मनुस्मृतीमधले श्लोक खरंच स्त्रियांचा सन्मान करतात का?
मनुस्मृतीने स्त्रियांना आदराचे स्थान दिले, असे वक्तव्य महिला न्यायाधीशांनी केले आहे. त्यांच्या या मताला विरोध होत आहे. हा विरोध का आहे, मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी नेमके काय म्हटले आहे, मनुस्मृतीमधल्या श्लोकांचा अर्थ काय आहे, याचे सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे माजी राज्यकर उपायुक्त ह. आ. सारंग यांनी...;
मनुस्मृतीने स्त्रियांना आदराचे स्थान दिले, असे वक्तव्य महिला न्यायाधीशांनी केले आहे. त्यांच्या या मताला विरोध होत आहे. हा विरोध का आहे, मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी नेमके काय म्हटले आहे, मनुस्मृतीमधल्या श्लोकांचा अर्थ काय आहे, याचे सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे माजी राज्यकर उपायुक्त ह. आ. सारंग यांनी...
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती सिंग यांनी मनुस्मृतीच्या बाबतीत गौरवोद्गार काढलेले आहेत. त्या म्हणतात, "भारतीय प्राचीनग्रंथ मनुस्मृतीने स्त्रियांना समाजात आदराचे स्थान दिले". खरे तर मनुस्मृती ही संपूर्णतः विषमतेवर आधारलेली आहे. श्रेष्ठत्व-कनिष्ठत्वाच्या आधारावर उभ्या असलेल्या वर्णधर्मांवर सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि सवलती यांचे वाटप आधारित असणे मनुस्मृतीला अभिप्रेत आहे. त्यातही 'ब्राह्मणश्रेष्ठत्व' हा मनुस्मृतीचा मुख्य आधार आहे. त्याच्या खालोखाल क्षत्रियांचे महत्त्व प्रतिपादिले आहे. सत्ता, संपत्ती, सवलती व प्रतिष्ठा यांचे वाटप मुख्यत: या दोन वर्णांत होते. काही प्रमाणात वैश्यांनाही यांचा थोडाफार लाभ होतो.
स्त्री आणि शूद्रांना मात्र मनुस्मृतीने सर्व अधिकारांपासून वंचित करून पूर्णतः परतंत्र बनविलेले आहे. स्त्रिया, मग त्या ब्राह्मण वर्णातील असल्या तरी अधिकारविहीन आणि परतंत्र होत्या. ब्राह्मण असूनही त्यांना श्रुती आणि स्मृती यांचा अधिकार नव्हता. एवढेच नाही तर मनुस्मृतीने स्त्रियांविषयी इतके अवमानकारक उद्गार काढलेले आहेत की त्यासारखे उदाहरण जगात कोठे सापडेल, यावर शंका वाटावी. असे असूनही न्यायमूर्ती भारती सिंग मनुस्मृतीचा गौरव का करतात, हे समजून घेतले पाहिजे.
मनुस्मृती समजून घेताना ती संपूर्णपणे अभ्यासणे आवश्यक आहे. कोणत्याही मुद्द्याबाबतीत मनुस्मृतीचे काय म्हणणे आहे, हे तिचे संपूर्ण अवगाहन केल्याशिवाय समजणार नाही. काही मुद्द्यांबाबतीत केवळ काही सुट्या श्लोकांचे वाचन करून आपल्याला त्या विशिष्ट मुद्द्याबाबतीत या ग्रंथाचे काय मत आहे, याचे संपूर्ण आकलन होऊ शकत नाही. मग काही विद्वान असे सोयीचे निवडक वेचे घेऊन या ग्रंथाचे समीक्षण करून आपला सोयीचा दृष्टिकोन पुढे ठेऊ पाहतात. काही वाचकांचा त्यामुळे प्रामाणिक गैरसमज होऊ शकतो. भारती सिंग यांनी खरोखरच मनुस्मृतीचे वाचन केलेले असल्यास त्यांच्या वरील समजाला मनुस्मृतीच्या अध्याय 3 मधील किंवा तसेच इतर काही श्लोक जबाबदार ठरलेले असू शकतात. मी पुढे श्लोकांचा क्रमांक आणि त्यांचा वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांनी केलेला अर्थच विवेचनासाठी वापरत आहे. भाषांतराचे शुद्धलेखनही मुळचेच ठेवण्यात आलेले आहे.
