Indira gandhi : इंदिरा बांग्लादेशच्या निर्मात्या...
पाकिस्तानची फाळणी आणि बांग्लादेशची निर्मीती कशी झाली? इंदिरा गांधी यांची बांग्लादेश निर्मीतीत नेमकी काय होती भूमिका? जाणून घेऊया इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त भारतकुमार राऊत यांच्या लेखातून...;
पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेले शेख मुजिबूर रेहमान यांची १९७२ साली आजच्याच दिवशी सुटका होऊन ते मायदेशी परतले. बांगला मुक्तीची मोहिम सुफळ संपूर्ण झाली!
मुजिबूर हे बांगलादेशचे खरे निर्माता. फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान जन्माला आले खरे. पण पूर्वेच्या बंगाली भाषक जनतेला न्याय मिळालाच नाही. बंगाली लोक, त्यांची बंगाली भाषा व बंगाली संस्कृती यांची पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून उपेक्षाच होत राहिली. त्यातूनच स्वतंत्र बांगलादेशची मागणी पुढे आली.
मुजिबूर यांनी या मनामनामध्ये खदखदणाऱ्या असंतोषाचे आंदोलन बनवले. त्यासाठी त्यांनी बांगला आवामी लीगची स्थापना केली.
पूर्व पाकिस्तानात कमालीचा असंतोष निर्माण होऊन सर्वत्र हिंसक आंदोलने सुरू झाल्याने याह्या खानने मुजिबूरना अटक केली व तुरुंगात डांबले. पण आंदोलन शमले नाहीच, उलट अधिकच पेटून उठले.
तिथे चाललेल्या पोलिसांच्या दंडुकेशाहीमुळे हजारो निर्वासितांचे तांडे भारतात येऊ लागले. त्याचा बोजा भारत सरकारवर पडू लागला. त्यामुळेच तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कारवाई सुरू केली व १९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले. अखेर १६ डिसेंबर १९७१रोजी जनरल नियाझी शरण आले व बांगला देशची 'निर्मिती' झाली.
मुजिबूर मात्र कैदेतच होते. भारतानेच आंतरराष्ट्रीय दबाव आणल्यावर मुजिबूर सुटले व त्यांनी बांगला देशच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. पुढे देशाची राज्य घटना तयार झाली व मुजिबूर पंतप्रधान झाले.
१५ आॅगस्ट १९७५ रोजी बांगला देशात लष्करी क्रांती झाली. त्यावेळेस ढाक्यात मुजिबूर यांची त्यांच्या बहुतेक नातेवाईकांसह हत्या करण्यात आली. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. बांगलादेशचा राष्ट्रपितासुद्धा असाच बंदुकीच्या गोळ्यांची शिकार ठरला.
असा हा बांगला देशच्या इतिहासातील महत्वाचा दिवस आहे.
- भारतकुमार राऊत