धर्मांतर ...

मी स्वतः बौद्ध आहे. पण माझ्यासाठी बौद्ध असणं ही माझी राजकीय ओळख आहे. पण बौद्ध असल्यामुळे मला रोज उठून अमुक गाथा, पंचशील म्हटलेच पाहीजे हा अट्टाहास माझ्याठायी नाही. किंवा तो बाबासाहेबांच्या विचारधारेतही नव्हता कधीच. बुध्द जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती आहे. नास्तिक असणं ही तर्काने लढण्याची, जगण्याची वृत्ती आहे.. म्हणूनच पाच हजार वर्षांचा बॅकलॉग गेल्या साठ वर्षांत बौद्धांनी निम्म्याहून अधिक फरकाने भरून काढला आहे, सांगतात चळवळीचे‌ अभ्यासक वैभव छाया...

Update: 2020-12-06 03:30 GMT

14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासातील सर्वात मोठे असे धर्मांतर घडवून आणत भारतात बुद्धविचाराची पुनःस्थापना केली. हा भाग धर्मांतराचा होता. परंतू त्याहीपेक्षा मोठं पाऊल होतं ते तत्कालीन सात कोटी अस्पृश्यांवर लादल्या गेलेल्या अस्पृश्यतेच्या निवारणाचा. बाबासाहेबांनी प्रत्येक मार्गाने अस्पृश्यता निवारण करून पाहीले परंतू दरवेळेस भारतातील जातीय मानसिकतेने त्यात अनेक लुप होल्स शोधून बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सुधारणेच्या एकुण एक प्रय़त्नांना सुरूंग लावला. इंग्रज सरकारच्या काळात सत्ता हस्तगत करून त्यांनी जमेल तितके अस्पृश्यांच्या उत्थानाचे कार्य साधले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान निर्मितीच्या माध्यमातून अस्पृश्यता पालनाला कायद्याने चाप लावला. पण मना मनात असलेली जात घालवण्याइतका वेळ बाबासाहेबांकडे नव्हता. त्यामुळे आता हिंदू धर्म सुधारणा होणं शक्य नाही हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला होता आणि त्यातूनच त्यांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी की, हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे. बाबासाहेबांचा हिंदू धर्म नि समाजव्यवस्थेला असा सवाल होता की,'जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?'

आम्ही बौद्ध धर्मच का स्विकारला या छोटेखानी पुस्तिकेत स्वतःच्या भूमिकेचे विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात की, माझ्या समाजात अजून शिक्षणाचा शिरकाव अतिशय कमी आहे. त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षण गरजेचे आहे. मनुष्यमात्र हा आशेवर जगत असतो. आशा ही श्रद्धेतून मिळते. श्रद्धा ही त्याच्या ठायी असलेल्या धर्मातून मिळते. येथे धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे. ती अशी एक आदर्श पद्धती असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच मुख्य आधार असेल. तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील. आणि त्यातून मिळणारी आशा ही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत राहील. मला बुद्धाच्या धम्मामध्ये या साऱ्या गोष्टी आढळतात. मी बुद्धाचा स्विकार करून या देशावर एक प्रकारे उपकारच करत आहे. बुद्ध याच मातीतला. प्रतिक्रांतीमुळे काही काळासाठी अदृश्य होता. आम्ही त्याचे पुनरूज्जीवन करत आहोत. त्याहीपेक्षा कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा नसणाऱ्या एका महान अशा परंपरेत आणि आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. जसे महासागरात सर्व नद्या एकत्रित झाल्यानंतर त्या नद्यांचे अस्तित्व उरत नाही तसेच आम्ही जाती सोडून बुद्ध नावाच्या महासागरात जाणार आहोत. त्यानंतर आमचे जातींचे अस्तित्वच नष्ट झालेले असेल.

