मुस्लिम कट्टरता आहेच : पण त्यावर उपाय काय...? - हेरंब कुलकर्णी
हिजाबचा वाद सध्या सुरू आहे. यावरुन मुस्लिम धर्मातील कट्टरतावाद्यांबद्दल पुरोगामी लोक गप्प का असतात, असा सवालही उपस्थित होतो. याविषयीचे विश्लेषण मांडले आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी....
हिजाबचा वाद सध्या सुरू आहे. यावरुन मुस्लिम धर्मातील कट्टरतावाद्यांबद्दल पुरोगामी लोक गप्प का असतात, असा सवालही उपस्थित होतो. याविषयीचे विश्लेषण मांडले आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी....
फेसबुकवर अनेकदा मुस्लीम जातीयवादाबाबत पुरोगामी गप्प का? अशा प्रकारच्या पोस्ट येतात व tag करून विचारतात की हिंदूविषयी तुम्ही बोलता ? मुस्लिमाबाबत बोलत नाही वटपौर्णिमा वर बोलता बकरी ईद वर बोलत नाही असे सतत सुरु असते..हिजाब च्या निमित्ताने तेच पुन्हा सुरू झाले आहे. त्या सर्व प्रश्नांवर ही उत्तरे
१) सर्वप्रथम हे मान्यच आहे की हिंदू धर्मा मध्ये एक देव एक ग्रंथ नसल्याने व बुद्ध चार्वाक यांच्यापासून महात्मा फुलेंपर्यंत अतिशय बंडखोर संघर्षाचा वारसा असल्याने तुलनेत (पूर्णतः नाही !!!) हिंदू धर्मात उदारमतवाद विकसित होत गेला.मुस्लिम धर्म हा ग्रंथ एक देव ,एक ग्रंथ याच्याशी जोडलेला असल्याने व सुधारणावादी चळवळी फारशा न झाल्याने आजही कट्टरता त्यांच्यात अधिक आहे. हा फरक न करण्यात काहीच अर्थ नाही. हिजाबच्या निमित्ताने ही त्याचेच प्रदर्शन होते आहे. त्यामुळे भगव्या शालींवर टीका करताना हिजाबचा आग्रह कशासाठी ? हा प्रश्नही विचारायला हवा व ते चूक आहे हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.
२) मुस्लिम कट्टरता हा प्रश्न बरोबर असला तरी त्यावर हिंदू संघटन करा किंवा हिंदूंनी आक्रमक व्हा हा मात्र उपाय नाही. मुस्लिम कट्टरता दूर करण्याचे वेगळे उपाय आहेत.
३) भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून ज्या ठिकाणी मुस्लीम जातीयवाद चुकीची भूमिका घेत असेल त्याठिकाणी संविधानाचा आग्रह धरून कायदेशीर मार्गाने त्याचे निर्मूलन केले पाहिजे.रस्त्यात नमाज पडणे,तोंडी तलाक देणे यासारखे कितीतरी विषय कायद्याचे मुद्दे बनवले पाहिजेत.आंदोलनाचे नाही त्यातून कट्टर पंथीयांचे फावते.हिंदूंनी विरोध केला की मुस्लिमांचे नेतृत्व कट्टरपंथी कडे जाते
४) मुस्लिम जातीयवादाला हिंदू जातीयवाद तर उत्तर अजिबात नाही याचे कारण कोणत्याही देशातील बहुसंख्यांक जर आक्रमक झाले तर अल्पसंख्यांक अगोदरच भितीपोटी संघटित असतात. त्यांचे संघटित होण्याचे प्रयत्न अधिक वाढवले जातात व समोरून येणार्या हल्ल्याचा बचाव करण्यासाठी त्यांचा ताबा त्या धर्मातील कट्टरपंथी घेतात व त्यांना अधिक कडवे करतात. याउलट कोणत्याही देशातील बहुसंख्यांक जितके उदारमतवादी होत जातील. त्यांच्या जितक्या सुधारणा वाढत जातील. वैज्ञानिकता वाढत जाईल त्याचे प्रतिबिंब त्या देशातील अल्पसंख्यांकांमध्ये पडत जाते सावित्रीबाईंच्या काळात हिंदू मुली शिकत नव्हत्या त्यामुळे मुस्लिमांच्या शिक्षणाचा तर प्रश्नच नव्हता पण सावित्रीबाई व फातिमाबाई या दोघांनी मुलींच्या शिक्षणाचे प्रयत्न केले. ज्या प्रमाणात हिंदू मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले त्याचे अनुकरण मुस्लिम धर्मी यातही होत गेले. मुली शिकू लागल्या. कर्नाटकात हिजाब घातलेली ती मुलगी स्कुटीवर कॉलेजमध्ये आली आहे या सुखद विसंगतीकडे ही लक्ष द्यायला हवे तिला शिक्षणानेच हे धाडस दिले आधुनिकता काही प्रमाणात आली .हा शिक्षणाचा परिणाम आहे
तेव्हा बहुसंख्यांक सुधारणांचा वेग अल्पसंख्यांकामध्ये संक्रमित होत राहतो.
मुस्लिम कुटुंबनियोजन करत नाहीत,'हम पाच हमारे पचास' अशी बदनामी मुस्लिमांची करताना एक पत्नी व दोनच मुले अशी मुस्लिम कुटुंबे हे प्रातिनिधिक चित्र होत आहे, हे वास्तव बघायला हवे. हा बदल वेगाने होतो आहे.
