द ग्रेट मोटिव्हेटर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'द ग्रेट मोटिव्हेटर' का म्हणतात तुम्हाला माहित आहे का?
"तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात हे तितकं महत्वाचं नाही, प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो, जसे डॉ. आंबेडकरांनी स्वतःच्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला" हे विधान होते अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बराक ओबांमाचे. भारताच्या पार्लमेंटला संबोधित करतांना वापरलेले त्यांचे हे शब्द बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय सर्वमान्यतेचीही साक्ष पटवून देतात.
ज्या काळात बाबासाहेब समाजविश्वामध्ये आपल्या चिंतनाच्या साहाय्याने समोर येणऱ्या हर एक समस्येला बाजूला करत जात होते, अगदी त्याचवेळी वैयक्तिक जीवनात आलेलं दुःख किंवा विविध स्वरूपाच्या अडीअडचणींच भांडवल न करता त्यांनी कठोर परिश्रम घेत देशातल्या तमाम ओबीसी आणि दलित वर्गाला त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अविरत संघर्ष केला. हा संघर्ष साधासुधा नव्हता. त्यावेळी देशात असलेले पुढारी देश स्वातंत्र्याच्या चळवळीला महत्त्व देत होते. मात्र, बाबासाहेबांना देश स्वातंत्र्यासह देशातल्याच करोडो जनतेच्या अस्तित्वस्वातंत्र्याचाही सवाल सतावत होता. माणसाला माणसासारखं जगू दिलं जात नव्हतं. अस्पृश्यता पाळणारी विकृत माणसं टोळ्य-टोळ्यांनी समाजात बिनधास्त वावरत होती. या अशा दडपलेल्या, नाकारलेल्या, अन्यायग्रस्त समाजाचा एक बुलंद असा आवाज त्याकाळी फक्त आणि फक्त डॉ. भीमराव रामजी आंबेडकर एवढाच आणि इतकाच होता.
२००७ मध्ये नोबेल पारितोषिक विजेते ख्यातनाम अर्थतज्ञ अमर्त्य सेन म्हणाले होते की डॉ. आंबेडकरांना मी माझ्या अर्थशास्त्राच्या ज्ञानाचा पितामह मानतो. परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रासह इतिहास, मानववंशशास्त्र, गणित, भूगोल, स्थापत्यकला, संगीत, राज्यशास्त्र, धर्मचिकित्सा, वाङ्मय, तत्त्वज्ञान या आणि अशा कित्येक ज्ञानशाखांमध्ये सखोल ज्ञानसुद्धा मिळवले होते.
अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात अभ्यास करतांना त्यांचा रोजचा संघर्ष भयानक असा होता. शिष्यवृत्तीचे पैसे पुरत नसल्यामुळे कधी उपाशी तर कधी अर्धपोटी त्यांना त्यांचा रोजचा दिवस पुढे ढकलावा लागत असे. रोजच्या अन्नात एक कप कॉफी, दोन केक, एक बशी सागुती किंवा मासे असा आहार मिळत असे. आहेत ते पैसे खर्च करण्याची अगदीच मुभा नव्हती कारण मिळालेल्या याच शिष्यवृत्तीच्या पैशातून घरी रमाबाईंना घरखर्चाला पैसे पाठवावे लागत असे. या काळात बाबासाहेबांचा दररोज अठरा-अठरा तास अभ्यास चाले. 'दि इव्हॅल्यूशन ऑफ प्रोव्हीश्नल फायनास इन ब्रीटीश इंडीया' हा त्यांचा प्रंबंध त्यांनी प्रेमापोटी आणि कृतज्ञेपोटी सयाजीराव गायकवाड यांना अर्पण केला. बाबासाहेबांचे गुरू सेलिग्मन यांनी ग्रंथाला प्रस्तावना लिहीली होती. त्यात त्यांनी आवर्जून एका बाबीचा उल्लेख केला होता. ते म्हणाले की, " आंबेडकरांनी घेतलेला हा विषय आतापर्यंत अनेक विचारवंताच्या अभ्यासाचा विषय राहीलेला आहे. मात्र या विषयाचा इतका सखोल आणि सांगोपांग अभ्यास अन्य कोणी केल्याचे मला माहीत नाही."
पुढे 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीक्स अॅन्ड पॉलटीकल सायंस'मध्ये अभ्यास करतांना देखील उपाशी राहून बाबासाहेब पैसे वाचवत आणि ग्रंथ खरेदी करत असत. या टोकाच्या त्या टोकाला असणाऱ्या लायब्ररींमधून दू्र्मीळ ग्रंथ वाचवण्यासाठी ते कित्येक मैल पायीच चालत जात असत. याच काळात ज्याठिकाणी ते रहायचे तिथे त्यांना सकाळी नाष्ट्याला एक चहा, एक पावाचा तुकडा त्या तुकड्याच्या टोकाला थोडासा जॅम मिळायचा. त्यांच्या त्या बलदंड शरीराला तेवढं अन्न निश्चितच खूप जास्त अपूरं असायचं. मात्र बाहेरून हॉटेलमधून खाण्यासाठी जवळ पैसे नसायचे. कधी कधी लंडन म्यूझीयममध्ये वाचनासाठी जातांना ते सोबत सॅन्डवीचचे दोन तुकडे सोबत नेत. मात्र, लायब्ररी प्रशासनाने नियमाचा हवाला देऊन इथं काही खाता येणार नाही असं सांगितल्यावर बाबासाहेबांनी सॅन्डवीच सोबत नेणंही बंद करून टाकलं आणि उपाशी पोटीच तासन् तास अभ्यासासाठी स्वतःला झोकून दिलं. त्यांचे खिशे नेहमीच नोट्सने भरलेले असायचे. त्याच दिवसांमधे रात्रीच्या जेवणातही एक ग्लास बॉव्हरील सोबत दोन बीस्कीटे तर त्यांच्या एका गुजराती मित्राने आणलेले पापड बाबासाहेब कुठल्याशा पत्र्यावर भाजून खायचे आणि पुन्हा मध्यरात्रीपर्यंत अभ्यास सुरूच रहायचा.
