धर्म-जात-इतिहासाच्या जीवावर तयार झालेल्या झुंडीला धोरणांच्या औषधांचा उतारा गरजेचा !
सध्या देशातील राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक वातावरणावर चर्चा होत आहे. पण राजकारण आणि धर्माच्या मोनोपॉलीचं राजकारण नेमके कोणते वास्तव दडपण्यासाठी केले जाते, झुंडींच्या राजकारणात हरवलेला भारत कसा शोधायचा, त्यावरील उपाय काय, एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय? या सगळ्याचे विश्लेषण केले आहे आयटी क्षेत्रातील चंद्रशेखर जगदाळे या तरुणाने....
या देशात किंवा जगातच उघडपणे भांडवलदारांची तळी उचलता येत नाही. तसे झाल्यास समाजाच्या सर्वच थरातून त्याला विरोध होतो. याचे कारण काय तर - बव्हंशी भांडवलशाही ही शोषणावर आधारित व्यवस्था आहे. अशा उद्योगधंद्यांना मानवी आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आणि भौगोलिक साधनसंपत्तीवर एकहाती वर्चस्व गाजवायचे असते. या भावनेतूनच Monopoly-मोनोपॉली ह्या संकल्पनेचा उदय झाला असावा. मोनोपॉली आली म्हटलं की कामगार, नोकरदार आणि ग्राहकांचे शोषण आलेच. सामान्य जनतेला ह्या व्याख्या माहिती नसल्या तरी अशा संकल्पना त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर रुजलेल्या असतात. स्वाभाविकपणे कोणत्याही मानवी मनाला अन्यायाविरुद्ध चीड असतेच. आणि म्हणूनच उघडपणे उद्योगपतींना अशा गोष्टी करता येत नाहीत. या गरजेतूनच देशाच्या एकूणच साधन संपत्तीवर वर्चस्व ठेवण्यासाठी छुप्या मार्गांचा अवलंब केला जातो.
ह्या छुप्या मार्गांचा वापर करण्यासाठी दोन महत्त्वाची साधने म्हणजे - धर्मसत्ता आणि राज्यसत्ता. स्वार्थी अर्थनीती राबवण्यासाठी छुप्या पद्धतीने धर्मसत्ता आणि राज्य सत्तेची मोनोपॉली ह्या कामात वापरली जाते. सामान्य मानवी मनाला ज्याप्रमाणे अर्थकारणातली मोनोपॉली आवडत नाही; तशी धर्मसत्ता आणि राज्यसत्तेत मोनोपॉली असली तरी त्याचे त्यांना सोयरसुतक नसते किंवा कदाचित ती त्यांना आवडतच असते. मूर्तिपूजा किंवा व्यक्तीपूजा हे त्याचेच द्योतक आहे. अर्थकारणातला अन्याय आपल्याला सहजपणे कळून येतो पण धर्मात-राजकारणात झालेला अन्याय समजून घेणे थोडेसे कठीणच असते. कारण धर्म आणि राजकारण हे मानसिक पातळीवर काम करत असतात. अर्थकारण मात्र आपल्याला उघड्या डोळ्याने दिसते, जाणवते, समजते.
मानवाच्या अध्यात्मिक गरजेतून धर्म निर्माण झाला, तशी ही गरज रास्तच. अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा शोध होय, असे येथे नमूद करावे वाटते. कारण बऱ्याचदा अध्यात्मिक म्हटलं की अगदी हुशार लोकसुद्धा त्याचा अर्थ देवभोळेपणा किंवा धार्मिक कर्मकांड अशा आशयाने घेतात. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे त्यांनी अध्यात्माचा असा विपर्यास्त अर्थ स्वतःसाठी करून घेतलेला असतो, तो अर्थ मला इथे अभिप्रेत नाही. मानवी मनाच्या जिज्ञासेची तहान भागवणे म्हणजे अध्यात्म, अशा अर्थाने मी हा शब्द वापरत आहे. स्वतःच्या आत्म्याचा किंवा अस्तित्वाचा शोध घेणे ही गोष्ट खरंच सुखावह असते, मनाला शांती देते. धर्माचा जन्मच तर्काच्या आधारावर झालेला आहे. मग अशा मूळ स्वरूपातल्या धर्माला स्वार्थी अर्थनीतीसाठी वापरून घेणे अवघडच आहे. म्हणून समाजावर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर निरंकुश सत्ता गाजवण्यासाठी पहिली पायरी येते ती म्हणजे धर्माचा विपर्यास करणे. मूळ धर्मात सांगितलेल्या तर्काऐवजी त्यात अमानवी, अनैसर्गिक, अतार्किक गोष्टी घुसडून समाजाला कर्मकांडात अडकवले जाते. तर्काच्या आधारावर जन्म घेतलेल्या धर्मात कर्मकांडाचे अतार्किक बीज आले की तो धर्म पोकळ बनतो. त्याआधारे समाजाची दिशाभूल करून त्याचा हवा तसा वापर करता येतो, शोषण करता येते. शिवाय ही धर्माची मोनोपॉली असल्यामुळे समाजाला त्याचे काहीच सोयरसुतक नसते किंवा त्याला या अन्यायाची जाणीवच होत नाही.