माझ्या मते धर्मांतर ही कधीच प्रतिक्रिया नव्हती. तो अगदी नेटकेपणाने, विचाराअंती घेतलेला निर्णय आणि परिपूर्ण असा कार्यक्रम होता. या कार्य़क्रमाने काय साध्य झालं? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी आपल्या घरातील शेवटच्या सहा पिढ्या तपासून पहायला हव्यात. स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यांमधील 90 टक्क्यांहून अधिक मोठा समुह अतिशय विचित्र अवस्थेत जगत होता. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा करताना लोकांना आपल्या कपड्यांचा त्याग करायला लावला. प्रत्येकाने दिक्षा समारंभासाठी येताना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले पाहीजेत असा दंडक घातला. धर्मांतराची प्रक्रिया सुरू होण्याआधी त्यांनी काही पत्रके काढली. ठिकठिकाणी जाऊन बुद्धाच्या मूर्त्या स्थापल्या आणि तेथील अस्पृश्यांना जातीव्यवस्थेने लादलेली कामे सोडायला भाग पाडली. ती भाग पाडताना आता आपण नव्या हिंदू धर्मातून बाहेर पडत आहोत तेव्हा सडलेले मांस खाणं सोडा, मेलेली जनावरं ओढणं सोडा सारखे कार्यक्रम दिले. लोकांनी आपले कपडे बदलले, व्यवसाय बदलले, चालणं – बोलणं, राहणं, खाणं बदललं. खिशातून चान्या घेऊन रस्ताभर खात हिंडण्याची सवय सुद्धा हळूहळू नाहीशी झाली. हे झाले प्राथमिक बदल. पण सर्वात महत्त्वाचे बदल घडले ते म्हणजे. लोकांना स्वाभिमानाने स्वतःची ओळख सांगता येऊ लागली. आयडेंटीटी क्रायसीस हा खुप मोठा प्रश्न आहे आणि समस्या सुद्धा. बाबासाहेबांनी तमाम अस्पृश्यांना स्वत्वाची जाणीव करून दिली. अस्पृश्य या स्थितीवाचक संज्ञेतून बाहेर काढत बौद्ध या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बिरूदाची देणगी दिली. बाबासाहेबांनी इथल्या भूमिपुत्राला त्याच्या खऱ्या इतिहासाची जाणीव करून दिली. धर्मांतर करणं ही बाबासाहेबांची टोटल पॉलिटकल अक्शन होती. ती खऱ्या अर्थाने जातीव्यवस्थेने बरबटलेल्या हिंदू धर्माचं अस्पृश्यांच्या मानसिकतेतून विध्वंसन करण्याची ती क्रिया होती. याची सुरूवात मनूस्मृतीच्या दहनाने झाली होती आणि अंत धर्मांतराने हे विशेष अधोरेखित करावे.

येथे अजून एक कारण देणे मला अतिशय महत्त्वाचे वाटते. हे मी एका भाषणातून आपणासाठी येथे देत आहे. वक्ते बहुधा सुनिल रामटेके असावेत.. त्यांचा उतारा येथे उद्धृत करत आहे. सिद्धार्थ २९ वर्षाचा होतो आणि म्हातारा,रोगी आणि मृत व्यक्तीला बघून वैराग्य निर्माण होऊन प्रव्रजीत होण्याचा निर्णय घेतो हे कारण तर्कसंगत आनि बुद्धीला पटणारे नाही.परंतु बाबासाहेबांनी शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वारंवार होणारे युद्ध आणि शाक्यांच्या सभेत सेनापतीच्या युद्धाच्या प्रस्तावाला सिद्धार्थाने केलेला विरोध आणि त्यासाठी देश सोडून जाणे, देहांताची शिक्षा किंवा वडिलांचे राज्यपद हिरावून घेणे या तीनपैकी देश सोडून प्रव्रजीत होण्याचा निर्णय सिद्धार्थाने घेतला.परंतु पारंपारिक बौद्ध धम्मीय पहिले कारणच योग्य मानतात.म्हणून बाबासाहेबांच्या 'दि बुद्ध आणि धम्म' या पुस्तकाला विरोध करतांना हा बाबासाहेबांचा धम्म आहे म्हणून हिणविले.परंतु काही कालावधीने बाबासाहेबांच्या 'बुद्ध आणि त्याचा धम्म' याचा स्वीकार जगातील बहुतांश राष्ट्रांनी स्वीकारलेला आहे.बाबासाहेबांनी काॉठमांडू मध्ये भरलेल्या बौद्ध धम्म संगीतीला संबोधित करतांना 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' या विषयावर भाषण देताना बुद्धाच्या धम्मावर मार्क्सवादाचा प्रभाव होऊ नये यासाठी मार्क्सवाद हे जगातील समस्या सोडविण्यासाठी कसे निरर्थक आहे हे प्रतिपादित केले.मार्क्सने मजुरांच्या हुकुमशाहीचे समर्थन केले होते तर बुद्धाने शोषक व्यवस्था ती कुठलीही असो तिला विरोध केला होता.बुद्धाने स्वातंत्र्य,समता,बंधुत्व,सामाजिक न्याय,करुणा या उदात्त मुल्यांचा पुरस्कार करून नीतीमान आणि आदर्श समाज निर्माण झाला तर मनुष्याची दुःखातून मुक्तता होईल असे सांगितले.बुद्ध कसे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत हे सुद्धा बाबासाहेबांनी पटवून दिले.

