धार्मिक कट्टरवादी समुदाय नेहरूंचा द्वेष का करतो?
"मला इंग्रजानी केलेली दीडशे वर्षांची घाण काढायची आहे" असं न म्हणता आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या नेहरुंवर 70 वर्षानंतरही विरोधकांना टीका का करावी लागते? वाचा जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त आनंद शितोळे यांचा लेख
लोकही नेहरूंना दोष देताना नेहरू भाबडे होते, साम्यवादी होते की समाजवादी होते की अजून काही होते. याच्या चर्चा करतात, चरित्र्यहनन करताना खोटे फोटो, कहाण्या, नेहरूंच मुस्लीम मूळ आणि कुळ याबद्दल अफवा पसरवल्या जातात.
यापलीकडे जाऊनही नेहरूंचं महत्त्व नाकारता येत नाही म्हणून ७० वर्षांनी सुद्धा टीका करायला नेहरुच लागतात आणि खापर फोडायला नेहरुच लागतात, हे नेमकं का ?
१९४७ साली पाकिस्तान-भारत दोन्ही देशांचा जन्म झाला.
मोहम्मद अली जीनांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची वाटचाल सुरु झाली.
ह्या ७० वर्षात पाकिस्तान अधिकृतरीत्या इस्लामिक देश बनलेलं आहे.
ह्या ७० वर्षात अनेकदा देशाची राज्यघटना पूर्णपणे बदलण्यात आली.
ह्या ७० वर्षात देशाचे दोन तुकडे झाले.
ह्या ७० वर्षात तब्बल ३९ वर्षे थेट लष्करी हुकुमशहा सत्तेवर होते आणि उरलेल्या काळात सरकार नावाचं लष्कराच्या तालावर नाचणार बाहूल.
ह्या ७० वर्षात ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली माणसांना ठार मारण्यात आलं, थोडीफार शहाणी सुरती माणसं होती, त्यांना मारण्यात आलं, मारलेल्या लोकांच्या मारेकऱ्र्यांना गाझी धर्मवीर म्हणून डोक्यावर घेण्यात आलं.
ह्या गोंधळात आर्थिक आघाडीवर, शैक्षणिक आघाडीवर पाकिस्तान कुठे आहे? ह्याचं उत्तर पाकिस्तानी नागरिकांना परदेशात गेल्यावर जास्त चांगलं समजतं.
"मला इंग्रजानी केलेली दीडशे वर्षांची घाण काढायची आहे" असले भंपक डायलॉग न मारता नेहरूंनी काम करून दाखवलं.
पाकिस्तान सोबत जन्माला आलेल्या भारतात नेहरूंनी सगळ्यांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष राज्यघटना आणली आणि देशाला त्या मार्गावर नेलं.
अलिप्त राष्ट्र परिषद असो की विज्ञान तंत्रज्ञान ह्याला प्राधान्य असो की देशाची नवी तीर्थक्षेत्र म्हणजे कारखाने आहेत असं म्हणन.. हे सगळं करताना नेहरूंनी देशाला दिशा दिली.
नुसतीच दिशा दिली नाही तर त्यांनी ज्या रस्त्यावरून पाकिस्तानची वाटचाल झाली त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेला भारताला नेलं.
त्यामुळे गांधींचा खून करूनही संघाला जे साध्य झालं नाही. ते भारताच हिंदू पाकिस्तान करायला संघाला २०१४ पर्यंत ७० वर्षे वाट बघावी लागली आणि तेही अजून नजरेच्या टप्प्यात नाहीये.
अजूनही नेहरूंच्या मार्गावर चालणारे अनेक वेडेफकीर देशात आहेत.
आपल्याच देशबांधवांचे "धर्मविरोधी" म्हणून केलेले खून, धर्माच्या नावाने दंगली, धर्माच्या नावाने झुंडीन केलेले हल्ले हे सगळं प्रत्यक्षात यायला एवढा काळ वाया गेला त्याला कारण आहेत ते नेहरू.
संघाच्या दृष्टीने "हिंदुराष्ट्र" होण्याऐवजी भारताला "चुकीच्या" दिशेला नेण्याचं "पाप" नेहरूंच्या माथी आहे. म्हणून संघ नेहरूंचा इतका पराकोटीचा द्वेष करतो.
आता आपल्याला म्हणजेच भारतीय नागरिकांना ठरवायचं आहे.
आपल्याला हिंदू पाकिस्तान बनायचं आहे की भारत बनायचं आहे ?
आपल्याला धर्मग्रंथ प्रमाण मानून हिंदू आश्रित म्हणून जगायचं आहे की घटनेला प्रमाण मानून भारतीय नागरिक म्हणून जगायचं आहे.
आर्थिक-रोजगार-शेती-उद्योग-शिक्षण-आरोग्य ह्या विकासाच्या मुलभूत आघाड्यांवर जसा पाकिस्तान सपशेल अपयशी ठरलेला आहे. म्हणून लोकांना भडकावून द्यायला त्यांना सतत भारताच शत्रुत्व जागं ठेवावं लागतं तसं आपल्याला ह्या आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारला आपल्याला पदच्युत करायचं आहे.
ज्यांची उद्दिष्टच मुळात धार्मिक आधारावर राष्ट्राची निर्मिती आहे. त्यांना आर्थिक मुद्दे -रोजगार- शेतीचे प्रश्न -उद्योग-शिक्षण-आरोग्य ह्या विकासाच्या मुलभूत प्रश्नांवर ना काही व्हिजन आहे ना काही रस आहे.
बाकी हिंदू राष्ट्रवाद हा सगळा भंपकपणा उधडून काढायला आणि सगळे बुरखे फाडायला एकच साधा प्रश्न कुठल्याही संघी माणसाला विचारायचा.
"फाळणीला जेवढे गांधीजी जबाबदार तेवढेच जीना जबाबदार, मग मुसलमान जीना सोडून गोडसेने गांधीना का मारलं? जीनांना का मारलं नाही? "
या प्रश्नांची उत्तर कधीच मिळणार नाहीत.
नेहरू आणि त्यांचे विचार कदाचित आजच्या राजकारणाशी कुणाला सुसंगत वाटणार नाहीत. मात्र, तुम्हाला इथंवर आणायला कारणीभूत असणारा माणूस तोच आहे हा इतिहास खोडून काढताही येत नाही.
१४ नोव्हेंबर , नेहरूंचा वाढदिवस !! हॅप्पीवाला बड्डे नेहरुजी !!