राजसत्तेचे गणित धर्मसत्तेपेक्षा थोडेसे वेगळे आहे. न्याय-कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे हे राजसत्तेचे मूळ काम आहे. कोणतीही व्यवस्था ही जरी निर्जीव गोष्ट वाटत असली तरी ती शेवटी माणसांपासूनच बनलेली असते. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही काही न्यायप्रिय सनदशीर आणि कायद्याच्या चौकटीत वागणारी नसते. त्याची कारणे बरीच असू शकतात पण तो इथला मूळ मुद्दा नाही. नियमात आणि कायद्यात न वागणाऱ्या लोकांचा राजसत्ता बरोबर वापर करून घेत असते आणि जन्म घेतो भ्रष्टाचार. भ्रष्टाचार जर पचवायचा असेल तर - तेरी भी चूप मेरी भी चुप ह्या न्यायाने प्रशासनातल्या सर्वच लोकांना वागावे लागते. कोणी कितीही दणकून भ्रष्टाचार केला तरी तो उघडपणे मांडणे, बोलणे, सिद्ध करणे अवघडच असते. कारण तो व्यवस्थेच्या प्रत्येक पातळीत होत असतो आणि व्यवस्थेला पोखरून काढतो. अशा पद्धतीने छुप्या भ्रष्टाचारामुळे राजसत्ता सुद्धा पोकळ बनते. मग तिचा वापरही सगळ्या क्षेत्रातली मलई किंवा गावाकडच्या भाषेत - मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी केला जातो.
गेल्या काही वर्षांपासून भारतात सर्वच प्रकारच्या साधनसंपत्तीत वाटा मिळविण्यासाठी अगदी दोन ते तीनच कुटुंबांची ओढाताण सुरू आहे. त्याचे जास्त तपशील देण्याची गरज नाही. खाणी , खनिज तेल, रस्ते, बंदर, विमानतळ, रेल्वे मार्ग, इंटरनेट, ई-कॉमर्स, कपडेलत्ते, खाद्यतेल,मीठ, वृत्तवाहिन्या अशा देशातल्या सगळ्याच गोष्टींवर त्यांची मालकी आहे, नियंत्रण आहे. कोणत्याही प्रकारातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वाटा जेव्हा या दोन तीन उद्योगांना दिला जातो, तेव्हा त्या मुद्द्यांची चर्चा होऊ नये म्हणून नेमकी वेळ साधून कोणते तरी धार्मिक-सामाजिक प्रकरण वर काढले जाते. समाजातला अगदी हुशारातल्या हुशार लोकांना धार्मिक बाबींचा बौद्धिक कीस पाडण्यासाठी अत्यंत चलाखीने गुंतवले जाते. आणि आपणही त्या जाळ्यात बरोबर अडकले जातो. हा narrative चा खेळ समजणे भल्याभल्यांना जमत नाही. असो.
सरकारी धोरण काय आहे ? त्याचा समाजावर काय आर्थिक परिणाम होईल ? त्या दृष्टीने समाजाचे प्रबोधन कसे करावे लागेल ? अशा असंख्य आर्थिक बाबी आपण दुर्लक्षित करतो. सरकारवर, ह्या उद्योगपतींवर नियंत्रण ठेवायचं असेल तर धोरण-अभ्यास करणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. सरकारवरती दबाव आणण्याचे सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे धोरणांवर योग्य ते प्रश्न विचारणे आणि हो.. योग्य वेळी विचारणे. सध्या समाजातला सगळ्यात हुशार वर्ग ते सोडून सगळ्या गोष्टी करताना दिसत आहे, ह्याबद्दल मला खेद वाटतो. जोपर्यंत आपण सरकारला त्यांच्या धोरणांचा अभ्यास करून त्यांना कोंडीत पकडत नाही, त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांना धारेवर धरत नाही, समाजातल्या तळागाळापर्यंत सरकारी धोरणाचे अपयश आपण पोहोचवत नाही तोपर्यंत काहीच फायदा नाही. इंग्रजीत enabler नावाचा एक शब्द आहे, त्याचा अर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीला हातभार लावणारा.
महत्वाचे धोरणविषयक निर्णय देशात होत असताना जर आपण जातीय, धार्मिक, संस्कृतिक, ऐतिहासिक गोष्टींवरती वाद घालत असू, आपली शक्ती वाया घालवत असू तर त्याचा काहीच उपयोग नाही. आपणपण अन्यायाचे enabler आहोत. कारण आपण आपल्या ज्ञानाचा फायदा हा धोरणविषयक प्रबोधनासाठी न करता जर अनिष्ट शक्तींना हव्या असलेल्या गोष्टींवरती वाद घालत असू तर त्याचा उपयोग शून्य आहे. आज भारत अंधकाराच्या दारात उभा आहे, त्याला वाचवायचं असेल तर धोरणांच्या आधारावर आपण समाजात प्रबोधन करणे गरजेचे आहे. धर्म-जात-इतिहासाच्या जीवावर तयार झालेल्या झुंडीला धोरणांच्या औषधाचा उतारा द्यावा लागेल, तरच त्यांना झालेल्या फसवणुकीची, अन्यायाची जाणीव होईल. आपापल्या पातळीवर आपण सरकारी धोरणांचा अभ्यास सुरू करणे गरजेचे आहे. मी आणि माझ्या मित्रांच्या वतीने सुद्धा आम्ही काही उपक्रम राबविण्याच्या तयारीत आहोत. एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र येणे गरजेचे आहे, प्रत्येकाला एकमेकांचा हात धरून दिशा दाखवणे गरजेचे आहे. हरवलेल्या भारताला आर्थिक-धार्मिक-सामाजिक-राजकीय उन्नतीचा मार्ग दाखवणे गरजेचे आहे आणि आपण ते नेटाने करूया.
चंद्रशेखर जगदाळे यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार
लेखकाचा परिचय –
चंद्रशेखर जगदाळे हे सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असून सामाजिक - राजकीय निरीक्षक आहेत