दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा दिप सिंधू नक्की कोण आहे?: असिम सरोदे

कॅपिटॉल हिलवर हल्ला करणारे ट्रम्प समर्थक आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारे लोक यात काय फरक आहे? दिल्ली आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि ट्रम्प समर्थकांच्या मागण्या काय फरक आहे?;

Update: 2021-01-27 04:19 GMT

दोन्ही ठिकाणी झालेल्या घटनांची तुलना होतेय म्हणून हे सांगावे वाटते की, या दोन्ही ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये मूलभूत फरक आहे.

अमेरिकेच्या कॅपिटॉल बिल्डिंग मध्ये तेथील लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्ष बैठका होतात व अनेक प्रशासकीय निर्णय घेण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे आपण वॉशिंग्टन मधील या कॅपीटल बिल्डिंगला एक प्रशासकीय कारभार चालविण्याचे सरकारी केंद्र म्हणून बघू शकतो.

लाल किल्ला हा दिल्लीतील एक किल्ला आहे. जेथे 1685 नंतर तेव्हाच मुघल सम्राट वास्तव्य करीत होता. इथे कोणतेही प्रशासकीय किंवा इतर सरकारी काम चालत नाही. केवळ 15 ऑगस्ट चा झेंडा वंदन कार्यक्रम इथे होतो. खरे तर लाल किल्ल्यावर झेंडावंदन याला एक प्रतिकात्मक ऐतिहासिक मूल्य आहे इतकेच.

कॅपीटॉल बिल्डिंगवरील हल्ला हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक राजकीय सत्ताकांक्षा जोपासणाऱ्या ट्रम्प समर्थकांनी केला होता. निवडणुकीत हार झाली तरी ती मान्य न करणाऱ्या सत्तालंपट डोनाल्ड ट्रम्पने आपल्या समर्थकांना स्पष्ट भाषण दिले, भडकविले आणि त्यातून अचानक कॅपीटॉल बिल्डिंगवर हल्ला झाला. हा हमला होण्यापूर्वी तिथे अनेक दिवस लोकशाही पद्धतीने अहिंसक आंदोलन सुरू नव्हते याची नोंद घ्यावी लागते.

लाल किल्ला येथे शेतकरी मोर्चा जाणार हे नक्की झाले होते. ट्रॅक्टर मोर्चा असणार, मोर्चाचा मार्ग, वेळा सगळे पोलिसांना सांगून ठरले होते. विशेष म्हणजे तब्बल 60 दिवसांपासून अहिंसक व लोकशाही मार्गाने आंदोलन चालविण्यात येत होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे.

कॅपीटॉल बिल्डिंगवरील घुसखोरांच्या मागण्या लोकशाहीपुर्ण आहेत. असे कुणीच म्हणू शकणार नाही आणि अगदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी त्या मागण्या अवास्तव व बेकायदेशीर असल्याचे सांगितल्याचे दिसते. त्या मागण्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वैयक्तिक संबंधित होत्या व कुणीही घुसखोर त्या बाबत कायदेशीर प्रतिवाद करतांना कधी आढळले नाहीत.

प्रथमदर्शनीच डोनाल्ड ट्रम्पच्या भाडोत्री समर्थकांनी केलेली घुसखोरी चुकीची आहे व बेकायदेशीर आहे. असे अमेरिकेतील बहुसंख्य नागरिकांना व जगातील लोकांना वाटले व पटले.

शेतकरी आंदोलकांच्या मागण्या कायद्यातील तरतूदी, कायदा पारित करण्याची प्रक्रिया, कायद्याचे लाभार्थी, कायदा करण्यामागील छुपा उद्देश, कायद्याची आवश्यकता व त्यातील नेमक्या अडचणी याबाबत आहेत. दोन स्पष्ट बाजू मांडल्या जात असतांना शेतकरी आंदोलकांचे म्हणणे दमदार वाटावे. अशी कायदेशीरता त्यात दिसते. दोन्ही बाजूंचा कायदेशीर प्रतिवाद सुद्धा होतोय.

डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यक्तिकेंद्री पाठीराखे व शेतकरी आंदोलक यांची तुलना त्यामुळेच होऊ शकत नाही.