का घेतला बाबासाहेबांनी वीस वर्षांचा कालावधी?बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यापासून ते धर्मांतर करण्यापर्यंत तब्बल वीस वर्षांचा कालावधी घेतला. या कालखंडात त्यांनी जगभरातील सर्वच धर्मांचा खुप सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला. हा अभ्यास करताना त्यांनी नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही दर्शन पद्धतींचा अवलंब केला आहे. वेदांत ( उपनिषद) पहिल्या सहा मधे येते.सांख्य आस्तिक मधे मोडत नाही. कपिलमुनीचा उल्लेख आहे तेथे म्हटले आहे. वैशेषिक मूलतः नास्तिक होते. ईश्वर जर परिपूर्ण होता तर त्याने सृष्टि निर्माणच कशाला केली? हा तर्क वैशेषिक मधून आला आहे. सांख्य मधे ईश्वर किंवा परमात्मा घुसडून योग या तत्वज्ञानचे निर्माण करण्यात आले.

डॉ. आम्बेडकर, राहुल सांकृतायन आणि देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी या विषयावर के भाष्य केले आहे ते आपल्याला स्वतंत्रपणे अभ्यासता येईल.

माझ्या एकुण अभ्यासाप्रमाणे मला ठाऊक असलेली नऊ दर्शनं पुढीलप्रमाणे. त्यातील पहिली सहा दर्शनं ज्यांना षड् दर्शन म्हटलं जातं ती अशी.. न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. ही सहाही दर्शने वेदप्रामाण्य मानतात. वेदांचे अस्तित्व पूर्णतः मान्य करतात. म्हणून त्यांना आस्तिक म्हटलं गेलं आहे. ऊर्वरित तीन दर्शने जैन, बौद्ध आणि लोकायत ही वेदांचे अस्तित्व मुळापासून झिडकारतात. ती नास्तिक आहेत. राष्ट्र, पितृभूमी, शस्त्रास्त्रांनी युक्त असं राष्ट्र, देशभक्ती वगैरे वगैरे सारख्या संकल्पना कोणत्या नास्तिकत्त्वात बसत नाही. बुद्धाच्या विचार यापेक्षा कोणते वेगळे आहेत.

आता वळूयात बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माच्या स्विकाराकडे...

बाबासाहेबांचं बुद्धाशी आलेलं पहिलं एक्सपोझर हे केळुस्कर गुरूजींकडून आलेलं होतं. भीमा मॅट्रीकच्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी केळुस्कर गुरूजींना भीमाला बुद्ध चरित्र भेट दिलं होतं. तेथूनच बाबासाहेबांचा बुद्धाकडे असलेला कल हळूहळू वाढत गेलेला होता. बाबासाहेबांनी बुद्धाची विचारप्रणाली ही मार्क्सच्या एकुण एका सिद्धांतावर सुद्धा तपासून पाहीली. बुद्धाचा स्विकार करण्याआधी ईश्वर ही संकल्पना नाकारणाऱ्या कपिलमुनीच्या सांख्य दर्शनाचा त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच बुद्धाचा स्विकार केला आहे.

बुद्धाचा विचार हा विज्ञानवादी आहे. तो कालसुसंगत आहे. त्यात कट्टरता नाही. त्यात तर्कसुसंगतपणा आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तिचे स्वातंत्र्य मान्य करताना स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा आखणाऱ्या नियमांना पूर्ण स्थान आहे. बुद्ध टोकाचा विचार नाही. तो सुवर्णमध्य साधण्याचा विचार सुचवतो. बुद्धाने कधीच धर्मसंस्थापक, ईश्वरी अवतार वा ईश्वराचा पुत्र वगैरे असल्याचा क्लेम केलेला नाही. बुद्धाच्या विचारात लोकशाही आहे. पुरोगामी विचारधारा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता ही तत्वे बुद्धाने जगाला दिली. बुद्धाच्या एकुण नितीनियमांमध्ये चर्चेला स्थान होते. संहिता ही संविधानाचं फ्युचरिस्टिक रुप होती. यासारख्या अनेक कारणांमुळेच बाबासाहेबांनी बुद्धाचा स्विकार केला.

