ग्रामीण अर्थकारण कधी चालू होणार?.
शहरातील सर्व दुकान आता सुरु झाली. उद्योगही सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातून फळ, भाजीपाला शहरात विकण्यास येतो. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची ठिकाणं सुरु करण्यास परवानगी कधी देणार? खेडेगावातील छोट छोटे व्यापारी केंद्र कधी सुरु होणार वाचा डाॅ. सोमिनाथ घोळवे यांनी ग्रामीण भागातील प्रश्नांचा घेतलेला वेध;
गेल्या १५ महिन्यांपैकी ११ महिने ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद आहे. गेल्या ४ महिन्यांपासून ग्रामीण भागातील सामान्य नागरीकांना पालेभाज्या मिळवणे अवघड आहे. दुष्काळी आणि कोरडवाहू परिसरातील गावांमध्ये अनेक कुटुंबाच्या घरी पालेभाज्या ३ ते ४ महिन्यांपासून शिजलेली नाही. ज्या गावांमध्ये (बागायती परिसरातील) मोजकेच शेतकरी भाजीपाला पिकवतात, त्या शेतकऱ्यांकडील माल कवडीमोल भावाने शहरी-ग्रामीण भागाशी कनेक्शन असलेले व्यापारी वर्ग घेतात आणि शहरांमधील मार्केटयार्ड किंवा मंडईमध्ये आणून चढत्या भावाने विकतात हे नवीन राहिले नाही. शहरी भागात चौका-चौकात भाजीपाला मिळतो. पण ग्रामीण भागात पिकत (उत्पादन होत) असताना मिळनासे झाला आहे.
प्रश्न असा आहे की, ग्रामीण भागाने केवळ भाजीपाल्याचे उत्पादन घेणे आणि शहरांना पुरवठा करणे असे किती दिवस चालणार आहे. शहारातील मंडई / बाजार चालू. मात्र, ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद... असे का?...एका जवळच्या सामाजिक कार्यकर्त्याशी फोनवर चर्चा करताना ते म्हणाले "शहरातील माणसांना भाजीपाला-फळभाज्या खायला आवडतात आणि खेड्यातील लोकांना आवडत नाहीत. ग्रामीण भागाचे आर्थिक शोषण चालवले आहेच, शिवाय आहारावर देखील नियंत्रण आणल्याप्रमाणे चालू आहे... सकस आहार ग्रामीण भागात मिळेनासा झाला आहे"....
विक्रीच्या प्रश्नामुळे भाजीपाल्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कसा आणि कोठे विकावा?. हा प्रश्न आहेच. गावात विकायचा म्हटले तरी किती विकला जाणार… अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे ग्राहक भेटतात. मोठा शेतकरी जास्त भाजीपाला पिकवू शकतो, तसेच शहरात मार्केटयार्ड किंवा मंडईमध्ये विक्रीसाठी पाठवू शकतो. पण छोटा शेतकरी अगदी कमी क्षेत्रावर (आठवड्याचे कुटुंब चालेल ऐवढे) लागवड करतात. त्या शेतकऱ्यांकडे केवळ आठवडी बाजारात विकाण्यापुरताच भाजीपाला असतो. उदा. 2 ते 10 गुंठे क्षेत्रावर लावलेला असतो, त्यामुळे फारसे उत्पादन मिळत नाही. त्यात देखील अनेक प्रकारचा भाजीपाला लावावा लागतो.
कारण एका भाजीचा भाव घसरला तर इतर भाजीपाल्याच्या आधारे घरखर्च भागेल ही आशा ठेवलेली असते. भाजीपाल्याच्या मिळणाऱ्या पैशांवर आठवडाभर कुटुंबाला लागणाऱ्या किराणा व इतर वस्तू घेतल्या जातात. अगदी हातावरच हा भाजीपाला उत्पादन आणि विक्री व्यवसाय चालतो. तोच गेल्या वर्षभरातील ११ महिने बंद पडला आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी आठवडी बाजार चालू असणे खूप मोठी बाब आहे. आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे अर्थचक्रच बंद पडले आहे.
सद्यस्थितीत ग्रामीण भागात भाजीपाला लागवड क्षेत्र बरेच कमी झाले आहे. ही भविष्यातील खूप मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल आहे, आठवडी बाजार चालू करण्यासाठी पर्याय आहेत, ते शोधून आणि परीस्थितिनुसार पर्यायांचा वापर करून ग्रामीण अर्थचक्र चालू करणे खूप आवश्यक झाले आहे.