवले ? या प्रश्नांची उत्तरं आता "घरघर तिरंगा ।" म्हणून छाती बडवणारे देतील का ? आपला भुतकाळ भारतीय जनतेला कळू नये यासाठी ही सगळी नौटंकी चालू आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढण्याची गरज असताना संघाने स्वातंत्र्य लढ्यात सहभागच घेतला नाही. केशव बळीराम हेगडेवारांनी पत्र लिहून चलेजाव चळवळीत सहभागी होवू नका असे स्वयंसेवकांना सांगितले होते. काहींनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणा-या स्वातंत्र्य सेनानींची माहिती पोलिसांनी दिली, त्यांना पकडून ज्यांनी दिले तेच आज मोठ्या आवाजात देशभक्तीची भाषा करत आहेत यासारखा मोठा विनोद नाही. देश स्वतंत्र होण्यापुर्वी स्वातंत्र्य संग्रामात संघाचे योगदान काय ? गोळवलकर, हेगडेवार तेव्हा काय करत होते ? याचा प्रामाणिक लेखाजोखा संघाने देशासमोर मांडावा.
संघाचे हेडगेवार, गोळवळकर आणि दिनदयाळ उपाध्याय हे प्रेरणापुरूष इतकेच महान आहेत तर मोदी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा गौतम बुध्दांचे, महात्मा गांधींचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचेच नाव का घेतात ? परदेशात जावून, "मै गोलवलकरजी, हेडगेवारजी और दिनदयाल उपाध्याय की भूमीसे आया हू ।" असे का म्हणत नाहीत. परदेशात केशव बळीराम हेडगेवार, माधवराव गोळवळकर यांची नावे मोदी का घेत नाहीत ? त्यांचा वारसा जगाला का सांगत नाहीत ? मोदी संघाचेच स्वयंसेवक आहेत. मग एका संघाच्या स्वयंसेवकाला जगाच्या व्यासपीठावर जावून संघाच्या संस्थापकांची नावे घ्यायला लाज वाटते की काय ? याचे उत्तर घरघर तिरंगावाले देतील का ? संघाला आपला भुतकाळ लोकांना कळू द्यायचा नाही. एखादा स्वत:च चोरी करतो आणि चोरी लपवण्यासाठी चोर चोर असे ओरडत पळत सुटतो, मोठ्याने कांगावा करतो. संघवाले आज देशात तसाच कांगावा करत आहेत. देशात दंगली भडकावण्याच्या आणि आगी लावण्याच्या पलिकडे या लोकांनी काही उदात्त केलेले नाही.आजही यांचे तेच उद्योग सुरू आहेत. यांच्या याच आगलावू वृत्तीमुळे सरदार वल्लभभाई पटेलांनी देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती.
सरदार पटेलांनी देशाचे गृहमंत्री असताना संघावर बंदी का घातली होती ? याचेही उत्तर संघवाल्यांनी देशाला द्यावे. सरदार वल्लभभाई पटेलांचा आभाळाला भिडणारा पुतळा बांधला तरी हे सत्य त्या पुतळ्याआड लपणार नाही. ते लपावे यासाठी जोरजोरात देशभक्तीची भाषा बोलायची, भारत माता की जय बोलायचं. इतरांनी बोला असा जाणिवपुर्वक आग्रह, जबरदस्ती करायची. हा सगळा खटाटोप आपला भुतकाळातला आगलाऊ चेहरा झाकण्यासाठीच सुरू आहे. देशातल्या जनतेला हे कळते आहे. देशातल्यी जनतेचे देशप्रेम कुणाला दाखवण्याची गरज नाही. त्यासाठी कुणा भामट्यांकडून प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही. तिरंगा हा आमची आन,बाण,शान आहे. तो आमचा मानबिंदू आहे. तो दिमाखात आमच्या घरावर फडकेलच पण तुमच्या शाखेवर बावन्न वर्षे का फडकवला जात नव्हता ? तेव्हा तुम्ही त्याला अशुभ का म्हणत होता ? याची उत्तरेही स्वत:च्या गिर्रेबानमध्ये झोकून द्या.
घरा-घरावर तिरंगा फडकवण्याला, या संकल्पनेला विरोध नाही पण या मागचा छुपा अजेंडा नक्की काय आहे ? भुतकाळातील स्वत:च्या नालायकीचे भुत दडपण्याचा व सद्यस्थिती नजरेआड करण्याचा हा खटाटोप आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळलाय. नोटबंदीचे तीनतेरा झाले. नोटबंदी केल्यावर कर्जे स्वस्त होतील म्हणणारे भामटे आज सापडत नाहीत. मोदी सत्तेत आले की पेट्रोल तीस रूपयांनी लिटर होईल म्हणणारे बदमाष आज पुढे येत नाहीत. काळा पैसा देशात आणणार आणि दिल्लीपासून देशातल्या प्रत्येक गावापर्यंत पक्का रस्ता करणार, वर्षाला अडीच रोटी रोजगार देणार म्हणणारे भामटे आज समोर येत नाहीत. गँस सिलेंडर चारशे रूपये झाला म्हणून दिल्लीच्या चौकात आकांडतांडव करणा-या स्मृती इराणी पुढे येत नाहीत. देश का रूपय्या कैेसे गिरता है ?
असा सवाल करत दंगा करणारे, ये ऐसे नही होता मित्रो, मै शासन मे बैठा हू, मुझे मालूम है । म्हणणारे आज घसरणा-या रूपयाबद्दल बोलत नाहीत. चकार शब्द काढत नाहीत. नोटबंदी फसली तर चौकात जाहिर फाशी द्या बोलणारे नोटबंदीचे नावही घेत नाहीत. त्याचा हिशोब देशाला देत नाहीत. "बहूत हुई महँगाई की मार ।" बोलणारे कुठल्या कोप-यात 'गपगार' पडलेत माहित नाही. हे सगळं सगळं दडपण्यासाठीच ही नाटकं चालू आहेत. लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी, त्यांना नेहमी भ्रमात ठेवण्यासाठी हे सर्व चालू आहे. कधी भारत-पाक, कधी "भारत माता की जय ।" कधी हिंदू-मुस्लिम तर कधी "घरघर तिरंगा ।" अशी नौटंकी करतात. सत्तेत येताना वेगळी स्वप्ने दाखवली. अच्छे दिनाचे वादे केले आणि सात-आठ वर्षात ते सगळे बकवास साबित झाले. आपली बोगसगिरी लपवण्यासाठीच हा देशभक्तीचा कांगावा सुरू आहे. मोदीजी, देशाला लागलेली 'घरघर' आधी आवरा मग घरघर तिरंगा फडकवा इतकीच विनंती.