अतिशय धोकादायक राजकारण काय असते?

राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांपासून सर्व दिग्गज नेत्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या असतील, अनेक तज्ज्ञांची विश्लेषणं ऐकली असतील...पण यासर्व गदारोळात भाजपच्या धनजंय महाडिक यांच्या विजयाचा अर्थ काय याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी...

Update: 2022-06-12 03:42 GMT

राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांपासून सर्व दिग्गज नेत्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या असतील, अनेक तज्ज्ञांची विश्लेषणं ऐकली असतील...पण यासर्व गदारोळात भाजपच्या धनजंय महाडिक यांच्या विजयाचा अर्थ काय याचे विश्लेषण केले आहे सुनिल तांबे यांनी...त्यांनी काय म्हटले आहे ते पाहूया..

"धनंजय महाडिक यांच्या विजयाचं मूल्यमापन, विश्लेषणं वाचली.

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल इत्यादींच्या प्रतिक्रियाही वाचल्या.

राजकारणी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांनी निवडणूकीच्या तांत्रिक बाबींवरच लक्ष केंद्रीत केलंय.

राजकीय पक्षांना विचारधारा असते ही बाब निवडणूकीत महत्वाची नसते असाच सर्वांचा सूर आहे.

धनंजय महाडिक यांनी २००४ ची लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढवली.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ साली ते राष्ट्रवादी काँँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत निवडून गेले. देशभर मोदी लाट असताना. म्हणजे हिंदुत्वाच्या विचारावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने मात केली (?).

२०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला. म्हणजे हिंदुत्वाच्या विचाराने फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेवर कुरघोडी केली(?) .

२०२२ साली धनंजय महाडिक भाजपच्या तिकीटावर राज्यसभेत गेले.

याचा साधा अर्थ असा की धनंजय महाडिक यांची कोणत्याही विचाराशी वा विचारधारेशी बांधिलकी नाही. तरिही मतदार त्यांना का निवडून देतात वा पाडतात?

भारतात जात हीच विचारधारा असते, राजकीय पक्ष व विचारधारा हे पोषाख असतात. हे जात वास्तव राजकीय नेते कधीही दुर्लक्षित करत नाहीत. मात्र पत्रकार आणि राजकीय विश्लेषक ते ठळकपणे मांडत नाहीत.

आयपीएलच्या सामन्यांप्रमाणे निवडणूकांकडे पाह्यलं जातंय.

आणि त्यानुसार विश्लेषण केलं जातं.

राजकीय पक्षाची विचारधारा असते. त्यानुसार धोरण व कार्यक्रम असतो.

एनआरसी, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, जातनिहाय जनगणनेला विरोध, झुंडबळी, गोरक्षकांना अभय, हिंदू-मुस्लिम दंगे पेटवणं, शेती धोरण म्हणजे शेतमालाचे भाव पाडणे, नोटाबंदीसारखे माथेफिरू निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेची धूळधाण करणे यांच्याशी लोकप्रतिनिधींचा संबंध नसतो? पक्ष कोणताही असो माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करणार, मला निवडून द्या असं सर्व कोट्यधीश उमेदवार सांगतात.

जात वास्तव आणि वर्गीय संबंध या घटकांची दखल निवडणूक विश्लेषणात न घेणं हे अतिशय धोकादायक राजकारण आहे."

Similar News