भारतात धर्मांधपणा का वाढला?
गांधी विचाराने जगणारा भारत "छोडो कल की बाते..." म्हणत नव्या जगाकडे आशादायीपणे जगणारा भारतीय समाज हिंसेचे आकर्षण ते गाय, गोबर आणि गोमुत्रापर्यंत कसा आला? वाढत्या धर्मवादाचं मुख्य कारण काय? वाचा संजय सोनवणी यांचा भविष्याचा वेध घेणारा लेख;
कोणताही समाज आपल्या भविष्याची नेमकी कोणती दिशा पकडणार हे त्या समाजात कोणते सामाजिक तत्वज्ञान आणि तेही कोणत्या प्रतीचे रुजले आहे यावरुन ठरते. समाजात एकाच वेळीस अनेकविध आणि परस्परविरोधीही तत्वज्ञानांचे सह-अस्तित्व असू शकते आणि किंबहूना तेच अभिप्रेत असते. पण महत्वाचे हे असते की त्या तत्वज्ञानांची प्रत काय आणि त्याकडे पाहण्याचा नेमका दृष्टीकोन काय हा.
या दृष्टीने आपण आपल्या भारतीय समाजाकडे पाहिले तर लक्षात येईल की आपल्या सर्वच प्रकारच्या, अगदी धर्मवादीही, कमालीचा उथळपणा आलेला आहे. गांधीवादाने भारावून गेलेला समाज कधी ना कधी त्या गारुडातून बाहेर पडणारच होता. कोणतेही एकच एक तत्वज्ञान समाजाला कायम स्वरुपी जखडून ठेवू शकत नाही हा जागतीक इतिहासाचा निर्वाळा आहे. पण गांधीवाद विखरत विरळ होत असतांना चिरंतन मुल्ये कायम ठेवत त्या वादाला आधुनिक बनवण्यात गांधीवादी विचारक अयशस्वी झाले आणि स्वभावत:च फार लवकर हा वाद अडगळीत गेला. म्हणजे गांधी जगद्वंद्य राहिलेच पण गांधी तत्वज्ञान मात्र पद्धतशीरपणे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला.
गांधीवादाचे अनेक विरोधक त्यांच्या हयातीतच होते. गांधी विरोध का हे तत्वज्ञान का नको याचा तात्विक विरोध समर्थपणे उभा करण्याऐवजी त्यांनी गांधीहत्या हे अत्यंत सोपे उत्तर त्यांनी निवडले. धर्मवाद व राष्ट्रवाद या पुरेशा स्पष्ट नसलेल्या संकल्पना घेत, हिंदू शब्दाची व्याख्याही न करता हिंदुत्ववादाच्या नावाखाली उथळ वैदिकवाद उराशी जपत तत्वज्ञान न बनवता उथळ पद्धतीने बुद्धीभेदाचे हत्यार वापरत राहिले. मुसलमानांच्या स्वातंत्र्यपूर्व म्हणा की स्वातंत्र्योत्तर काळातील प्रवृत्तींनी मुस्लिम द्वेष हे त्यांचे अजून एक अधिकचे नकारात्मक आणि प्रश्न वाढवणारेच तत्वज्ञान हिंदुंना भानावर आणण्यापेक्षा द्वेषाने ओतप्रोत करण्यासाठी उभे राहिले. त्यासाठी हिंदुंचेही ब्रेनवाशिंग करत त्यांनाही आपले प्यादी म्हणून वापरायची सोय लावली. सामाजिक तत्वज्ञान अत्यंत सावकाशपणे प्रगल्भतेकडून उथळतेकडे वाटचील करत राहिले. त्यात नवनिर्माणाचे कोठेही सुतोवाच नव्हते.
नागरिकांचे स्वातंत्र्य मर्यादित करणारा समाजवाद मानवी जीवनासाठी योग्य नाही असे गांधीजी म्हणाले होते. तरीही स्वतंत्र भारताने समाजवाद स्विकारला. त्यातील तोटे वगळले तरी अणूशक्ती, स्पेस रिसर्च ते भारतात धरणांपासुन अवजड उद्योग उभारण्यात गुंतलेला आणि "छोडो कल की बाते..." म्हणत नव्या जगाकडे आशादायकपणे पाहू लागलेला भारतीय समाज हिंसेचे आकर्षण ते गाय, गोबर आणि गोमुत्रापर्यंत कसा आला हेच कोणाला समजले नाही.