"ज्या कुलामध्ये पिता, पती इत्यादिकांच्या द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात व ज्या ठिकाणी त्यांची पूजा होत नाही; तेथील देवता प्रसन्न रहात नसल्यामुळे यज्ञादि सर्व क्रिया निष्फळ होतात १६. ज्या कुलामध्ये सपिंडांतील जवळच्या भगिनी, पत्नी, कन्या, स्नुषा इत्यादि स्त्रिया दुःख भोगीत असतात तें कुल लवकरच निर्धन होते व देव, राजा, इत्यादिकांच्या द्वारा पीडा भोगतें. पण ज्या कुलांत ह्या शोक करीत नसतात तें कुल धनादिकांच्या द्वारा सर्वदा वृद्धि पावतें." (अध्याय ३, श्लोक ५६, ५७)
केवळ वरील श्लोकांचाच अर्थ लक्षात घेतल्यास आपला या ग्रंथाविषयी एक सकारात्मक भाव तयार होऊ शकतो. या श्लोकातील पूजा म्हणजे काय आणि ती का करायची? तसेच ती ज्या ठिकाणी केली जाते तेथे देवता का राहतात, या प्रश्नांची उत्तरे आपण मनुस्मृतीच्या आधारेच शोधूयात –
*स्त्रियांची पूजा म्हणजे काय?*
अध्याय 3, श्लोक 59 प्रमाणे – "यास्तव आपल्या समृद्धीची ईच्छा करणाऱ्यांनी सत्काराचे प्रसंग व उपनयनादी उत्सव यामध्ये त्यांची भूषणे, आच्छादने व अन्न यांच्या योगाने सदा पूजा करावी."
वरील शलोकावरून स्त्रियांना दागिने, वस्त्र आदी देऊन सदा खुश ठेवणे म्हणजे त्यांची पूजा करणे होय. अध्याय 9 वा श्लोक 17 प्रमाणे अलंकार घालण्याची आवड मनूने स्त्रियांच्या ठिकाणी सृष्टीच्या प्रारंभीच निर्माण केली आहे.
*अशी पूजा का करायची?*
अध्याय ३ च्या श्लोक ६२ प्रमाणे- "अलंकारादिकांच्यायोगाने स्त्री कान्तियुक्त झाली की तिचे आपल्या पतीवर प्रेम बसते व ती परपुरुष संपर्क करीत नाही.त्यामुळे ते कुळ दीप्तियुक्त होते. पण तिला संतोष नसला म्हणजे ती पतीचा द्वेष करू लागते व परपुरुषसंपर्क करिते त्यामुळे सर्व कुल मलिन होते."
मनुस्मृतीला स्त्रियांच्या चारित्र्यहिनतेवर एवढा विश्वास आहे की ती अनेकवेळा या विश्वासाचा पुनरुच्चार करते. अध्याय २ मधील १३ आणि १४ श्लोक खाली दिलेले आहेत.
"सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरुषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहत नाहीत."
मनुस्मृतीच्या स्त्रीविषयक समजाच्या पार्श्वभूमीवर आपण "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते…." या श्लोकाचा अर्थ लावणे आवश्यक आहे. स्त्रिया या मूळातच चारित्र्यहीन असतात. त्यामुळे त्यांना अलंकारादिकांनी सतत खुश ठेवले पाहिजे. अन्यथा त्या व्यभिचार करून कुल बुडवितात. त्यांना खुश ठेवले तरच त्या प्रामाणिक राहतात. आणि त्यामुळे ते कुल, धनादिकांच्याद्वारा सर्वदा वाढीस लागते. आणि अशाच ठिकाणी देवता राहतात. असा आहे, मनूच्या पूजेचा अर्थ आणि ती करण्यामागचे कारण.
