राणे विरुद्ध ठाकरे

कशी झाली राणे विरुद्ध ठाकरे संघर्षाला सुरुवात, नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली? यासह नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीका करुन काय सिद्ध केलं आहे? वाचा सुनील तांबे यांचा लेख

Update: 2021-08-26 11:11 GMT

उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्रं शिवसेनाप्रमुखांनी सोपवल्यावर दोन व्यक्ती नाराज झाल्या. राज ठाकरे आणि नारायण राणे. या दोघांनाही वाटत होतं की, शिवसेनाप्रमुखांनंतर आपलाच शिवसेनेवर हक्क आहे.

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली. आणि शिवसेनेतून हकालपट्टी ओढवून घेतली २००५ साली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची आकांक्षा होती मुख्यमंत्रीपदाची. परंतु काँग्रेसमध्ये शरद पवारांचीही डाळ नेहमी शिजत नाही तिथे राणेंना कोण मुख्यमंत्रीपदी बसवणार? अखेरीस राणेनी २०१७ साली काँग्रेसला रामराम ठोकला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढून त्यांनी निवडणूक लढवली आणि २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. २०२१ मध्ये त्यांचा राजकीय वनवास संपला. ते केंद्रीय मंत्री बनले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना राणे पिता-पुत्रांनी लक्ष्य केलं आहे.



 


राणे यांना शिवसेनेतून काढून टाकलं त्यावेळी अनेक शिवसैनिकांची सहानुभूती राणेंना होती. काही आमदार राणेंसोबत होते. राणेंची स्वाभिमान पार्टी म्हणजे कोकणची अस्मिता होती. मात्र राणेंचा कणकवली मतदारसंघातच पराभव झाला. त्यानंतर त्यांचा सतत पराभव होत राह्यला.

राणे यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश का झाला?


पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबई महापालिकेचं बजेट काही छोट्या राज्यांएवढं आहे. मुंबई महापालिकेत गेली ३५ वर्षं शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महापालिका स्वबळावर ताब्यात घेणं हे भाजपचं लक्ष्य आहे. त्यासाठी राणे यांच्यासारखा माजी शिवसैनिक, शिवसेना नेता आपल्याला उपयोगी पडू शकेल अशी भाजप श्रेष्ठींची अटकळ आहे. शिवसेनेला आव्हान द्यायचं तर असाच नेता हवा अशी भाजप श्रेष्ठींची धारणा आहे.

२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप व सेना एकमेकांच्या विरोधात होते. भाजपला स्वबळावर ८२ जागा मिळाल्या होत्या. महापालिका ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असणार्‍या अधिकच्या जागा राणे यांनी मिळवून द्याव्यात अशी भाजपची रणनीती आहे. म्हणून तर देवेंद्र फडणवीस म्हणतात की राणेंच्या विधानाचं समर्थन करणार नाही पण राणेंच्या पाठिशी भाजप भक्कमपणे उभा राहील.

केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंचा समावेश म्हणूनच झाला असावा. ते माजी शिवसेना नेते आहेत, शेकडो शिवसैनिकांशी त्यांचा संपर्क आहे, ते मराठा आहेत, मुंबईतील शिवसेना मतदारांमध्ये कोकणवासीयांचा सिंहाचा वाटा आहे या सर्व बाबी ध्यानी घेण्यात आल्या असाव्यात. राणे यांनाही त्याची पूर्ण कल्पना असावी. त्यामुळेच मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांनी ठाकरे घराण्यावर हल्ला करायला सुरुवात केली.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला वंदन करून त्यांनी ही यात्रा सुरु केली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. त्याचे अपेक्षित परिणाम दिसत आहेत. राणे विरुद्ध सेना असा संघर्ष निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. महापालिका निवडणुकांपर्यंत ही हाणामारी, छोट्यामोठ्या चकमकी वा लढाया सुरु राहातील.

सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार

Tags:    

Similar News