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार व्हावा, सरकार कायद्यांना स्थगिती का देत नाही? असे प्रथमदर्शनीच सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा वाटले. मग स्वतःची पंचाईत झाल्याने बेअब्रू होणाऱ्या सरकारने दीड वर्षांसाठी तीनही कायदे 'स्थगित' करण्यात येतील असे जाहीर केले. कायदा करताना सरकारच्या अनेक गोष्टी चुकल्या पण तरीही ते मान्य करायचे नाही, त्यात राजकीय अहंकार सोडायचा नाही आणि दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करतो असे जाहीर करायचे. यातील अतार्किकता समजून घेणे कुणालाही कठीण जाईल. जर तुम्ही कायद्यांना दोन वर्षे स्थगिती देण्यासाठी तयार आहात तर कायद्यात काही बदल करण्याची साधी तयारी का दाखवीत नाहीत? एखाद्या कायद्याला दोन वर्षे इत्यादी स्थगिती दिल्याचे उदाहरण इतिहासात नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांचेच केवळ समर्थक कॅपीटॉल बिल्डिंगवरील हल्ल्यात होते आणि शेतकरी ट्रॅक्टर रॅली मध्ये, लाल किल्ला येथे शेतकऱ्यांमध्ये काही लोक मुद्दाम घुसविण्यात आले हे वास्तव सुद्धा महत्वाचे आहे. ज्यामुळे आपण दोन्ही घटनांची तुलना करू शकत नाही.

यापूर्वी सुद्धा अनेक आंदोलनात आपली वेगळीच माणसे घुसवून त्याद्वारे आंदोलन उधळून लावणे, ते बेकायदेशीर ठरविण्याच्या जागा तयार करणे, आंदोलनाला देशद्रोहाशी जोडणे, देशात तशा भावना तयार करणे व IT सेल द्वारे ते पसरविणे असे भाजपच्या दोन नेत्यांनी व्यवस्थित केले आहे ही 'क्रोनॉलॉगी' लक्षात घेणे आवश्यक ठरते.

लाल किल्ल्याच्या एका पोलवर निशाणसाहिब फडकावणारा दीप सिद्धू हा पंजाबी ऍक्टर असून भाजपच्या जवळचा आहे. लोकसभेच्या गुरुदासपूर मतदार संघात सनी देओलच्या प्रचाराची धुरा तो सांभाळत होता. नवीन शेतकरी कायद्यानंतर झालेल्या आंदोलनात त्याने घुसखोरी केली. तो अतिरेकी स्वरूपाची खलिस्तानवादी भूमिका घेत असल्याचे आंदोलक नेत्यांच्या लक्षात आले. व त्यांनी त्याला दूर केले. संयुक्त किसान मोर्चानेसुद्धा त्याला त्यांचा मंच वापरण्यास बंदी घातली होती.

लाल किल्ल्यावर झालेला प्रकार आणि कॅपीटॉल बिल्डिंगवरील हमला यांची तुलना त्यामुळेच करता येत नाही. कॅपीटॉल बिल्डिंगवर हमला झाला तेव्हा तो लोकशाहीवर झालेला हमला आहे. असा ओरडा करणारे आता कुठे गेलेत ? असा साळसूद प्रश्न विचारला जातोय. म्हणून हे सगळे स्पष्टीकरण.

भारतीय तिरंगा हा देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण या तिरंग्याचा जन्म येथील लोकांसाठी झालेला आहे. तिरंगा हे महत्वाचे प्रतीक आहे. पण भारतीय माणसं, त्यांचे जीवन जगण्याचे हक्क खूप महत्वाचे आहेत. सुदैवाने शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर दुसरा कोणता झेंडा लावला नाही असे दिसते.

कॅपीटॉल बिल्डिंगवरील हमलाखोर लोकशाहीविरोधी होते आणि लाल किल्ल्यावरील हमलाखोर राजकीय पक्षाचे पाळीव विध्वंसक होते आणि त्यांनी लोकशाहीला काळिमा फसण्याचा प्रयत्न केला अशा सगळ्या कारणांमुळे कॅपीटॉल बिल्डिंग वरील घुसखोरी व लाल किल्ल्यावरील गोंधळ एकाच प्रकारचे होते असे म्हणता येत नाही.

लाल किल्यावरील घटनेला देशभक्तीचा भावनिक मुलामा देण्याची मोहीम सुरू झालेली आहे. भारतावर प्रेम म्हणजे येथील प्रत्येक माणसावर, प्रत्येक समाजातील घटकांवर, येथील नद्यांवर व पर्यावरणावर प्रेम करणे आहे. असे वाटणाऱ्या अस्सल भारतीय नागरिकांनी देशभक्तीची भावनिक फोडणी देणाऱ्यांपासून दूर राहावे.

Tags:    

Similar News