महाराष्ट्राला ‘पुरोगामी’ हे बिरुद अचानक मिळालं का? शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र खरंच त्यांच्या विचारांचा वारसा जपतोय का? कारण डॉ. नरेंद्र दाभोळकर (narendra dabholkar) सारख्या विवेकी विचाऱ्यांच्या व्यक्तीची हत्या होऊन 7 वर्षे उलटली तरीही पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र त्यांच्या खुन्यांना शोधू शकला नाही. त्यांच्या खुन्यांना शोधण्यासाठी रस्त्यावर उतरला नाही.
विचारांची ओळख असलेल्या महाराष्ट्रात ठराविक जातीतील व्यक्तींवर अन्याय झाला. म्हणून प्रत्येक जाती चे अनेक मोर्चे निघाले. मात्र, विवेक विचार मांडणाऱ्या दाभोळकर यांना न्याय मिळावा म्हणून किती लोकांनी मोर्चे काढले? डॉ. राममनोहर लोहिया म्हणायचे...
“अगर सड़कें खामोश हो जांए तो संसद आवारा हो जाएगी...”
मात्र, अलिकडे लोकांनी मोर्चे काढले तरच न्यायालयाचे निकाल लवकर लागतात.
त्यामुळं आता... अगर सड़कें खामोश हो जांए तो “न्यायमंडल” आवारा हो जाएंगे....
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अलिकडे ज्या ज्या खटल्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात. त्यांनाच न्याय मिळतो. आता हा एक योगायोग आहे की, वस्तुस्थिती... तुम्हाला हवं ते म्हणू शकता... थोडक्यात अलिकडचे निकाल पाहिल्यानंतर न्यायालय देखील जनभावना पाहून न्याय द्यायला लागलं आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हे ही वाचा...
sushant singh rajput case: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!
कोरोना रुग्णांची माहिती RSSला दिल्याचा आरोप, मानवी हक्कांच्या उल्लंघनाची तक्रार
दाभोळकरांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक कधी होणार?- मुक्ता दाभोळकर
मुंबईकरांना दिलासा, पाणीकपात 10 टक्क्यांनी कमी
पुर्वी रस्त्यावरील मोर्चाचा परिणाम संसदेवर होत असे, आता तो न्यायपालिकांवर होत आहे. तसं जर नसतं तर दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासाला इतकी वर्ष लागलीच नसती. मात्र, पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व शेवटच्या श्वासापर्यंत पुढं नेण्याचं काम करणाऱ्या दाभोळकर यांच्या मृत्यू नंतर 7 वर्षात महाराष्ट्रातील जनता इथल्या सरकारवर एका विवेकी व्यक्तीसाठी दबाव आणू शकली नाही. त्यामुळंच हा तपास रखडला. असंच म्हणावं लागेल.
अलीकडे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput)आत्महत्या प्रकरणच पाहा. अनेक राजकारण्यांनी सुशांत सिंह हत्या प्रकरणात चांगलाच रस दाखवला आहे. सुशांत ला न्याय मिळावा ही भावना योग्यच आहे. मात्र, पुरोगामी महाराष्ट्रात विवेकी विचारांचा पताका पुढं नेणाऱ्या एका विवेकी माणसाची हत्या होते. तरीही कोणताही नेता रस्त्यावर उतरुन आंदोलन करत नाही. कोणत्याही नेत्याचा मुलगा ट्विट करत नाही.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ‘सत्यमेव जयते’ व्हावे असं वाटतं. तर मग दाभोळकर प्रकरणात का नाही? असा प्रश्न इथल्या जनतेने विचारायला हवा. इथल्या माध्यमांनी दाभोळकर हत्येचा तपास लागावा. म्हणून किती प्राईम टाइम शो केले. इथल्या माध्यमांनी जनमानसात दाभोळकरांच्या हत्येबाबत किती जागृकता निर्माण केली.?
राजकीय पक्ष, मीडिया, सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा, न्यायपालिका सुशांत च्या बाबतीत ज्या वेगाने तपास करत आहेत. त्या वेगाने दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास का केला जात नाही? शेतकरी आत्महत्येबाबत का सरकारी यंत्रणा तत्पर होत नाही? हा माझ्यासारख्या अनेक विवेकी माणसांना पडलेला हा प्रश्न आहे.
हा सर्व प्रकार इथं घडत आहे. याचं कारण एकच आहे. आपण आपलं पुरोगामित्व विसरलो आहोत. शाहू, फुले, आंबेडकर आपण भाषण आणि तस्बीरी पुरते मर्यादीत ठेवले आहेत. विचारांचा वारसा मागे पडत चालला आहे. पुजकांचा वारसा वाढला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात चित्रपटातील नायकाचा मृत्यू झाल्यास हळहळ व्यक्त केली जाते. तपास यंत्रणा जाग्या होतात. राज्यकर्ते ट्विट करतात. मात्र, विवेकी विचारांच्या दाभोळकरांचा मृत्यू होऊन 7 वर्षे उलटले तरी कोणालाही त्याचं काही वाटत नाही.
इतिहास सांगतो...
जेव्हा जेव्हा लोक विचारांपेक्षा व्यक्तीचे, तस्बीरींचे पुजक बनतात. तेव्हा समाज अधोगतीकडे वाटचाल करतो. सध्या तशी काही परिस्थिती आहे का? या महाराष्ट्रातील जनतेचा विवेक जागृत करण्यासाठी अनेक लोकांचा जीव गेला... अनेकांनी आपलं आयुष्य झिजवलं. तेव्हा कुठं महाराष्ट्राला पुरोगामित्वाची बिरुदावली मिरवता आली. मात्र, पुरोगामी महाराष्ट्राला त्यांच स्मरण होतं का? जर स्मरण होत असेल तर दाभोलकर,कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यासारख्या विवेकी विचारांच्या व्यक्तींच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या शक्तींविरोधात आवाज उठवू या! विवेकाचा आवाज बुलंद करुया! महाराष्ट्राचं पुरोगामित्व जपुया... दाभोळकरांना न्याय मिळवून देऊया!...