Russian vs Ukraine - रशियाचा नकाशा
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण रशियाचा इतिहास हा भुगोलातून कसा घडला आहे आणि त्याचे परिणाम काय झाले आहेत याचे रशियाच्या नकाशाद्वारे विश्लेषण केले आहे सुनील तांबे यांनी..;
युरोप आणि आशिया या दोन खंडांमध्ये हा देश पसरला आहे.
उत्तरेला असलेला समुद्र प्रदीर्घ काळ गोठलेलाच असतो. त्यामुळे तिथून रशियावर आक्रमण होण्याची शक्यता फारशी नाही. पाणबुड्यां या सरहद्दीवर नजर ठेवू शकतात.
पूर्वेचा समुद्रही खवळलेला असल्याने तिथूनही रशियाला फारसा धोका नाही.
रशियाला धोका होता दक्षिणेकडून. परंतु मंगोल, तार्तार आणि तुर्की टोळ्यांचा निर्णायक पराभव करून रशियाने मध्य आशिया ताब्यात घेतला. काराकोरम, टिआनशान पर्वतरांगेपर्यंत मुसंडी मारून चीनला आपली सरहद्द भिडवली.
ही नैसर्गिक भिंत ओलांडून रशियावर आक्रमण करणं शत्रूला अवघड होतं.
पूर्वेला असणारं युरोपचं मैदान ही रशियाची डोकेदुखी होती व आजही आहे. तिथे ना पर्वतरांग आहे, ना समुद्र ना वाळवंट. तिथून रशियावर सतत आक्रमणं झाली. स्विडीश, पोलीश, जर्मन इत्यादींची. रशियाची ८० टक्के लोकसंख्या याच प्रदेशात आहे. हा प्रदेश रशियन साम्राज्याचं केंद्र आहे. या प्रदेशाच्या रक्षणासाठीच रशियाने पश्चिम आणि दक्षिणेला साम्राज्य विस्तार केला. आणि पूर्वेला मुसंडी मारून बफर झोन तयार केले. जेणेकरून रशियन साम्राज्याच्या केंद्रस्थानी पोहोचेपर्यंत शत्रूची दमछाक व्हावी. ह्या बफर झोन्समध्येच नेपोलियन आणि हिटलरच्या सैन्यांना रशियाने थोपवलं आणि पलटवार केला.
सोवियेत रशिया कोसळल्यावर या सीमेवर माल्डोव्हा, युक्रेन, बेलारूस, लिथुआनिया, इस्टोनिया, लाटव्हिया हे देश निर्माण झाले. हे देश नेटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन)च्या प्रभावाखाली येऊ लागल्याने रशिया अस्वस्थ झाला. झारच्या साम्राज्याचा वारसा कम्युनिस्ट सत्ताधार्यांनीही चालवला. मात्र ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईकाने रशियन साम्राज्याची शकलं उडाली. त्यामुळे रशियन साम्राज्याचं केंद्र म्हणजे लोकसंख्या भयभीत झाली.
आपल्याच साम्राज्यातून निर्माण झालेल्या देशांना पुन्हा आपल्या साम्राज्यात आणता येणार नाही परंतु त्यांना आपल्या जरबेत ठेवण्यासाठी रशियाने वांशिक अस्मिता, वांशिक वा सांस्कृतिक कलह यांना उत्तेजन दिलं. तिथल्या फुटीरतावादी चळवळींना सक्रीय मदत पुरवली. त्या देशांमध्ये आपली प्यादी सत्तास्थानी बसवण्याचा प्रयत्न केला. युरेशियन ट्रिटी ऑर्गनायझेशन सारख्या करारात या राष्ट्रांना बांधण्याचा प्रयत्न केला.
रशियाचा इतिहास भूगोलाने घडवलेला आहे. त्यामुळे वर्तमानात रशिया आणि रशियाच्या छायेखालच्या प्रदेशांमध्ये वा राष्ट्रांमध्ये लोकशाही नांदू शकत नाही. रशियाला १६ राष्ट्रांच्या सरहद्दी भिडल्या आहेत. त्यापैकी १२ राष्ट्रं १९९१ पर्यंत रशियन साम्रााज्यात होती. या १२ राष्ट्रांमध्ये अमेरिकन आणि युरोपियन कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे शिरकाव करत आहेत. कझाकीस्तान, तुर्कमेनिस्तान, उजबेकिस्तान, या देशांना चीनच्या बेल्ट अँण्ड रोड इनिशिएटिवचा पर्याय मिळाला आहे. ही बाब रशियन मनाला असुरक्षित करते.
झारचं साम्राज्य नागरिकांवर पाळत ठेवणारं होतं. कारण रशियन वगळता शेकडो जनसमूह असे होते की त्यांना रशियाबद्दल प्रेम नव्हतं, विश्वाास नव्हता, दुरावा होता. झारच्या या सर्विलन्स स्टेटचा म्हणजे प्रजेवर पाळत ठेवण्याच्या सरकारचा वारसा पुढे कम्युनिस्टांकडे आला. आज ती जबाबदारी पुतीन यांच्यावर आली आहे.
झार, लेनिन, स्टालीन, ख्रुश्चेव, ब्रेझनेव्ह याच परंपरेत पुतीनही आहेत. राजकीय विचारधारा कोणतीही असो, झारपासून पुतीनपर्यंत रशियातले राज्यकर्ते निरंकुश सत्ताधीश होते. तीच रशियाची परंपरा आहे. गोर्बाचेव हे अपवाद होते. सोवियेत साम्राज्य जर्मन, फ्रेंच, अमेरिकन, पोलीश, स्विडीश यांनी नाही तर गोर्बाचेव यांनी खिळखिळं केलं. त्यानंतर अस्मितांच्या संघर्षांनी पेट घेतला.
हे केवळ रशियात घडलं नाही. १९९० नंतरच भारतातही अस्मितांचे संघर्ष सुरु झाले. आजही उत्तर प्रदेश असो की गोवा वा पंजाब वा उत्तराखंड इथेही अस्मितांचे संघर्ष आहेत. आर्थिक प्रश्न वा रोजच्या जगण्याचे प्रश्न पिछाडीवर गेले आहेत.