मनुस्मृतीच्या अध्याय ८ मधील ४८ व ४९ व्या श्लोकांत म्हटले आहे, '..स्त्रिया व ब्राह्मण यांच्या संरक्षणाकरिता ब्राह्मणादी तिन्ही वर्णांच्या लोकांनी हातात शस्त्र घ्यावे. अशा प्रसंगी धर्मत: हिंसा करणारांस काही एक दोष लागत नाही.' ९ व्या अध्यायातील ६वा श्लोक सांगतो की " इमं हि सर्ववर्णानां पश्यन्तो धर्ममुत्तमम. यतन्ते रक्षितुं भार्याम् भर्तारो दुर्बला अपि." अर्थात पत्नीचे संरक्षण करणे हा सर्व वर्णांचा उत्तम धर्म आहे. पती जरी दुर्बल असला तरी त्याने प्रयत्नाने पत्नीचे संरक्षण करावे. (हा अनुवाद माझा आहे.) हे सुटे श्लोक, संदर्भ न पाहता लक्षात घेतले तर ते मनुस्मृतीविषयी उदात्त भावना निर्माण करू शकतात. पण मनुस्मृतीची एकंदर भूमिका पाहिल्यास आपल्या पदरी निराशा आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपणास ५ व्या व ९ व्या अध्यायातील काही श्लोकांचा विचार करावा लागेल.
"पूत्राने स्त्रियांचे रक्षण करावें त्यानंतर पतीनें त्यांचे संरक्षण करावे. व पतीच्या मागे पुत्रांनी रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास योग्य नाही." (अध्याय ९, श्लोक ३) थोडक्यात, स्त्रियाचे संरक्षण करावे, कारण त्या स्वातंत्र्यास पात्र नाहीत. याचा अर्थ त्यांना पारतंत्र्यातच ठेवले पाहिजे. त्या पारतंत्र्याचे स्वरूप मनुस्मृतीने पुढीलप्रमाणे स्पष्ट केलेले आहे.
"बाल्यावस्थेतील मुलीनें, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही गृहांतील एखादे लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करूं नये ४७. बाल्यावस्थेत पित्याच्या अधीन होऊन रहावें; तरुणपणी पतीच्या आज्ञेत असावे व पति मरण पावल्यावर पुत्राच्या संमतीने चालावें; पण स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊं नये ४८. पिता, पति किंवा पुत्र यांस सोडून रहाण्याची स्त्रीनें कधीहि इच्छा करू नये." (अध्याय ५, श्लोक ४७ ते ४९)
स्त्रिया स्वातंत्र्यास पात्र नाहीत म्हणजे काय, हे समजून घेताना मनुस्मृतीने स्त्रियांचा जो अपमान केलेला आहे, त्याने कोणत्याही संवेदनशील माणसाला दुख झाल्याशिवाय आणि या स्मृतीग्रंथाचा संताप आल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांचे संरक्षण का करायचे याची कारणमीमांसा मनुस्मृती खालीलप्रमाणे देते.
"मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर रहाणे, इकडे तिकडे भटकणें, अयोग्य वेळी निजणे व दुसऱ्याच्या गृही रहाणे ही सहा स्त्रियांकडून व्यभिचार दोष करविणारी आहेत. (वास्तव, यांपासून त्यांचे रक्षण करावे ) १३. ह्या सुंदर रूप पहात नाहीत व यांचा यौवनादि वयाविषयी आदर नसतो तर सुरूप किंवा कुरूप कसाही जरी असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्या त्यांचा भोग घेतात १४. पुरुषास पाहतांच संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे हा त्यांचा स्वभावच असल्यामुळे, त्यांचे चित्त स्थिर नसल्यामुळे व स्वभावतः त्या स्नेहशून्य असल्यामुळे त्यांचे मोठया प्रयत्नाने जरी रक्षण केले तरी व्यभिचाराचा आश्रय करून त्या पतीच्या विरुद्ध जातात. १९. हा त्यांचा स्वभाव ईश्वरसृष्ट जगाच्या आरंभापासून सिद्ध होऊन राहिला आहे असें जाणून पुरुषाने त्यांच्या संरक्षणाकरिता फार मोठा प्रयत्न करावा १६." (अध्याय ९, श्लोक १३ ते १६- वेदशास्त्रसंपन्न विष्णूशास्त्री बापटकृत अनुवाद.)
