आस्थेची परिक्रमा…
एखाद्या व्यक्तीच्या दुखा:ची जाणीव आपल्याला केव्हा होते? आपण अमुक अमुक आहोत आपल्याला त्यांचं काय करायचं? असा विचार करत असताना देशातील किती लोक आज उपाशी झोपले असतील? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस शिक्षण नाकारण्यांचा प्रसंग महात्मा फुलेंना लग्नामधून हाकलून लावण्याचा प्रसंग आपल्याला आठवल्यानंतर नक्की कोणत्या भावना जागृत होतात... या आस्थेचा उलगडा केला आहे. श्रीरंजन आवटे यांनी...;
मूळ मुद्दा असतो तो आपल्या आस्थेच्या परिघाचा. हा आस्थेचा परीघ आकाराला येतो आपल्या अनुभवातून, वाचनातून, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, त्यांच्या धारणा, त्यावर आपल्या प्रतिक्रिया, आपल्यावर असणारा प्रभाव अशा समग्र भवतालातून हा आस्थेचा परीघ निर्धारित होतो. जन्मतःच कुणाचाही आस्थेचा परीघ व्यापक असतो, असं नाही.
आस्थेचा परीघ विस्तारणं ही प्रक्रिया आहे. त्यासाठी व्यक्तीला स्वतःहून सक्रियरित्या काम करणं आवश्यक असतं. ज्यांना आस्थेचा परीघ व्यापक असलेली सहृदयी माणसांची फौज उभा करायची आहे. त्यांच्यावर तर आणखी महत्त्वाची जबाबदारी असते. कारण हा आस्थेचा परीघ विस्तारला तरच 'साकल्याचा प्रदेश' नजरेच्या टापूत येऊ शकतो.
आस्थेचा प्रदेश व्यापक होणं म्हणजे तरी नेमकं काय? माझ्या आयुष्यात येणा-या उभ्या आडव्या अनुभवांच्या छेदापलीकडं एक जग आहे, त्यांचीही काही सुखदुःखं आहेत हे समजावून घेता येणं. सहानुभूती नव्हे तर समानुभूती तयार होणं. सहानुभूती केवळ हळहळ व्यक्त करण्यापर्यंत मर्यादित असते. समानुभूती त्या भावनेशी नातं सांगत काही कृतीची, भावनिक समरुपतेची ग्वाही देते.
पुरुष असल्याने मला कधीही प्रसूतीवेदना अनुभवाव्या लागणार नाहीत पण तिच्या वेदनेशी नातं तयार होणं हा समभावाच्या दृष्टीचा प्रवास आहे. दक्षिण मुंबईत वाढलेल्या व्यक्तीला धारावीतच लहानाचं मोठं झालेल्या व्यक्तीचा प्रवास समजावून घेता यायला हवा आणि त्याच्या उलट अशा विलक्षण ऐषोरामात, श्रीमंतीत वाढलेल्या व्यक्तीचीही सुखदुःखं असू शकतात, हे धारावीतल्या व्यक्तीलाही कळावं. यासाठी आवश्यक असते अनुभवविश्वांची देवाणघेवाण. अर्थातच अशी देवाणघेवाण होण्यासाठीचे प्लॅटफॉर्मस, तसा अवकाश उपलब्ध असणंही गरजेचं. मग 'काटा रुते कुणाला, मज फूलही रुतावे' या ओळींचा पारंपरिक प्रेमाच्या पलीकडचा अर्थही गवसू लागतो.
उंच ठिकाणी जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा मोठा प्रदेश नजरेच्या टापूत येतो. 'स्व' केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता विस्तारतो, तेव्हा 'पॅनोरॅमिक' दृश्य आपल्या कवेत येते. यासाठी कुठल्या विशेष तज्ञतेची, अमुक वाचनाची आवश्यकता असते असं नाही.
हा मुद्दा इंटेलेक्चुअल कोशंटचा नाहीच मुळी. हा मुद्दा आहे आपल्या इमोशनल कोशंटचा, भावनिक बुद्ध्यांकाचा. भावनिकदृष्ट्या समंजसपणाचा प्रवास काही सोपा नाही. समभावाच्या दृष्टीसाठी भावनिक समंजसपणा ही पूर्वअट आहे.
अशी समभावाची दृष्टी विकसित होते तेव्हा विटाळापोटी भीमरायाला हुसकावून लावलं जातं तेव्हाची वेदना आपल्याला समजते. लग्नाच्या वरातीतून हाकलून दिल्या गेलेल्या ज्योतिबाचं दुःख आपल्या वस्तीला येतं. इंद्रायणीत बुडणारी तुकारामगाथा समजून घेताना आपले डोळे पाणावतात. वाळीत टाकलेल्या ज्ञानोबाची कथा ऐकताना जीव कासावीस होतो. पायरीवरच नाकाबंदी केलेल्या चोखोबाला पाहून हृदय द्रवतं.
माय मेली बाप मेला। आता सांभाळ विट्ठला ।।
मी तुझें गा लेकरुं । नको मजसी अव्हेरुं ।।
म्हणणा-या जनाबाईची अगतिकता समजून घेताना दुःख अनावर होतं. मग विठ्ठलही तिला कवेत घेताना म्हणतोः "जनी आपलं लेकरु । आलं वस्तीला पाखरु" जनाबाई तर आकळतेच पण सोबतच अठ्ठावीस युगांचं एकटेपण सोसणारी ऋक्मिणी उमजू लागते. भर रस्त्याच्या मधोमध उभा राहून सा-यांची खैरियत मागणा-या कबीराच्या प्रार्थना भिडू लागतात आणि वैराच्या वैराण वाळवंटात प्रेमाचं ओऍसिस दिसू लागतं.
असं सारं उमजणं – समजणं यातून आपण व्यक्ती म्हणून किती समृद्ध होतो ! स्वतःच्या आणि इतरांच्या सुखदुःखाचं सम्यक आकलन होतं. तेव्हा आपलंच जणू झाड होतं. भावनिक कोलाजानं डबडबलेलं, झुकलेलं नव्हे तर ज्या झाडाची मुळं खोल खोल शिरली आहेत आणि भावनिक विवेकी परिपक्वतेने ज्या झाडाच्या फांद्या विस्तारल्या आहेत. असं सर्वंकषता पिऊन, सारं शोषून, मातीत रोवून पण आभाळाकडं झेपावणारं असं झाड.
दुःख भराला आले म्हणजे
चंद्र नदीवर येतो
पाण्याचेही अस्तर सोलून
बिंब तळाशी नेतो
पाण्याचं अस्तर सोलत बिंब तळाशी नेणारा ग्रेसचा चंद्र आपल्या दारी येतो. तेव्हा आस्थेची परिक्रमा परिपूर्ण होते. यासाठीच तर राजप्रासादात ऐषोरामात असणारा सिद्धार्थ एका अंधा-या रात्री मानवी दुःखाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो आणि तहहयात ही आस्थेची परिक्रमा करत राहतो. अशी परिक्रमा करायला आपण सज्ज आहोत का, असा प्रश्न स्वतःला विचारत राहिलो तर समभावाचा हा प्रवास अधिक समृद्ध होईल, यात काय शंका !
-श्रीरंजन आवटे