जग कोरोना विषाणुयुक्त झाले असून, या विषाणूचे पुढचे केंद्र अमेरिका असू शकते, असा इशारा डब्ल्यूएचओ किंवा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुढच्या काही दिवसांत युरोपपेक्षा अमेरिकेत जास्त रुग्ण आढळून येतील, अशी भीती डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे. गेल्या मंगळवारी अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ६३ हजार इतकी होती.
कोरोना प़ॉझिटिव्ह रुग्णाची जी नवी आकडेवारी समोर आलेली आहे, त्यात ८५ टक्के प्रकरण युरोप व अमेरिकेतील आहेत, असे डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्या मार्ग्रेट हॅरीस यांनी दिली आहे. अमेरिकेसारख्या जगातील सर्वात श्रीमंत आणि बलाढ्य देशात हे कसे काय घडू शकते? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. यावर्षी अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक असून, रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणुकीस उभे राहणार आहेत. परंतु कोरोनाबाबतच्या त्यांच्या बेफिकिरीचा फटका त्यांना या निवडणुकीत बसू शकतो.
ईस्टरपर्यंत म्हणजे १२ एप्रिलपर्यंत अमेरिकेतील जनजीवन नित्यवत होईल आणि सर्व बंधने उठवली जातील, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. परंतु तसे केल्यास, कोरोनाची महामारी वाढून अधिक मृत्यू होऊ शकतात, असे नामवंत सरकारी डॉक्टर्सनी सांगितल्यावर ट्रम्प यांनी आपला हा बेत रहित केला. आता ३० एप्रिलपर्यंत सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतराचे बंधन लागू राहणार आहे.
अमेरिकेत एक लाख किंवा त्यापेक्षाही जास्त लोक करोनामुळे मरू शकतात, अशी शक्यता खुद्द ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक अशा प्रकारची भीती व्यक्त करून जनतेत घबराट निर्माण करण्याचे कारणच नव्हते. त्यापूर्वी गेल्या रविवारी ट्रम्प म्हणाले होते की ‘ईस्टरपर्यंत सर्व चर्चेस गर्दीने फुलून जातील. अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजेस’चे संचालक अँथनी फॉसी यांनी तर, देशातील अनेक भागांतील व्यवसाय १२ एप्रिलपर्यंत नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे म्हटले होते.
आता तेच म्हणत आहेत की, विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण प्रस्थापित करता न आल्यास, दोन लाख अमेरिकन्सही मरू शकतील. न्यूयॉर्क, लुइझियाना, फ्लोरिडा, मिशिगन या राज्यांत करोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. ३० एप्रिलपर्यंत सोशल डिस्टन्सिंगची तारीख वाढवली असली, तरी अमेरिकेच्या अनेक राज्यांनी शाळा बंद करून टाकल्या आहेत. तर न्यू ऑरलीअन्स, डेट्रॉइट, मियामी, लॉस एंजलिस व इतर ठिकाणी कोरोनाबाधितांचे नवे हॉटस्पॉट उदयास येत आहेत.
अमेरिकन सिनेटमधील रिपब्लिकन पक्षाचे अनेक सदस्य लॉकडाउन लवकर संपवू नका, असे सातत्याने अध्यक्षांना आवाहन करत होते. ईस्टरपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा हेतू अर्थव्यवस्थेच्या आकांक्षांना प्रतिसाद देणे हा होता, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो, ट्रम्प यांना अमेरिकनांच्या आरोग्यापेक्षा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याची अधिक काळजी आहे.
जर देशातील नियंत्रणे उठवली, तर ते निव़डणूक हरतील, असा इशारा काही रिपब्लिकन सदस्यांनी दिल्यानंतर ट्रम्प यांचे डोळे उघडले. वास्तविक करोनाबाबत ट्रम्प प्रशासनाने सावधगिरीच्या अत्यंत कठोर उपाययोजना करणे आवश्यक होते. गेल्या २० जानेवारीला वुहानमधील आपल्या कुटुंबीयांना भेटून एक ३५ वर्षांचा माणूस अमेरिकेस परतला, तेव्हाच त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्
याचवेळी दक्षिण कोरियात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. या घटना एकाच दिवशी घडल्या, परंतु दोन देशांमधील प्रतिसांदामध्ये कमालीची भिन्नता होती. द. कोरियाने ताबडतोब देशातील वीस खासगी कंपन्यांना बोलावून, विषाणूची चाचणी विकसित करण्याचा आदेश दिला.
त्यानंतर आठवड्याभरातचच पहिली ‘डायग्नॉस्टिक’ टेस्ट संमत करण्यात आली. त्यानंतर देशभर कोरोना रुग्णांचा शोध घेऊन, त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. साडेतीन लाखांवर चाचण्या घेण्यात आल्या आणि आता पाच कोटींच्या द. कोरियात गेल्या शुक्रवारी फक्त ९१ नव्या केसेस आढळल्या.
उलट वॉशिंग्टनमध्ये पहिला रोगी आढळल्यानंतर दोन दिवसांनी ट्रम्प यांनी सीएनबीसी टीव्हीवर जाहीर करून टाकले की,
‘आमच्याकडील करोना आता पूर्ण नियंत्रणात आला आहे. चीनमधून आलेल्या एका व्यक्तीस तो झालेला आहे आणि त्याच्यापुढे काही नाही...’
वास्तविक द. कोरियाप्रमाणे सहज वापरता येणारी डायग्नॉस्टिक टेस्ट विकसित करण्याचा प्रयत्न खासगी वैद्यक कंपन्यांबरोबर सुरू करण्याचा सल्ला आरोग्य खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. हा सल्ला प्रत्यक्षात येण्यास महिनाभर लोटला.
कोव्हिड-१९च्या चाचण्या घेण्याची परवानगी अमेरिकेतील प्रयोगशाळा व इस्पितळांना देण्यात आली. करोनाविरोधी उपाययोजना करण्यास चार ते सहा आठवड्यांचा उशीर झाल्यामुळे, आज चीनपेक्षाही अमेरिकेत करोनाचा अधिक संसर्ग झाला आहे. अमेरिकेत तेराशेपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.
अमेरिकेसारख्या देशाकडून अधिक चांगले सुशासन व नेतृत्व अपेक्षित होते. चीन व अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्धाच्या परिणामी चीननेच अमेरिकेविरुद्ध करोना विषाणू सोडला आहे, अशा प्रकारचा प्रचार सध्या जगभर सुरू आहे. चीनमध्ये एकाधिकारशाही असल्यामुळे कोरोनाची खरी माहिती बाहेर आलीच नाही. चीनने जगाला ही माहिती उशिराच दिली. परंतु जगातील एका महान लोकशाही देशात, म्हणजेच अमेरिकेत प्रशासनाकडून याबाबत अधिक सतर्कता अपेक्षित होती.
बिल क्लिंटन वा बराक ओबामा अध्यक्ष असते, तर याप्रकारची बेफिकिरी निश्चितपणे दिसली नसती. या दोन्ही माजी अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा विमा हे विषय अजेंड्यावर घेतले होते. ट्रम्प हे मुळात उद्योगपती असून, त्यामुळे मानवी आयुष्यापेक्षा पैशाकडे त्यांचे अधिक लक्ष असते. या ‘मनी’वादी नेतृत्वाची किंमत अमेरिकेच्या कोट्यवधी जनतेला चुकवावी लागत आहे. जगाला उपदेशाचे पाठ देणाऱ्या अमेरिकेकडून ही अपेक्षा नव्हती.
हेमंत देसाई
hemant.desai001@gmail.com