खेकड्यांची दुनिया व निसर्गाची मॅनेजमेंट

तुम्हाला खेकड्यांच्या जाती माहित आहे का? कोणकोणत्या प्रकारच्या खेकड्यांचा निसर्गात समावेश आहे ? त्यांचे कार्य काय? निसर्गाला ते कसे फायदेशीर आहेत? पृथ्वीवरून हळूहळू खेकडे नष्ट होण्यामागची कारणं काय? जाणून घेण्यासाठी वाचा प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक भूषण भोईर यांचा लेख

Update: 2021-06-22 05:46 GMT


या पृथ्वीवर असलेला एकूण एक सजीव पृथ्वी वरील जीवन जिवंत ठेवण्यासाठी जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आटोकाट प्रयत्न करत असतो. छोट्याश्या मधमाशी पासून व्हेल मास्या पर्यंत सर्वच !

खेकडे हे त्यापैकीच एक, उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये खेकड्यांनी खोल समुद्रापासून, अतिशय क्षारता असलेल्या खारट पाण्यापासून ते क्षारता विरहीत अगदी गोड्या पाण्याचा पर्यंतचा प्रवास केला आहे. आज त्यांची नाना विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात ह्यातील काही मंडळी नद्यांमध्ये राहतात तर काही तलावांच्या शेजारी तर काही भाताच्या शेतात, काही खाडीमध्ये राहतात जिथे गुडघाभर चिखल असतो, तर काही ब्ल्यू स्विमर, तीन ठिपक्यांचे खेकडे जातिवंत तैराक असतात, जे खाडी समुद्राच्या पाण्यामध्ये उत्तम प्रकारे पोहणारे असतात परंतु जमिनीवर आल्यावर त्यांना चालता देखील येत नाही, काही घोस्ट क्रॅब जातीचे खेकडे उत्तम धावपटू असतात जे समुद्रकिनाऱ्यावर पाण्यापासून अगदीच लांब असलेल्या वाळूमध्ये राहतात, तर काही दगडांच्या खाली राहणारे अंडाकृती दिसणारे एग क्रॅब जे समुद्रातील खडक सोडून कुठेच जात नाहीत, कोणी एक फांगडा असलेले फिडलर जातीचे खेकडे फक्त तिवरांच्या झाडांमध्ये आणि चिखल असलेल्याच जागी राहणे पसंत करतात तर काही ग्रापसिड जातीचे खेकडे तिवरांच्या झाडांवर पाण्यापासून लांब रहातात.



 

असे हे बहुरंगी बहुढंगी सुंदर खेकडे इवल्याशा हाताच्या नखाएवढ्या आकारा पासून ते अगदी दोन फुटापर्यंत मिळणारे विविध खेकडे आपण पाहिले असतीलही परंतु ही मंडळी ह्या एवढ्या विविध प्रकारच्या ठिकाणी काय करत असतात माहित आहे?

आजचा हा लेख त्या सर्व खेकड्यांना समर्पित आहे जे दिवस-रात्र एक करून समुद्र नद्यांमधील जीवन कायम ठेवण्यासाठी झटत असतात.

नदी मधील खेकडे नदीतील मेलेले मासे खाऊन रोगराई थांबवतात. काही खेकडे फक्त पावसाळी शेतात आणि वाहत्या पाण्याच्या लहान मोठ्या ओहोळांमध्ये राहणारे खेकडे ओहोळातून वाहून येणारा गाळ कचरा खाऊन साफ करतात. ह्या गाळाचे झाडांसाठी उत्तम अशा पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करतात. आणि त्यांच्या विष्टेतून ती वनस्पतींना पुरवतात. शेतात राहणारे खेकडे जमिनीमध्ये लांबच लांब बोगदे करतात ज्यामुळे शेतांमधून आणि ओहोळातून वाहणारे पाणी जमिनीमध्ये मुरते आणि त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. पावसाळा सरताना, हे खेकडे जमिनीत खोलवर बिळ खोदत जातात आणि साधारणतः एखाद मिटर खोलीवर जाऊन तिथे पुढच्या पावसाळा येईपर्यंत निद्रा घेत असतात. अशाप्रकारे शेतामध्ये खत निर्मिती करण्याचे काम तसेच जमिनीमधील भूजल पातळी वाढवण्याचं काम हे खेकडे करतात.

परंतु हे काय ? खेकड्यांवर या पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट होण्याची पाळी आली आहे ? याचं कारण सोप्प आहे. शेतामध्ये वापरली जाणारी फोरेट, युरिया इत्यादी घातक रसायने जी पाण्यात मिसळल्यामुळे हे खेकडे मरत आहेत. खेकडयांच्या नष्ट होण्यामुळे, हळूहळू जमिनीची भूजल पातळी देखील कमी होऊ लागली आहे.

नद्यांमधून शेतातून जेव्हा हे पाणी वाहत खाडी मधे येते तेव्हा पाण्यातील कचरा साफ करण्याची जबाबदारी त्यांचे दुसरे भाऊबंद निभावतात, ते असतात खाडी किनारी आणि तिवरांच्या झाडांमध्ये राहणारे फिडलर, ग्रॅपसीड, आणि मड क्रॅब जातीचे खेकडे.