बाबासाहेबांनी इस्लाम, ख्रिस्ती आणि शीख धर्माचा स्विकार का नाही केला...

तर बाबासाहेबांचा ओढा तीनही धर्मांकडे गेलाच होता. शीख धर्मीयांची पाच क साठी असलेली सक्ती, शीखांमध्ये असलेली जातीव्यवस्था, कट्टरता त्यांना शीखांपासून क्रमाक्रमाने लांब नेत गेली. बाबासाहेबांचा काळ्या शेरवानी मधला फोटो हा शीख धर्माचा अभ्यास करतानाचा आहे.

इस्लामच्या बाबतीतही तीच गत होती. दार-उल-हरब, दार-ऊल-इस्लाम सारख्या संकल्पना त्यांच्यातील संविधानवादी माणसाला पटणे शक्यच नव्हत्या. शिवाय मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये झालेला जातींचा शिरकाव त्यांना मान्य कसा झाला असता...

बुद्धाचा स्विकार करणारे वास्तविकतेत जगणारे असतात.. धर्मांतरा नंतर एका पत्रकाराने 2 प्रश्न विचारले, बाबासाहेब तुमचा हा धम्म हीनयान कि महायान, बाबासाहेब म्हणतात दोन्हीपैकी कोणते हि नाही, याला नवयान म्हणा. तुम्ही नास्तिक आहात की आस्तिक बाबा म्हणाले मी नास्तिक हि नाही आस्तिक हि नाही मी वास्तविक आहे बुद्ध आचरण्याची गोष्ट आहे.. पाळण्याची नाही. बाबासाहेबांनी आयडेंटिटि क्रायसीस कसा सोडवला?

बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत 1945 साली स्थापन केलेल्या महाविद्यालयास त्यांनी सिद्धार्थ, तर औरंगाबादेत 1950 मध्ये काढलेल्या महाविद्यालयास मिलिंद आणि परिसरास नागसेनवन अशी नावे दिली. मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी 'राजगृह' असे नाव दिले. बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध समाजात धम्माने स्वाभिमान जागवला. बौद्धांनी देव्हाऱ्यातील देवदेवतांचे विसर्जन करून टाकले. गंडेदोरे तोडले. वस्त्या-वस्त्यात बुद्धविहार आले. मुलांची, घरांची, वस्त्यांची नावे बदलली. लग्नविधी, नामकरण विधी बदलले. घरादारांवर बौद्ध स्थापत्यकला अवतीर्ण झाली. कर्मकांडे बंद झाली. (बी.व्ही. जोंधळे यांच्या लेखातून आलेला उतारा)

१४ ऑक्टोबर १९५६ ला धर्मांतरित झालेले बाबासाहेबांचे बहुसंख्य अनुयायी हे अडाणी होते.परंतु बाबासाहेबांच्या शब्दांना प्रमाण मानून,बाबासाहेबांच्या २२ प्रतिद्न्या शिरसावंद्य मानून त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर बाबासाहेबांनी ज्या उच्च शिक्षित लोकांवर धम्माचा रथ पुढे नेण्याची जी जबाबदारी सोपविली होती ती पार न पाडता उच्च शिक्षित मंडळी हे गटातटाच्या राजकारणात गुंग झाले आणि सामाजिक आणि धम्म कार्याला गती देण्याऐवजी समाजकारणात आणि धम्मकार्यात हि राजकारण शोधू लागली.

बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म या दोन्ही संकल्पनांतील मूलभूत फरक विशद केलेला आहे. धर्म आणि धम्मातील मूलभूत फरक मात्र आज बहुसंख्य विसरले आहेत. धर्माचा संबंध देवाशी आहे, तर धम्माचा संबंध मानवाशी आहे. धर्म हा बुद्धिप्रामाण्य नाकारतो. धम्म बुद्धिप्रामाण्य मानतो. धर्म म्हणजे बंधन. धम्म म्हणजे स्वातंत्र्य. धर्म म्हणजे चमत्कार, भाकडकथा, दैववाद, तर धम्म म्हणजे विज्ञानवादी चिकित्सक बुद्धिनिष्ठा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म आणि धम्मात केलेला हा फरक नजरेआड केल्यामुळेच आज बौद्ध समाज पुन्हा एकदा जीर्ण-शीर्ण हिंदू रूढी-परंपरांकडे वळला आहे. बौद्धांची मानसिक स्थिती आज जुने सोडवेना आणि नवे स्वीकारता येईना अशी झाली आहे. बाबासाहेबांना बौद्ध धम्माद्वारे एक नवा समाज, नवा माणूस घडवायचा होता. जातिसंस्थेचे उच्चाटन करून सामाजिक ऐक्य निर्माण करायचे होते. सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यावयाची होती. लोकशाही धर्मनिरपेक्षता बळकट करणे हाही त्यांच्या धम्मस्वीकाराचा मूळ उद्देश होता. त्या अनुषंगाने आपण किती प्रगती केली याचे चिंतन आपण आज करायला हवे की, शतकानुशतकांच्या जोखाडातून अगदी सायंटिफिकली, पॉलिटीकल प्रोग्रामद्वारे आपल्याला बाहेर काढणाऱ्या बाबासाहेबांना ते कसे चुकीचे होते यावर प्रश्न विचारले पाहीजे हा मुख्य मुद्दा इथं उपस्थित राहतो.

प्रश्न जरूर विचारला जावा. पण तो प्रश्न विचारताना आधीच एक बरोबर आणि एक चूक हा निष्कर्ष काढणे कधीही योग्य ठरत नाही. कदाचित आज मध्यमवर्गीय मानसिकता किंवा ज्याला आपण पोस्ट ग्लोबलाईज्ड माईंडसेट म्हणतो त्यात 1956 चे संदर्भ फिट बसणार नाहीत. बसूही नयेत. पण ते फिट न बसणाऱ्यांचा वर्ग आकाराने आणि संख्येने फार छोटा आहे. बौद्ध म्हणून असलेली आयडेंटीटी ही कदाचित या वर्गाला फारशी महत्त्वाची नसेल. नसावी. त्यात फार कौतुक किंवा नुकसाना नाही. पण कोणत्याही आयडेंटीटी विना जगणं हा कदाचित रमाबाई कॉलनी सारख्या देशातील तमाम वस्त्यांत राहणाऱ्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या मानसिक स्थैर्याचा प्रश्न आहे.

लेख संपवताना फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की, मी स्वतः बौद्ध आहे. पण माझ्यासाठी बौद्ध असणं ही माझी राजकीय ओळख आहे. ती राजकीय कशी आणि का यासंबंधी नं तर विवेचन करीनच. ते करण्यासाठी ही जागा योग्य नाही. पण बौद्ध असल्यामुळे मला रोज उठून अमुक गाथा, पंचशील म्हटलेच पाहीजे हा अट्टाहास माझ्याठायी नाही. किंवा तो बाबासाहेबांच्या विचारधारेतही नव्हता कधीच. ती माझ्यासाठी जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती आहे. नास्तिक असणं ही तर्काने लढण्याची, जगण्याची वृत्ती आहे. पण भारतीय परिप्रेक्षात बहुसंख्यांक नास्तिक ... इथं बहुसंख्यांक हा शब्द वापरला आहे, तर बहुसंख्यांक नास्तिक हे जातप्रश्नावर भूमिका घेत नाहीत. त्यांच्या धर्मविध्वंसनाच्या भूमिका ह्या जर तरच्या आहेत. धर्म-धम्म या संकल्पनावर समीक्षा करायची तयारी नसते. बुद्धाला विचार म्हणून न स्विकारता त्याला धर्माची ओळख देण्याच्या संकुचितपणाचीआहे.

बुद्ध हा तर्काने आलेला विचार आहे. म्हणून तो बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणूनच पाच हजार वर्षांचा बॅकलॉग गेल्या साठ वर्षांत बौद्धांनी निम्म्याहून अधिक फरकाने भरून काढला आहे. आता यात काही कट्टरतावादी, अतिगामी सामील आहेत. तो त्यांच्या विनाशी बुद्धीचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण संपूर्ण चळवळीला, बाबासाहेबांच्या 56 सालच्या राजकीय कृतीला तर दोष देऊ शकत नाही ना... जर दोष द्यायचा असेल तर आपली कृती आणि कार्यक्रम काय?

Tags:    

Similar News