याची कारणे समाजवादाच्या जोखडातून योग्य वेळी सुटका करुन घेण्यातले आणि स्वतंत्रतावादाची मुल्ये आधुनिक परिप्रेक्षात रुजवण्याचे प्रयत्न करण्यातले घोर अपयश होते. गुलामी लादण्यात समाजवाद नेहमीच हितकारी ठरतो. त्यामुळे नागरिक सरकारावलंबी होतात. वैदिकवाद्यांना समाजवाद हवा होता तो गुलाम मानसिकता उत्पन्न करण्यासाठी. त्यात ते यशस्वी झाले कारण समाजाने समाजवादातील अवमुल्ये जपण्यात धन्यता मानली. भ्रष्टाचार, लाचखोरी वाढली तर नैतीक मानवी मुल्यांचा -हास झपाट्याने होत गेला.
भारताने उदारीकरण धोरण घेतले तेही विचारपुर्वक नव्हते तर अत्यंत नाईलाजाने. भारताला मानसिक दृष्ट्या हे अर्धवट उदारीकरण पचले नाही. कारण त्यासाठी मुळात त्याचीही तात्विक मांडणी झाली नाही. त्याचे ऐहिक फायदे झाले पण मानसिकताच उथळ राहिल्याने भारताचे उदारीकरण एकतर्फी तर झालेच पण समाजात उभी दुही पडली. म्हणजे उद्योग-व्यवसाय विश्व उदारीकरणात पण शेती-पशुपालन-मत्स्योद्योग मात्र, समाजवादी बंधनांच्या विळख्यात.
एकाच समाजात असे दुटप्पी धोरण आले तरी त्यावर अपवाद वगळता आवाज उठला नाही. यामुळे समाजात निर्माण होणा-या नव्या फुटीची तत्वमिमांसाही झाली नाही. परिणामी प्रगतीशील आत्मविश्वासाने ओतप्रोत भरून नवे जग घडवायला निघालेली पिढी निर्माण न होता आरक्षणाच्या रांगेत उभी असलेली पिढी निर्माण झाली.
जो धर्मच नीट माहित नाही, जे राष्ट्रही नीट माहित नाही असला उथळ, एकांगी आणि हिंस्त्र धर्मवाद आणि राष्ट्रवाद रुजला आणि फोफावला याचे कारण मुळात कोणतेही सामाजिक/राजकीय तत्वज्ञान न समजलेल्या पिढीच्या हतबल मानसिकतेत आहे. दारिद्र्य हे हिंस्रतेला खतपाणी घालते. हे दुधारी शस्त्र आहे. ते शस्त्र वैदिकवाद्यांना आणि इस्लामवाद्यांना श्रेय:स्कर वाटत आले असले तरी ते त्यांच्यावरच उलटू शकते याचे भान राहिलेले नाही.
आणि याहीपार जात, नवे अर्थ आणि राजकीय तत्वज्ञान जन्माला घालण्याची बौद्धीक ऐपत भारतीयांनी कधीच दाखवली नाही. जी उपलब्ध तत्वज्ञाने आहे तीही नीट आत्मसात न करता त्यांचे उथळ अवलंब करत राहिले व रसातळाच्या दिशेने वाटचाल करत राहिले. आज एका वेगळ्याच वळणावर भारतीय समाज आला असून त्याचे एकंदरीत मानसिकता अशा बौद्धिक विकलांगतेकडे का वाटचाल करत आहे हे तपासायला हवे. अगदी धर्मवादही नीट तपासला पाहिजे.
अन्यथा हा दिशांध आणि भेसळ आणि उथळ तत्वज्ञानाच्या दलदलीत सापडलेला भारतीय जनप्रवाह कधीही वाहता होणार नाही. त्याचे सडलेले आणि सुकत जाणारे डबके बनेल याबाबत कोणी शंका घ्यायचे कारण नाही.