चीन मधल्या साम्यवादी क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातली गोष्ट
चीनने देखील लोकसंख्या नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा चीनवर नक्की काय परिणाम झाला. भारतही आता चीनच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, अशा प्रकारे लोकसंख्या नियंत्रण म्हणजे आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला असा प्रकार आहे का? वाचा ... यांचा लेख आनंद शितोळे यांचा लेख
धान्याचं उत्पादन जेमतेम असताना चिमण्यांचा उपद्रव मोठा होता. त्यामुळे शेतकरी आणि सरकार दोन्हींना चिमण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज वाटली. मग सरकारने चिमण्या मारायला सांगितल्या. गलोल, दगड, बंदुका, बाण, सापळे वाट्टेल त्या मार्गाने चिमण्यांचा नायनाट करायची मोहीम सुरु झाली. यशस्वी झाली. नंतरच्या वर्षी धान्य चांगल आलं, सगळे आनंदी झाले.
त्यापुढच्या वर्षी वेगळीच समस्या आली. टोळ आणि वेगवेगळ्या किड्यांच्या झुंडी सुगीच्या हंगामात धान्याचा फडशा पाडायला लागल्या. या टोळ, किड्यांना खाणाऱ्या चिमण्या गायब झाल्याने त्यांना अटकाव करताही येईना.
गंमतीची बाब म्हणजे या गोष्टीपासून ना चीन धडा शिकला ना भारत ना जग. लोकसंख्या नियंत्रण कायदा कडकपणे अंमलात आणल्यावर आता चीन पुन्हा नागरिकांना मुल जन्माला घालायला प्रोत्साहन देतोय.
आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यात राजकर्त्यांना सुपीक कल्पना सुचताहेत आणि त्यानुसार बायका या फक्त पोर जन्माला घालणारी यंत्र असल्याच्या थाटात कायद्यांचे मसुदे बनवले जाताहेत.
शिक्षणाने येणारी शहाणीव माणसाला आपलं उत्पन्न किती आणि आपण लेंढर जन्माला किती घालावीत ही अक्कल देत, त्याची सोय सगळ्यात आधी, शिक्षणासोबत आरोग्यसुविधा महत्वाच्या ज्याचं पितळ कोरोनाने उघड पाडलेलं आहेच.
लोकसंख्या नियंत्रण हे केवळ लोकांच्या उस्फुर्त सहभागाने शक्य होऊ शकतं हे वास्तव स्वीकारल तर त्यासाठी मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांचे शिक्षण, त्यांना येणारी शहाणीव, जन्माला आलेल्या लेकरांच्या पोषणाची, शिक्षणाची व्यवस्था आणि त्यांच्या रोजगाराची व्यवस्था, त्या माध्यमातून ही लोकसंख्या प्रगतीसाठी वापरण्याची कल्पकता या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत.
पण या सगळ्या बाबी दीर्घकालीन उपाययोजना आहेत आणि पाच पंचवीस वर्षांची योजना आखून, आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी करण्याची बुद्धी, यंत्रणा आणि चिकाटी या कुठल्याही राजकीय पक्षाकडे सद्यस्थितीत नाहीत हे कटू वास्तव आहे. सबब हे लोकसंख्या नियंत्रण कायदे म्हणजे आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी गत होईल हे नक्की.
#आयरनीच्या_देवा
#लोकसंख्यानियंत्रणकायदे