मुंबई - गोवा महामार्गासाठीचा संघर्ष कोकणाच्या वाट्यालाच का ?

साधा भोळा माझा कोकणी माणूस आजही राजकीय नेत्यांच्या आश्वासनाला बळी पडतोय. सुमारे १२ वर्ष अपूर्ण अवस्थेत असलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का केला जात नाही? कोकणच्या मतदारांना राजकीय नेते गृहीत धरतात का ? वाचा या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेणारा मॅक्स महाराष्ट्र प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांचा लेख.....

Update: 2023-08-05 11:41 GMT

एका मुंबई गोवा महामार्गासाठी १२ वर्ष संघर्ष करावा लागतो आहे. तरीही तो अपूर्ण अवस्थेत पाहायला मिळत आहेत

गेली २० वर्षात कोकणात १४ ते १५ आमदार आहेत. निवडणूका झाल्या तरी पुन्हा तेच निवडून येतात.सरकार कोणाचही असो सत्तेत मात्र हेच असतात. हे ज्या कोकणी लोकांच्या जीवावर आमदारकी मिळवतात त्याच मतदार राजाला मरणाच्या दारात उभं करतात. आजपर्यंत सर्व पक्षांच सरकार येऊन गेलं परंतु मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था कोणालाच दिसली नाही.

मुंबई गोवा महामार्ग कोकणकरांची जीवन वाहिनी बनली आहे. आर्थिक राजधानी जरी मुंबई असली तही त्याला अर्थसहाय्य करणारी बाजारपेठ ही कोकणातच आहे. कोकणातील हापूस, काजू, तांदूळ, नाचणी, सुमद्रातील मासेमारी असे कोकणातील असंख्य व्यवसाय मुंबईच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असतात. मुंबईतल्या बाजारपेठेत कोकणकरांचा मोठा वाटा आहे. पेण, रोहा, इंदापूर माणगाव, रायगड खेड येथे असंख्य MIDC देखील आहेत जी मुंबईची आर्थिक व्यवस्था सावरते परंतु कोकणकरांच्या वाट्याला काय?

मुंबई गोवा महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे एका इको कारचा अपघात झाला त्यात पूर्ण यादव कुटुंब संपल. कोकणकरांचा शेवट हा महामार्गावरच आहे का? शासन त्यांचे अंत्यविधी हे या महामार्गावरच करणार आहेत का? असा प्रश्न कोकणकरांना पडला आहे?

सध्या सोशल मीडीयावर एक मॅसेज चांगलाच व्हायरलं होत आहे.

कोकणातील विधानसभा आमदार...

१) प्रशांत ठाकूर -पनवेल २) महेंद्र थोरवे - कर्जत ३) महेश बालदी - उरण ४) रवीशेठ पाटील - पेण ५) महेंद्र दळवी - अलिबाग

६) अदिती तटकरे -श्रीवर्धन ७) भरत गोगावले - महाड ८) योगेश कदम - दापोली ९) भास्कर जाधव - गुहागर १०) शेखर निकम - चिपळूण ११) उदय सामंत - रत्नागिरी १२) राजन साळवी - राजापूर १३) कणकवली - नितेश राणे १४) कुडाळ - वैभव नाईक

१५) सावंतवाडी - दीपक केसरकर.

विधानपरिषद आमदार...

१६) निरंजन डावखरे १७) अनिकेत तटकरे १८) जयंत पाटील १९) ज्ञानेश्वर म्हात्रे

खासदार

१) सुनिल तटकरे २) विनायक राऊत ३) नारायण राणे ४) श्रीरंग बारणे

वरील पैकी सर्व आमदार खासदार गेल्या ५ ते १० वर्षात आलटून पालटून सत्तेत आहेत. आता तर ९०% लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत. तरीपण 'ना कोकणाचा विकास झाला, ना रस्ता'.. यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी जबाबदार धरायचं का? असा प्रश्नंच कोकणकरांनी उपस्थित केला "मला तरी असं वाटत आहे की याची पूर्ण जबाबदारी ही लोकप्रतिनिधीच आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच कोकण विभाग हा विकासाच्या दृष्टीने मागे पडत आहे. या मतांशी कदाचित आपणही सहमत असालच.

जनआक्रोश आंदोलन समिती

गेल्या काही महिन्यापासुन ही समिती मुंबई - गोवा महामार्गासाठी राजकीय हेवे-दावे बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. त्यांच्या सह्यांच्या मोहिमेने कोकणकरांना पुन्हा उर्जा मिळाली आहे.

यावर मी मुंबई-गोवा महामार्ग जनक्रोश समितीचे समन्वयक श्रीधरकाका कदम यांच्याशी संवाद साधला त्यांना फक्त मी कोकणातील हायवे संदर्भात सहज विचारलं त्यांनी न थांबता अर्ध्या तासापेक्षा जास्त चर्चा केली. म्हणाले की देशाच्या नकाशावर असलेला मुंबई - गोवा महामार्ग पुसला जातोय. नकाशावर नसणारा समृध्दी महामार्ग तयार होतोय. याची कोणाला खंत नाही ? कोकणी माणूस नेहमीच हतबल झालेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin gadakari) हे देशातील रस्त्याचं जाळ विनवतात त्यात असंख्य समस्या येत असतात. त्यावर एक पुस्तक लिहिता येईल असं ते म्हणाले होते. चांगल्या कामांसाठी पैशाची कमी नाही असेही गडकरी म्हणाले होते.

त्यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) हे या महामार्गाच्या कामासाठी आग्रही आहेत त्यांनी आतापर्यंत एका वर्षात ४ ते पाच वेळा मार्गाची पाहणी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडूनच या कोकणातील जनतेच्या अपेक्षा असल्याचं कदम म्हणाले आहेत"

आतापर्यंत कोकणात १९ आमदार आणि ४ खासदार हे आलटुन पालटून सत्तेत येत आहेत पण एकालाही कोकणच्या विकासाचा आराखडा आणि कोकणाचे नेतृत्व एकसंघ करावं अस का वाटलं नाही?. महाराष्ट्रातील कोकण विभाग सोडला तर कुठेच विकासाच्या बाबतीत विरोध होताना दिसत नाही. तर त्या विभागातील विरोधी आमदारही विकासासाठी सत्ताधाऱ्यांना मदत करत असतात. आणि विकास करून घेत असतात. आमच्या कोकणात कोणाच्या घरी जरी जायच असेल तरी त्याचा राजकीय पक्ष कोणता हे विचारले जात आपल्या गटातला असेल तर त्याच्या घरी जाण-येण ठेवतात हे अनुभवाचे बोल आहेत. परंतु भाव-भावकीतील वाद आणि राजकारणातील कट्टरता याच्या पलीकडे कोकणातील लोकांना जावे लागणार आहे. विकासासाठी आक्रोशाची भूमिका घ्यावी लागणार. तेव्हाचं लोकप्रतिनिधीना जाग येणार...

- कृष्णा कोलापटे

Tags:    

Similar News