भाजपला शिवसेना का संपवायची आहे?: प्रा. हरी नरके
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकप्रकारे खिंडीत सापडले आहेत. ज्याप्रकारे विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उघडपणे देवेंद्र फडणवीस यांच नाव घेतलं त्यावरुन भाजप शिवसेना संपवू पाहतात का? असा सवाल उपस्थित होत आहे. उत्तर जाणून घेण्यासाठी वाचा प्रा. हरी नरके यांचा हा लेख...;
प्रत्येक विचारधारेला मानणारी व्होटबँक आहे. लोकशाही, सर्वधर्म समभाव यांची जशी मोठी मतपेढी आहे तशीच हिंदुत्वाला मानणारी मतदारांमध्ये एक मोठी फळी आहे. आरएसएस,जनसंघ, भाजप हे ब्राह्मण शिक्का असलेले होते. वसंत भागवत यांनी माळी,धनगर,वंजारी (माधव) या निर्माणकार्य करणाऱ्या जातींना सोबत घेण्यासाठी गोपीनाथ मुंडे, ना.स. फरांदे आणि अण्णा डांगे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. ब्राह्मण मंडळींनी समजूतदारपणे दुसरीतिसरी जागा स्वीकारली. बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेत भाजप महाराष्ट्रात वाढला. पण जसा पक्ष मोठा झाला तसे गोपीनाथ मुंडे,फरांदे , डांगे यांना कढीपत्ता समजून वापरून बाजूला केले गेले. पुढे एकनाथ खडसे यांचेही तेच झाले. आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. माध्यमांचा व बुद्धिजीवी भाटांचा वापर करून फडणवीस म्हणजे चाणक्य अशी प्रतिमा तयार केली गेली. कोंबडी चार आण्याची पण मार्केटिंगचा मसाला बारा आण्याचा.
देवेनभाऊ छा गये. त्यांनी पंकजा आणि इतर बहुजनांचे पंख कापले. शिवसेनेला पाच वर्षे सतत अपमानित केले. भाजप कश्मिरमध्ये मुफतीसोबत युती करतो, महाराष्ट्रात अंधारात शपथविधी करते तेव्हा ती असते नैसर्गिक युती. मग मतदारांचा कौल कुठे जातो? पण तेच ठाकरे काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत गेले की महापाप.मतदार कौलाचा अपमान.
फडणवीस हे महाबोलबच्चन गृहस्थ आहेत. त्यांना तीलीत तोमय्या,आशिष शेलार, प्रवीण दरेकर,चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर आणि अलीकडे चंद्रशेखर बावनकुळे ह्या पिपाण्यांची - झिलकऱ्यांची साथ आहे. प्रचंड पैसा, केंद्रीय संस्थांचा गैरवापर, प्रशासन व निवडणूक आयोगाची मदत आणि व्यापारी नफा बघून काम करणारा मीडिया यांच्या जोरावर लार्जर इमेज मेकिंग केले गेले. हे सारे हिंदुत्वासाठी करीत असल्याचा भास निर्माण केल्याने आप्पलपोटा मध्यम व उच्च मध्यमर्गीय समाज तळी उचलून धरू लागला. बहुजन समाजाला भ्रमित केले गेले.
युतीसोबत आलेला प्रत्येक पक्ष संपविण्यात आला. आता सोन्याचे अंडे नको शिवसेनेची हिंदुत्वाची बावन्नकशी सोन्याची कोंबडीच कापून खायची हाव सुटलेल्या भाजपने इडीग्रस्त मंडळींना ५० ते १२५ खोकी मिठाई दिल्यावर ' स्वखुशीने ' ४० वीर नी नंतर १२ महावीर त्या गुहेत सुरत, गुवाहाटी, गोवा , दिल्लीमार्गे घुसले.
ही उपकृत लोकं आहेत. या लाभार्थींना सहजपणे कोपऱ्यात बसवता येईल. अडथळा फक्त प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे नी सच्चा शिवसैनिक यांचा आहे. नी म्हणून सामदामदंडभेद सगळे उपाय वापरून शिवसेना खतम करण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे. पण हा महाराष्ट्र आहे. इथे गवतालाही भाले फुटत असतात. दिल्लीश्वराचे थडगे इथे बांधले जाते.
प्रा. हरी नरके