थोडक्यात, स्त्री ही मूळातच व्यभिचारी असल्याने तिचे व्यभिचारांपासून संरक्षण करायचे आहे. विशुद्ध अपत्ये व्हावी म्हणूनच पत्नीचे मोठ्या प्रयत्नाने रक्षण करावे. (श्लोक ९)
*हे संरक्षण कसे करावे?*
मनुस्मृतीने असे संरक्षण कसे करावे, याविषयीही मार्गदर्शन केलेले आहे. मनुस्मृती प्रारंभी 'स्त्रियांचे संरक्षण जोरजबरदस्तीने करण्यास कोणीही समर्थ नसतो, असे म्हणते. पुढे ती संरक्षणाचे उपाय सांगते. ते असे-
"धन संग्रह करणे, त्याचा विनीयोग करणे, द्रव्य व शरीर यांस शुद्ध करणे, पतीशुश्रुषा इत्यादि धर्म करणे, स्वयंपाक करणे व शय्या, आसन, पात्रे इत्यादि गृहांतील उपकरणांची देखरेख करणे या कामामध्ये तिला लावावे ." (अध्याय ९, श्लोक ११.)
मनुस्मृतीमध्ये आणखी काही फसवे श्लोक आहेत. "सहस्र पित्यांच्या अपेक्षेने माता श्रेष्ठ आहे" (अध्याय २, श्लोक ४५) किंवा पिता मृत्यू पावल्यानंतर पित्याचे धन मुलाबरोबर मुलीला मिळतेच ; पण मातेचे धनावर तर फक्त मुलीचाच अधिकार असतो. या श्लोकांवरून वारसाच्या बाबतीत मनुस्मृती मुलींच्या बाबतीत उदार असल्याचे दिसून येते. पण विष्णूशास्त्री बापट यांनी मनुस्मृतीप्रणित वारसांचा उल्लेख करून आपला निष्कर्ष पुढील शब्दांत व्यक्त केला आहे. " हे येथे सांगण्याचे कारण पित्याच्या धनावर त्याची पत्नी असतांनाही पुत्राचा अधिकार, त्याच्या अभावी पौत्राचा व त्याच्या अभावी प्रपौत्राचा इत्यादी स्पष्ट व्हावे हे आहे." (अध्याय ९)
मनुस्मृतीप्रणित वारसाहक्काचा कितीही विचार केला तरी पुं नामक नरकापासून पुत्रच वाचवित असल्याने या स्मृतीने अंतिमत: वारसा हक्कात मुलालाच महत्त्व दिल्याचे आढळते.
या लेखाचा उद्देश मनुस्मृतीचा अर्थ करताना काय काळजी घ्यावी हे सांगण्याचा आहे. बऱ्याच विद्वानांच्या मते मनुस्मृतीप्रणित समाजव्यवस्था भारतात कधी अस्तित्वातच नव्हती. फार मोठ्या समाजविभागाचे व्यवहार हे मनुस्मृतीच्या कक्षेबाहेरच चालत होते. यात बरेचसे तथ्य असले तरी या ग्रंथातील ही व्यवस्था सर्वांना आदर्श वाटत होती. मनुस्मृतीची तत्कालीन प्रतिष्ठा लक्षात घेतल्यास आपल्या हे लक्षात येते. तेराव्या शतकात रचलेल्या लीलाचरित्र या ग्रंथात एका चांभाराची कथा आलेली आहे. चक्रधरस्वामींच्या प्रसादाने एका चांभाराला सिद्धी प्राप्त झाली. आणि तो ईश्वरपुरुष म्हणून वावरू लागला. त्याची सर्वत्र पूजा होऊ लागली. जेंव्हा हे उघड झाले तेंव्हा अधिकाऱ्यांनी निबंध पाहिले आणि त्यानुसार त्याची शिक्षा निश्चित केली. त्यानुसार त्याला चुन्याच्या खड्यात बसवून त्यात पाणी ओतले. हा उल्लेख त्याकाळी स्मृतीग्रंथांची अंमलबजावणी होत होती, हेच दर्शवितो.
(मनुस्मृतीतील मूळ संस्कृत श्लोकांचे वेदशास्त्रसंपन्न विष्णूशास्त्री बापट यांनी केलेले अनुवाद जसे आहेत तसेच, व्याकरणासहित, या लेखात घेतलेले आहेत. )
ह. आ. सारंग, लातूर,