ConstitutionDay डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात?
भारतीय राज्यघटना (Indian Constitution) निर्मिती कठीण परीस्थितीत झाली होती. घटना समितीच्या सूचना, वेगवेगळे प्रश्न, शंका कुशंका निर्माण करुनही सर्व स्पष्टीकरण घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आज संविधान दिनाच्या निमित्ताने लेख जय यांनी विपरीत परीस्थितीत डॉ. आंबेडकरांनी घेतलेल्या परीश्रमाची करुन दिलेली ओळख...;
डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.BR Ambedkar)या नावाचं वलय किती अगणित आहे,याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो. बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं. पण हे संविधान लिहिणे इतके सोप्पे काम होते का? मसुदा समितीने मसुदा बनविल्या नंतर तो घटना समितीने त्वरित स्वीकारला का? तर नाही..मसुद्याचे वाचन झाले,त्यांनतर हा मसुदा जनतेला चर्चा करण्यासाठी प्रदीर्घ काळ म्हणजे ६ ते ८ महिने खुला ठेवण्यात आला. या कार्यकाळात घटना समितीमध्ये मसुद्यावर चर्चा झाली,त्या काळातील प्रसार माध्यमावर चर्चा केली जात होती, वेगवेगळ्या माध्यमातून मसुदा जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात होता.
जनतेकडूनही प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया येत होत्या,घटना समितीकडून ही सूचना जात होत्या,वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात होते,शंका-कुशंका निर्माण केल्या जात होत्या,अशा सगळ्या प्रश्नांना आणि शंका-कुशंकाना उत्तर किंवा स्पष्टीकरण देण्याचे एकमेव कार्य, अर्थतज्ञ.बाबासाहेब आंबेडकरच करत होते.सर्व प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं देणे, त्यामागील विचार/हेतू स्पष्ट करणे हे प्रचंड अवघड काम हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले,म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात.
आपली प्रकृती ठीक नसताना,बरेच आजार असताना बाबासाहेबांनी संविधान लिहिण्याचे जिकरीचे काम घेतले, बाबासाहेबांनी संविधान लिहिले नसते तर कदाचित ते आणखीन काही वर्षे जगले असते, इतका अफाट व्याप होता त्यांच्याभोवती. बाबासाहेब बौद्धिक रूपाने जितके प्रबळ होते तितकेच क्षीण ते शारिरीक रूपाने होते, त्यांची नजर कमजोर होती,ब्लड प्रेशर नियंत्रणात नव्हतं, मधुमेहाने ते त्रस्त होते,गुढग्याच्या आजाराने ते पीडित होते, तरीही बाबासाहेब नावाचे हे आकाश, दंड थोपटून विषमतेच्या विरोधात उभे होते.
बाबासाहेब संविधान लिहित असतानाची, कालकथित शांतिस्वरूप बौद्ध एक आठवण सांगताना म्हणतात की, बाबासाहेब संविधान लिहिण्यासाठी दिल्लीत होते, त्यावेळी शांतिस्वरूप बौद्ध यांचे आजोबा कालकथित चौधरी देविदास बाबासाहेबांसोबत होते, त्यावेळी बाबासाहेब दिल्लीतील त्याकाळचे "hardinge avenue" व आताचे "tilak marg" वरील शानदार बंगल्यात रहात होते. एकेदिवशी मध्यरात्री लघुशंका करण्यासाठी देविदास चौधरी उठले, लघुशंका करून आल्यावर त्यांची नजर बाबासाहेबांच्या खोलीवर गेली,व त्यांना बाबासाहेबांच्या खोलीतील लाईट चालूच आहे असे दिसून आले,इतक्या मध्यरात्रीही लाईट चालूच आहे म्हणून ते बाबासाहेबांच्या खोलीच्या दिशेने गेले, व खिडकीत उभे राहिले परंतु खिडकीवर तावदाने असल्याने त्यांना आत डोकावणे शक्य झाले नाही,म्हणून त्यांनी खिडकीचा पडदा बाजूला सरकवला आणि आतील दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले, बाबासाहेब खुर्चीवर बसून संविधान लिहिण्याचे काम करीत होते आणि एका पायाला कपडा बांधून तो कपडा वर पंख्याला बांधून,पाय अधांतरीत हवेत लटकवून त्यांचं लिखाण सुरूच होतं.
हे दृश्य पाहून देविदास चौधरी यांची झोपच उडाली, तसेच ते माघारी आपल्या खोलीत परतले आणि रात्रभर विचार करत बसले, पाहिलेल्या प्रकरणावर उद्या बाबासाहेबांना आपण विचारू असे त्यांनी ठरवले, सकाळ झाली, घडलेला प्रकार त्यांनी नानकचंद रत्तु यांना सांगितला, आणि याबाबत बाबासाहेबांना विचारण्यास सांगितले, रत्तु म्हणाले मला ओरडा खायचा नाही, तुम्हीच जाऊन विचारा, देविदास यांनी हिम्मत करून सकाळी बाबासाहेबाना काल पाहिलेल्या दृश्याबद्दल विचारले, बाबासाहेब म्हणाले माझ्या गुढग्यात खूप वेदना आहेत, पाय खूप दुखतात,त्यामुळे थोडावेळ पाय वर केल्याने ब्लडप्रेशर डाऊनवर्ड झाल्याने किंचित आराम मिळतो, आणि थोडा आराम मिळाल्याने मी संविधानाचे काम अधिक एकाग्रतेने करू शकतो,म्हणून मी तसे करतो.
म्हणजे बाबासाहेबानी भारताचे संविधान काही हसत-हसत लिहिले नाही, अनेक मरणांकित यातनांना पचवून त्यांनी तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यामुळे हे सहज न मिळालेले व अत्यंत यातना सहन करून मिळालेले संविधानरुपी अधिकाराची जेव्हा गळचेपी होते,तेव्हा त्याचे रक्षण करण्यासाठी,त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने अग्रस्थानी असायला हवे....
#भारतीय_संविधान