नास्तिकता-निधर्मी-धर्मनिरपेक्ष
अलिकडच्या काळात नास्तिकता, निधर्म, धर्मनिरपेक्ष हे शब्द जगभरात चर्चेचे विषय ठरले आहेत. मात्र, प्रत्येक देशामध्ये या शब्दाचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि ज्या देशाने या शब्दाऐवजी इतर बाबींचा अवलंब केला? त्यांची नक्की काय परिस्थिती आहे? वाचा आनंद शितोळे यांचा लेख
समूह-टोळ्याचं नियंत्रण-प्रशासन-धर्म-संस्कृती हे सगळं जगात आगेमागे सुरु झालेलं. राष्ट्र ही संकल्पना अगदी नजीकच्या काळातली. जगातला धर्माचा, संस्कृतीचा इतिहास पाहता राष्ट्र संकल्पना अगदीच नवीन म्हणावी. आजच्या जगात राष्ट्र-देश संकल्पना, देशाच्या सीमा-परराष्ट्रधोरण-हितसंबंध या बाबी महत्वाच्या आहेत.
आधुनिक जगात, मागच्या दोन तीनशे वर्षाचा कालखंड पाहता ज्या ज्या देशात धर्म देशापेक्षा मोठा झालेला आहे तिथे तिथे देशाची प्रगती खुंटलेली आहे किंवा देश भरकटत गेलेले आहेत. जिथे देशातल्या लोकांचा धर्म वेगळा आणि देशाची राजकीय व्यवस्था वेगळी ही आखणी स्पष्ट आणि स्वच्छ आहे. तिथे देशांनी आणि नागरिकांनी प्रगती केलेली आहे. मात्र, या काळात एक गोष्ट समान आहे आणि सातत्यपूर्ण आहे.
जगातले विकसित, विकसीनशील देश कदाचित देशाचा कुठला अधिकृत धर्म सांगत नसले तरी नागरिकांचा मात्र, कुठला का होईना धर्म आहे. स्थानिक पातळीवर असणारे पंथ उपपंथ आहेत. मात्र, सगळेच नागरिक निधर्मी असलेला देश बहुदा अस्तित्वात नसावा.
हा वास्तव आधी आपण स्विकारलं की मग पुढल्या काही महत्वाच्या बाबी. जगभरातल्या नास्तिकांना, धर्म ही अफूची गोळी आहे अस ठामपणे वाटणाऱ्या लोकांची संख्या अल्प असली तरीही त्यांच अस्तित्व आहे. या निधर्मी-नास्तिक लोकांमध्ये ९९.९९ टक्के लोक सुशिक्षित आहेत. साक्षरता आणि सुशिक्षित असणं या भिन्न बाबी आहेत.
आपण आपल्या घरापुरता विचार करायचा म्हटला तर भारतात सगळ्यात जास्त साक्षरता असलेल राज्य केरळ आहे. मात्र तिथली नास्तिकांची-निधर्मी असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? धर्म अफूची गोळी मानणाऱ्या साम्यवादी विचारसरणीला निवडून देणाऱ्या बंगाल आणि केरळ मध्ये धार्मिकता पाळणारी जनता मोठ्या संख्येने आहे. ही धार्मिकता पाळणारी जनता साम्यवादी पक्षाला निवडून देताना आपली धार्मिकता आपल्याजवळ ठेवून नागरिक म्हणून विचार करते.
संपूर्ण देशाचा विचार करता साक्षरता अजूनही पुरेशी नाहीये, धर्म नाकारण्याची, नास्तिकतेकडे वाटचाल करण्याची गोष्ट अजून लांबची. इथल्या लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग धर्म आहे. हे निखळ सत्य आधी स्विकारलं पाहिजे.
हे जमलं तर मग लोकांना नास्तिक करणे, धर्मच नाकारणे हा टोकाला जाण्याचा प्रकार टाळून लोकांनी आपापला धर्म पाळून नागरिक म्हणून आपली कर्तव्य पाळावीत हा मध्यममार्ग सगळ्यात उपयुक्त, सोयीस्कर आणि व्यवहारिक ठरतो.
हा भारतीय समाजमनाचा अचूक अंदाज आणि अभ्यास असलेल्या ज्योतीराव फुलेंनी जगाची निर्मिती करणारा निर्मिक म्हणून कुणीतरी आहे हे सांगितलं.
यापुढलं पाउल टाकलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी. जन्मदत्त हिंदू धर्मात अनेक त्रुटी असताना तो धर्म त्यागण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यावर त्यांना निधर्मी-नास्तिक म्हणून जगणं अवघड किंवा अशक्य नक्कीच नव्हतं. त्यामागची कारण ते सहजपणे आणि तर्कशुद्ध पद्धतीने नक्कीच सांगू शकले असते.
पण त्यांचा अनुयायी असलेला समाज, एकूण भारतीय समाज हा धार्मिक आहे, धर्म त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे समजून घेतल्याने हिंदू धर्माचा त्याग केल्यावर त्याला पर्यायी उत्तर आवश्यक होत आणि त्यांनी ते तर्कशुद्ध विचारांनी चालणारा बौद्ध धर्म स्विकारला.
मी धर्म नाकारला, मी नास्तिक झालो, मला ज्ञान झालं, मला धर्माचा फोलपणा समजला तरी बहुसंख्य जनतेला निधर्मी नास्तिक करायला शेकडो वर्षे लागतील हे समजल्यावर उरलेला पर्याय कोणता?
नागरिकांचा धर्म त्यांचा व्यक्तिगत विषय असावा. देश मात्र, कायदेकानून, संविधान आणि नियमांनी चालावा जिथे देशाचा स्वतःचा कुठलाही अधिकृत धर्म नसेल. ही व्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे. निधर्मी असणे आणि धर्मनिरपेक्ष असण या दोन वेगळ्या बाबी आहेत हेही नीट समजलं पाहिजे.
ही नागरिकांचा धर्म आणि देशाचं संविधान या बाबी वेगवेगळ्या ठेवण्याची शहाणीव, भान स्वातंत्र्य मिळताना असलेल्या नेत्यांना होतं. म्हणून ७० वर्षांनी भारत अजूनतरी लोकशाही देश आहे. मात्र, आसपासचे शेजारी देश जे एकधर्मीय राजवटीच्या नादाला लागले त्यांच्या नशिबी लष्करी हुकुमशहा आणि फरफट आलेली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे हे नास्तिक निधर्मी लोक कट्टरपंथी लोकांच्या सगळ्यात जास्त आवडीचे असतात. जेवढी जास्त टीका निधर्मी नास्तिक लोक सश्रद्ध लोकांवर करतात. तेवढ्या झपाट्याने ही सामान्य जनता कट्टरपंथी लोकांच्या नादाला लागते आणि कट्टरपंथी लोकांनाही मग 'धर्म खतरमे' म्हणत लोकांना मूर्खात काढणे सोपे होऊन जाते.
देश, समाज सुधारायचा असला तर थेट धर्म नाकारायची भूमिका घेणाऱ्या लोकांना देशच नाकारून टाकतो ते का आणि ही बुद्धिमान माणसं ज्यांना खरोखर तळमळ आहे ती राजकीय परिघाच्या बाहेर फेकली जातात किंवा अस्वीकृत होतात. त्यामागच हे कारण इतक्या सुशिक्षित आणि बुद्धिमान कळू नये हेही एक नवलंच.
(लेखक : आनंद शितोळे ब्लाॅगर आहेत. ते घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेत फेसबुकवर आपलं मत व्यक्त करतात)