या प्रयत्नाला गती द्यायची असेल तर बहुसंख्य म्हणून आपण उदारमतवादी अधिक पुरोगामी अधिक विज्ञाननिष्ठा होणे गरजेचे आहे. अनेकांना पटणार नाही आवडणार नाही पण तेच अंतिम सत्य आहे
४) तुम्ही हिंदूंच्या अंधश्रद्धांना विरोध करता मुस्लिमांच्या का नाही ? हा प्रश्न दाभोळकरांपासून अनेकांना अनेकदा विचारला गेला आहे पण त्या त्या धर्मातील व्यक्तींनी प्रयत्न केले तरच अशा अंधश्रद्धा दूर होऊ शकतात हे लक्षात घ्यायला हवे. सतीची चाल पासून मंदिरप्रवेशाचा पर्यंतच्या सुधारणांचे नेतृत्व जर मुस्लिमांनी केले असते तर हिंदूंना ते आवडले असते का ? आणि हिंदुनी त्याला प्रतिसाद दिला असता का असा प्रश्न आपण विचारायला हवा.उलट ख्रिश्चन ब्रिटिशांनी आमच्या धर्मात हस्तक्षेप करू नये अशी हिंदू नेत्यांची १८५७ च्या काळात मागणी होती.
तेव्हा कोणत्याही धर्मातील सुधारणा त्या धर्मातील लोकांनी बोलले तरच ते अधिक नैसर्गिक असते व स्वीकारले जाते हे वास्तव आहे.
हमीद दलवाई यांनी सुरू केलेली मुस्लिम सुधारणेची चळवळ फार पुढे गेली नाही. तेव्हा मुस्लिमांमधील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात असे मनापासून वाटते त्यांनी मुस्लीम सत्यशोधक व सर्व मुस्लीम सुधारणावादी यांना मदत करायला हवी. मुस्लिम धर्मातील सुधारणा वाद्याची सतत संवादी राहायला हवे
५) संवादाचा अभाव हे ही एक कारण आहे. आपला मुस्लिमांशी कितपत संवाद आहे ? याचाही या निमित्ताने विचार करायला हवा. मी स्वतः मोजले तर ज्यांच्याशी मी नियमित बोलतो असे मला दहा पंधरा मुस्लिम मित्र ही नाहीत. ही माझ्यासारख्या महाराष्ट्र फिरलेल्या व्यक्तीची अवस्था आहे ... तेव्हा हिंदूनी मुस्लिम मित्र वाढवणे मुस्लिमांनी हिंदू मित्र वाढवणे यातून संशय गैरसमज दूर होऊ शकतो हे पुढे जाऊ शकेल
अन्यथा दोन देश निर्माण करण्यापासून सगळे उपाय करून झाले पण आजही आपल्याला हिंदू-मुस्लिम संघर्ष यावर चर्चा करावी लागते. हे उपाय अनेकांना बालिश बावडे उपाय वाटतील पण हीच मुस्लीम जातीयवाद दूर करण्याचा आहे
यानिमित्ताने मुस्लिम जातीयवादावर आपण बोलताना हिंदू धर्माला इतकी सुधारण्याची परंपरा असताना आपण स्वतः किती रूढी-परंपरा यातून बाहेर पडलो आहे ? याचाही हिशोब या निमित्ताने प्रत्येकाने मांडायला हवा.
माझ्या मुलाचा जन्म झाल्यावर मी त्याचे कान टोचू दिले नाही. तेव्हा तुझ्या मुलाला मुसलमान समजतील इथपासून अनेक टीका ऐकल्या, कुलकर्णी असून मुलाची मौंज केली नाही म्हणूनही खूप ऐकावे लागले हे आपल्यातील हिजाबवादी आहेत !!! आंतरजातीय विवाह केलेल्यांच्या हत्या करणारे हिंदूच असतात, अस्पृश्यतेपासून स्त्रियांना अनेक जाचक रूढीत बांधून ठेवणारे हिंदूच आहेत. तेव्हा जातीयवादी असणे परंपरेचा गुलाम असणे ही फक्त मुस्लिमांची मक्तेदारी नाही हे आव्हान दोन्ही धर्मात आहे पण त्यावर संघटित होणे हा मार्ग नसून सुधारणेचा विचार पुढे नेणे हाच उपाय आहे हे शांतपणे आपण स्वीकारु या
काँग्रेस व पुरोगामी पक्षांनी मुस्लिम जातीयवादावर शाहबानो प्रकरणापासून सतत बोटचेपी भूमिका घेतली त्याचा गैरफायदा भाजपने घेतला व हिंदू मतपेढी निर्माण केली.त्यामुळे दोन्हीही जातीयवादावर कडक भूमिका घेतली पाहिजे
ताजा कलम : बहुतेक शाळेत हिंदुधर्मीय प्रार्थनाच म्हटल्या जातात ,त्या शाळेत मुस्लिम मुलांनी हात जोडले नाहीत व रोज वेगवेगळ्या धर्मांची प्रार्थना म्हणाव्यात अशी मागणी केली तर आपल्याला चालणार आहे का ? हिजाबने निर्माण केलेले असे अनेक प्रश्न आहेत
हेरंबकुलकर्णी