महाराष्ट्रात 'उपमुख्यमंत्री' 'मुख्यमंत्री' का होत नाही?

पावरफुल फक्त नंबर एकचे पद असते. नंबर दोन आणि तीन झूठ आहे.. असं सांगणारं स्व. आर आर पाटील यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल आहे. राज्यात उपमुख्यमंत्री कधीही मुख्यमंत्री झाला नाही. पण आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊ शकतो असा नवा पायंडा देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिल्याचं विश्लेषण केला आहे ज्येष्ठ पत्रकार कमील पारखे यांनी..

Update: 2022-07-01 04:33 GMT

कारकिर्दीच्या एका टप्प्यावर कुठलीही व्यक्ती दुसऱ्या क्रमांकावर किंवा पदावर आली कि ती लगेच खुश होते. पण काही काळभरच. नंतर त्या उप पदावरच्या व्यक्तीचा मुख्य पदावर किंवा पहिल्या क्रमांकावर डोळा असतो. पहिल्या पदावर असलेल्या व्यक्तीची मग ही व्यक्ती स्पर्धक बनते.

महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री म्हणजे पहिल्या पदावर असलेल्या काही व्यक्ती अगदी स्वखुशीने कनिष्ठ पदांवर म्हणजे मंत्रिपदावर आलेल्या आहेत. आणीबाणीच्या काळात मुख्यमंत्री असलेले कडक शिस्तीचे हेडमास्तर शंकरराव चव्हाण इंदिराबाईंची साथ सोडल्यावर पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) सरकारमध्ये त्यांचे खूप ज्युनियर असलेल्या शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात होते.

त्यानंतर अल्पकालीन मुख्यमंत्री असलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकर, नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांनी याच क्रमाने शंकररावांचा कित्ता गिरवला. इतर राज्यांतही असे घडले आहे. शेजारच्या गोवा राज्यात डॉ. विल्फ्रेड डिसोझा आणि रवि नाईक यांच्या बाबतीत असे घडले आहे.

जगभर लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष नेता हा संभवित भावी सत्ताधारी नेता म्हणून ओळखला जातो. सत्तेच्या राजकारणात विरोधी पक्ष नेता हा दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची व्यक्ती असते. तसा सन्मान आणि तशी वागणूक विरोधी पक्षाला आणि पक्षनेत्याला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिली जाते. त्यामुळेच परदेशी राष्ट्रप्रमुख किंवा मंत्री आले तर त्यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यालासुद्धा भेटण्याचा राजकीय शिष्टाचार आहे.

भारतातील मतदारांनी देशात अधिकृत, मान्यताप्राप्त विरोधी पक्ष किंवा पक्षनेता राहणार नाही याची काळजी २०१४ पासून घेतल्याने देशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबाहेर दुसऱ्या क्रमांकाची व्यक्तीच नसल्याचे भाजपच्या पथ्यावर पडले आहे.

स्वतंत्र विदर्भाची पहिल्यांदा मागणी करणारे नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी नंतर ही मागणी लावून धरली होती. आणीबाणी संपल्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा फुटली आणि महाराष्ट्रात त्यावेळी अर्स काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा (आय) काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले.

रामराव आदिक हे दुसरे उपमुख्यमंत्री. त्यानंतर सुंदरराव सोळंके, आर आर पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार या पदावर होते.

सन १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडीत राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री पदावर होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ हे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले तेव्हा अनेक गंमतीदार घटना घडायच्या.




 


महाराष्ट्र मंत्रिमंडळाची तेव्हा दर बुधवारी बैठक व्हायची आणि नंतर सचिवाल्यायत मुख्यमंत्री या बैठकीतल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घ्यायचे. त्यावेळी या पत्रकार परिषदेत भुजबळ हजर असायचेच, इतकेच नव्हे तर काही निर्णय स्वतः जाहीर करण्याचा त्यांचा हट्टाग्रह असायचा.




 


आठ वर्षांहून अधिक मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख तसे खूप हसतमुख आणि दिलदार स्वभावाचे. ते या गोष्टी चालून घ्यायचे. प्रश्नोत्तरांच्या अनेक फेरी असणाऱ्या अशा पत्रकार परिषद आता दुर्लभ झाल्या आहेत.




 


शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांचे डेप्युटी म्हणजे उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीतही असा काही रंजक, गमतीदार गोष्टी घडायचा. त्यावेळी अनेकदा मुख्यमंत्री जोशी प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री मुंडे अध्यक्षस्थानी असायचे.





मनोहर जोशी हे विलासराव देशमुख यांच्याप्रमाणेच खुमासदार बोलण्यात आणि कोपरखळ्या देण्यात पटाईत. एकदा अशाच एका कार्यक्रमात बोलताना मुंढे यांच्याकडे पाहत ते म्हणाले, ''उपमुख्यमंत्री आणि माझ्या कार्यक्रमात कायमचे अध्यक्षस्थानी असणारे गोपीनाथ मुंडे..."

महाराष्ट्रात आतापर्यंत उपमुख्यमंत्री झालेला नेता मुख्यमंत्री झालेला नाही असे सांगितले जाते. असा दाखला नेहेमीच दिला गेल्याने त्यामुळे काहींचा हिरमोड होतो.

पण इतिहास बदलतो, पायंडे मोडून नवे विक्रम होतात. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होत नाही. मात्र मुख्यमंत्री झालेली व्यक्ती उपमुख्यमंत्री होऊ शकते असा नवा पायंडा आता देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पडला आहे.    




लेखक - कॅमिल पारखे

 


Similar News