 

निसर्गाची योजना पहा ! वाहून आलेल्या पाण्यातील खूप मोठा गाळ तिवरांच्या वनात अडकतो आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव वाढायला लागतात आणि या वनांमधील जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण सूक्ष्मजीव प्राणवायू घेत असल्याने कमी होते. ज्यामुळे कांदळ वनांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु प्रत्यक्षात तसे काही होत नाही कारण इथे राहणारे खेकडे ह्या गळातील बराचसा भाग खाऊन साफ करतात. ह्यागाळातून वाहून आणलेले मोठे अन्नाचे तुकडे इथे राहणारे मड क्रॅब खातात, मग त्यातून जे काही उरते ते लहान लहान तुकडे इथे राहणारे हजारो एक फांगडा मोठा असलेले फिडलर क्रॅब जातीचे खेकडे खातात, आणि झाडांवर अडकलेले गाळाचे लहान मोठे तुकडे साफ करण्याचं काम झाडांवर राहणारे ग्रॅपसीड जातीचे खेकडे करतात, आणि ह्यातून अगदी लहान लहान जे गाळाचे तुकडे उरतात ते खाण्याचे काम ह्या तिन्ही खेकड्याची लाखो करोडो पिल्ले करतात. ह्या सर्वांमुळे कांदळ बनात अडकलेल्या कचऱ्याचे तसेच कांदळवनात झालेल्या पानगळी च्या कच-र्याची खेकडे विल्हेवाट लावतात. आणि कचऱ्यातील पोषकद्रव्ये सोप्या रुपात आणून ओहोटी बरोबर समुद्रास देतात. परिणामी समुद्रात पोषद्रव्ये पोहोचल्याने वनस्पती प्लवकांची निर्मिती होते जे पुढे लहान लहान मास्यांच्या पिल्लांचे खाद्य बनते.

कांदळ बनात राहत असलेले लहान-मोठे खेकडे हजारो-लाखो बीळे खोदतात, ज्या मुळे हवा खेळती राहते आणि प्राणवायू कमी असलेल्या कांदळवनातील जमिनीत मुबलक प्राणवायू उपलब्ध करण्याचं काम हे लहान मोठे खेकडे करतात, ज्या मुळे प्राणवायू मिळाल्यानंतर हा जैविक कचरा विघटन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची देखील उत्पत्ती होणे सहज होते आणि कांदळवनाला खेकड्याच्या बिळांमधुन प्राणवायू देखील मिळतो ज्याने वन वाढू लागते. ज्या मुळे येथील जमिनींची धूप थांबते, शहरे गावे त्सुनामी आणि इतर नैसर्गिक आपदांपासून बचावण्यासाठी मदत होते.

पण बदल्यात आपण ह्यांना काय देतो??? कोळंबी प्रकल्प बांधून त्यांचे अधिवास (घर) हिरावून घेतो, ज्या मुळे निसर्गतः काही न करता समुद्रात करोडो अब्जो कोळंबीच बीज आणि इतर मासे तयार होण्यासाठी आवश्यक असणारे कांदळवन आपण वाढू देत नाही, तिथे असे प्रकल्प टाकतो, ज्यातून व्हाईट स्पॉट सारखे आजार समुद्रात पसरतात आणि समुद्रातील जीवन नष्ट करतात काही वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्यात कोळंबी प्रकल्पा मधूनच हा आजार समुद्रात पसरला होता ज्या मुळे समुद्रातील टायगर प्रॉन जातीची कोळंबी अगदी नामशेष झाली आहे. तर कुठे बोईसर नवापूर सालवड इत्यादी ठिकाणी केमिकल युक्त प्रदूषित सांडपाणी, कंपनीतील केमिकल युक्त गाळ येथे आणून टाकला जातो, ज्या मुळे असे कित्येक खेकडे मरत आहेत, आणि ते नसल्या मुळे कांदळवने, समुद्रसंपदा वाढवणे आणि निरोगी राहण्याचे काम करू शकत नाहीत, तसेच खेकडे नसल्या मूळे अशा ठिकाणी असलेल्या कांदळवनांची वाढ खुरटते.

कांदळबनातून पाणी जेव्हा समुद्राला येऊन मिळते तेव्हा तिथे वाळू मध्ये राहणारे लहान-लहान सॅड बबलर जातीचे खेकडे आलेला गाळ साफ करतात, मोठे तुरुतुरु पाळणारे घोस्ट क्रॅब जातीचे खेकडे समुद्रातून वाहून आलेला गाळ खाऊन फस्त करतात. तर कुठे खडकाळ समुद्रकिनारी दगडांच्या फटिंमधे अडकलेला गाळ साफ करून खडकाळ किनारे स्वच्छ ठेवण्याचं अनमोल काम तिथे राहणाऱ्या खेकड्याच्या आणि गोगलगायी च्या जाती करत असतात.

यापुढे कधी समुद्रावर जाल तर ह्या छोट्याश्या जीवाना आपुलकीनं नक्की बघा,जमल्यास कांदळ बनात अडकलेले प्लास्टिक साफ करा ज्यामुळे ही वने निरोगी राहतील आणि समुद्र निरोगी राहील.

प्रा. भूषण भोईर,

सहाय्यक प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग,

सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर,

८२३७१५०५२३

Similar News