बेरोजगारांनी मोर्चा काढायला हवा का?
जातीच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात. मात्र, स्वत:च्या पोटासाठी जनता एकत्र येणार का? काय आहे देशातील रोजगाराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख;
वाईट वाटते ज्यावेळी लहानपणाचा जवळचा मित्र विचारतो. अरे तुला त्या जागतिक अर्थव्यस्वस्थेची काय पडलेली असते; कोरोनाच्या काळात आमच्या सारख्या सामान्य माणसांचे संसार आम्ही कसे सावरायचे? त्यावर लिही. वाईट वाटते त्याचा संसार आणि देशाची, जागतिक अर्थव्यवस्था कशी जैवपणे बांधलेली आहे. संसार सांभाळताना आर्थिक धोरणांवर पण नागरिकांनी मागण्या लावून धरल्या पाहिजेत. याचे ज्ञान मी इतक्या वर्षात देऊ शकलो नाही.
वाईट वाटते ज्यावेळी बहीण विचारते…अरे तू सर्वांसाठी रोजगार कसे वाढले पाहिजेत यावर काय बोलतोस; सर्व जातीतील लोक आपापल्या जातीतील तरुणांसाठी आरक्षण, विकास महामंडळ काढतात, तू आपल्या जातीतील तरुणांसाठी काहीतरी कर.
वाईट वाटते अर्थव्यस्वस्थेत एकूणच रोजगार वाढले नाहीत. तर त्या जातीआधारित आरक्षणाला काहीही अर्थ राहणार नाही, खरतर सर्वच जातीतील बेरोजगार तरुणांनी एकत्रितपणे, वेगेळे नाहीत रोजगारनिर्मितीसाठी मोर्चे काढले पाहिजेत हे मी तिला पटवू शकलो नाही.
वाईट वाटते ज्यावेळी भाऊ विचारतो अरे तुला दरवेळी त्या सेक्युलॅरिझमची पडलेली असते. हा धर्म बघ, तो धर्म बघ, त्यांच्यातील लोक कसे आपला धर्म टिकवतात; तुमच्या सारख्यांच्या मुळे आपला धर्म बुडायला लागलाय. वाईट वाटते प्रत्येक नागरिकाने त्याचा धार्मिक कट्टरपणा सार्वजनिक रित्या दाखवायला, त्याची राजकीय वसुली करायला सुरुवात केली… तर त्याची क्रिया प्रतिक्रियांची साखळी इतक्या विविध धर्म, पंथाचे लोक असणाऱ्या आपल्या देशाचा पाया उध्वस्त करेल. हे मी त्याला पटवू शकलो नाहीय.
संजीव चांदोरकर (२१ ऑक्टोबर २०२०)