आरक्षणाचा आणि अॅट्रॉसिटीचा राग आम्ही दलितांवर काढतो असं सांगणाऱ्या भाग्यश्री नवटाके सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहेत. नवटाके जे काही बोलल्या हे त्यांच्यावर लहानपणापासून झालेल्या कु-संस्काराबरहुकूमच बोलतायत. त्या जे काही बोलल्या हा त्यांचा कबुली जबाब मानून त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. एरवी, सोशल मिडीयावर सतत व्हायरल असणाऱ्या सरकारच्या कानावर अजून ही गोष्ट पडली नाही आणि नवटाके यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही, त्यामुळे त्यांच्या एकूण बोलण्याला सरकारचं समर्थन तर नाही ना अशी शंका उपस्थित झाली आहे.
नवटाके जे काही बोलल्या त्यात खोटं काहीच नाही. पत्रकार सुहास बिऱ्हाडे यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर एका अधिकाऱ्याचं वक्तव्य पोस्ट केलंय. बिऱ्हाडे म्हणतात की सध्या पुण्यात पोस्टींग ला असलेल्या एका अधिकाऱ्याने त्यांना सांगीतलं होतं की, एका घरात चोरी झाल्याची तक्रार आली होती. संशय अल्पवयीन मोलकरणीवर होता. ती मुलगी जयभीमवाली असल्याने तिला नागडी करून मारल्याचं त्या अधिकाऱ्याने सांगीतलं. शेवटी चोरीचा संशय असलेला मुद्देमाल त्या घरातच सापडला.
मागासवर्ग आयोगाच्या अहवालात जी आकडेवारी आलीय त्यानुसार महाराष्ट्र पोलीस दलात मराठा समाजाचं प्रतिनिधीत्व जास्त आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या तंटामुक्तीच्या प्रयोगामुळेही गावातली पाटीलकी मजबूत झाली होती. दलित-मुस्लीम यांच्या बाबत पोलीसांच्या मनात जर अशी अढी असेल तर हे राज्य नेमकं कुठे चाललंय. महाराष्ट्रातल्या पोलीस दलाचा मेंदूच जर असा सडका असेल तर या राज्यात सामाजिक सुधारणा आणि सौहार्दाची बीजे कधीच रूजू शकणार नाहीत.