अपयशाने खचून जाणार्या प्रत्येक युवक-युवतींनी नेहमी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, सलग दोन वर्षं उपाशीपोटी राहून बाबासाहेबांनी चार वर्षांचा अभ्यासक्रम केवळ दोनच वर्षांत पूर्ण केला होता. कुठलंही व्यसन नाही, कुठला शॉर्टकट नाही. केवळ संघर्ष, संघर्ष आणि कठोर संघर्ष… बस्स! हेच काय त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब होतं.
आपलं राहणीमान कसं असेल, भाषा प्रभुत्व कसं असेल या अशाही बाबींना त्यांनी त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्व दिलं होतं. पुढे विद्यार्थ्यांसमोर बोलण्याचे ज्यावेळी प्रसंग आले त्यावेळी त्यांनी भाषा प्रभूत्व आणि वक्तृत्व गुणांच्या विकासासाठी ते भरभरून बोलायचे. बासाहेबांच्या इतर विविध गुणांप्रमाणेच 'स्वच्छता' आणि 'शिस्त' या दोन शब्दांची झलक त्यांच्या प्रत्येक घटनेमध्ये, कृतीमधे प्रत्येक दिवशी सगळ्यांना दिसायची.
विद्यार्थ्य़ांना बोलतांना बाबासाहेब शेक्सपिअरच्या नाटकातील एक वाक्य नेहमी सांगायचे, प्रत्येक माणसाच्या जीवनात जेव्हा संधीची लाट येते. तेव्हा त्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग त्याने केला तर त्या मनुष्यास वैभव प्राप्त होते.
याशिवाय त्यांनी त्यांच्या जिवनात अगदी विद्यार्थीदशेपासूनच चारित्र्य या शब्दाला अधिक महत्वाचे स्थान दिले होते. ते नेहमी म्हणत की, 'माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे नाही. की माझ्याकडे देश-विदेशातल्या मोठमोठ्या पदव्या आहेत. माझे दुश्मन मला घाबरतात याचं कारण हे ही नाही की माझा विविध विषयांचा व्यासंग. वा माझे दुश्मन मला घाबरतात या मागचं हे ही कारण नाही की माझ्यामागे लाखोंचा जनसमुदाय आहे. माझे दुश्मन मला यामुळे घाबरतात की माझ्याकडे 'कॅरेक्टर' आहे, चारित्र्य आहे.
त्यांचं ग्रंथप्रेम तर सर्वश्रूत होतच, त्याकाळी विद्वान समजले जाणारे मदन मोहन मालवीय यांनी तर बाबासाहेबांना त्यांचं पुस्तक संग्रहालय मला अगदी दीड लाखपेक्षाही अधिक किंमतीत देऊन टाका म्हणून विनंती केली होती. मात्र पुस्तकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिला होता.
एकदा मनमाड येथे युवकांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, "आयुष्यात भव्य ध्येय असणे हा जीवनातील अत्यंत महत्वाचा नियम आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. जीवनात स्व:ताच्या उत्कर्षाचे वा देशाच्या उत्कर्षाचे कोणते का ध्येय असेना, ते गाठण्यासाठी मनुष्याने अष्टोप्रहर झटले पाहीजे. जगातील सर्व महान गोष्टी अखंड उद्योगशीलतेने नि हालअपेष्टांना तोंड देऊन साध्य झालेल्या आहेत. आपल्या ध्येयावर आपले शक्तिसर्वस्व केंद्रीभूत करावे."
मध्यंतरी TV18CNN-IBN यावर जगभरातून दोन कोटी पेक्षा अधिकांचं मतदान घेऊन आंबेडकरांची देशातील सर्वात महान व्यक्ती म्हणून निवड केली होती. यावरून पुन्हा सिद्ध झाले की, Dead Ambedkar is Dangerous than Alive Ambedkar.
बाबासाहेबांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी 'लंडन टाइम्स' या वृत्तपत्राने लिहीलं होतं, "ब्रिटीश सत्तेच्या शेवटच्या काळातील भारतातील सामाजिक आणि राजकीय उत्क्रांतीचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल तेव्हा त्यात आंबेडकराच्या नावाचा प्रामुख्याने निःसंशय उल्लेख होइल. निर्धार आणि धैर्य ह्या भरदार व्यक्तीमत्वाच्या महान पुरूषाच्या मुखावर कोरलेले होते."
सचिन तायडे, पब्लिक स्पिकर
sachingtayade@gmail.com