काँग्रेसची जिंकू किंवा मरू ही भावना लोप पावलीय का? विजय चोरमारे

पुणे विभागीय शिक्षक मतदार संघ आणि नागपूर पदवीधर मतदार संघातले विजय महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारे आहेत. मतभेद गाडून एकत्र लढलो तर आपण जिंकू शकतो असा विश्वास देणारे हे निकाल आहेत, सांगताहेत विजय चोरमारे...;

Update: 2020-12-07 05:51 GMT

दोन वर्षांपूर्वी जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये सत्तांतर घडलं आणि त्या भाजपनं जिंकल्या. त्यादिवशी रात्री एका वाहिनीवरील चर्चेत काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले की, जळगावमध्ये आम्ही आधी नव्हतोच त्यामुळं तिथला काही प्रश्न नाही. सांगलीतल्या पराभवाबद्दल आत्मचिंतन करू वगैरे. वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपनं शून्यातून सत्ता मिळवली होती. काँग्रेसला मात्र शून्य कायम राहिल्याबद्दल खंत वाटत नव्हती.

आता हैद्राबादचंही तसंच आहे. गेल्यावेळी आमच्या दोन जागा होत्या, आताही दोन जागाच आहेत. त्यामुळं वाईट वाटण्याचं कारण नाही, असं काहीसं समर्थन काँग्रेसच्या काही नेत्यांकडून केलं जातंय. पण भाजपनं आपली ताकद चारवरून चाळीसच्या पुढं नेऊन दसपटीनं वाढवलीय हे ध्यानात घेतलं जात नाही. बिहारच्या नामुष्कीजनक निकलावरही काँग्रेसकडून निर्लज्ज समर्थन केलं गेलं. आम्ही लढलो त्या सगळ्या जागा भाजपच्या प्रभावाखालच्या होत्या वगैरे.

पराभवाची वेगवेगळी कारणं शोधून नेतृत्वाच्या निष्क्रियतेवर पांघरून घालण्याचे प्रयत्न करणारी जमात पुढं येऊ लागली. एकूण काय तर केंद्रीय नेतृत्वानं पक्ष वाऱ्यावर सोडला. जिंकू किंवा मरू ही भावना लोप पावून मरण्यासाठी म्हणजे हरण्यासाठीच आपण असल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ झाली. इतकी सगळी वाताहत सुरू असताना आयुष्यभर सत्तेच्या खुर्च्या उबवलेले काँग्रेसचे दिल्लीतले नेते पक्षाची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी इरेला पेटलेले दिसू लागले.

अशा सगळ्या वातावरणात पुणे विभागीय शिक्षक मतदार संघ आणि नागपूर पदवीधर मतदार संघातले विजय महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारे आहेत. मतभेद गाडून एकत्र लढलो तर आपण जिंकू शकतो असा विश्वास देणारे हे निकाल आहेत. गुजरात राज्यसभेच्या अहमद पटेल यांच्या विजयापासून गुजरातमध्ये काँग्रेसनं उसळी घेतली होती. महाराष्ट्रातील काँग्रेससाठी तशीच संधी आली आहे.

Tags:    

Similar News