अलीकडे मारुती भीतीदायक बनवला जाऊ लागला आहे का?
सध्य़ा हनुमान चालीसावरुन वाद सुरू आहे. त्याआधी हनुमान जयंतीला काही ठिकाणी झालेल्या भक्ती प्रदर्शनावरुनही बरीच चर्चा झाली. पण या सर्व वादात देवांनाच भीतीदायक बनवले जाते आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे, मिलिंद धुमाळे यांनी....;
त्या' मंदिरातला मारुती कधीही उपद्रवी, भीतीदायक वाटला नव्हता, मात्र अलीकडे हा मारुती भीतीदायक बनवला जाऊ लागला आहे. तो चुकीच्या लोकांच्या तावडीत सापडला असं जाणवतं असल्याचे का वाटते आहे, यावर मिलिंद धुमाळ यांनी परखड विश्लेषण केले आहे.
"मी घाटकोपरला जिथं राहत होतो,त्या आमच्या घरासमोर एक मोठं हनुमान मंदिर आहे.(आजही)अगोदर ते लहान होतं. कमरेइतकं,एकाला ती मोक्याची जागा वाटली.जो आमच्या इथे राहायला देखील नव्हता,म्हणजे स्थानिक त्याने कुठूनतरी निधी गोळा केला आणि मंदिर मोठं केलं.तो त्याच्यावर अधून मधून हक्क सांगतो,मात्र आम्ही म्हणजे स्थानिक जास्त दाद देत नाही.आमचं बालपण त्याच्या अवती भवती गेलं,अगोदर मंदिर लहान होतं तेव्हा मैदान मोठं होतं. पकडा पकडी,भोवरा,गोट्या ,शिग रूपारूपी, असले खेळ आम्ही तिथं खेळत असू. नंतर मंदिर मोठं झालं खेळाची जागा कमी झाली.बाजूने मोठे संरक्षक कठडे बांधले गेले. आम्ही मग त्याच्यावर पकडा पकडी उड्या मारणे असे खेळ खेळत असू,आबाधूबी प्लॅस्टिकच्या बॉल ने मारणे निंगोरच्या वगैरे खेळ असायचे. संध्याकाळी अंधार पडू लागता त्याच कठड्यावर आमची गोलमेज परिषद भरत असे,कित्येक तास आमचा तिथंच जात असे.आई जेव्हा जेवायला बोलवायची तेव्हाच तिथून उडी मारून मी घरात अंगणात यायचो कधी.एवढं जवळ होतं.आम्ही सर्व जातीय मित्र तिथं पडलेले असायचो.मंदिर तसं दृशस्वरूपात नावाला होतं.आजूबाजूचे शेजारी म्हणजे मित्रांचे वडील धार्मिक ते शनवारी तेल नारळ तिथं वाहायचे आम्ही नारळाचा प्रसाद खायला सगळे असू. कधी बाहेरचे लोक येवून नारळ फोडून प्रसाद देऊन जात..आम्हाला त्यात कधीही वावगं वाटलं नाही.वर खंडोबाच्या डोंगरावर वस्तीला असणारे एक बुवा आहेत,त्यांच्या कुणी नातेवाईक आमच्या शाळेत शिपाई होत्या. बहुतेक खरे बाई म्हणून.त्यांच्या मते हे हनुमान मंदिर नसून शनी मंदिर होतं. अर्थात या माहितीने आम्हाला काही फरक पडण्याची शक्यता नव्हती. मंदिर लहान होतं तेव्हा मसाला वाटतो तसा एक एका बाजूने निमुळता पण जाड दगड उभा केलेला आणि त्यावर शेंदूर फासलेला आणि मंदिर मोठं बांधून काढल्यावर कुणीतरी एक छोटी हनुमान मूर्ती त्याला जोडून उभी केलेली म्हणून ते हनुमान मंदिर मानलं जाऊ लागलं.पुढे आम्ही जरा मोठे झालो.आमच्याकडे सोलापूरचे धनगर लोक जास्त संख्येने राहायला आले.त्यांचा मुख्य व्यवसाय जाड मीठ विकणे,त्याच्या पाट्या घेऊन ते फिरत. सोलापूरहून असे अनेक लोक आमच्या इथं राहायला आलेले. खानावळी राहून ते गावाकडं पैसे पाठवत.या मिठासाठी मोठ्या गोण्या येत त्यावर आम्ही उड्या मारत असू.माझा एक बालमित्र कृष्णा पालवे तोही धनगर समाजाचा सोलापूरचा त्यामुळे सोलापूरशी माझं आणखी वेगळं नातं राहिलं.तो पुढे निरंकारी समुदायाच्या नादी लागला.आम्हाला येता जाता महाराज बोलायला लागला मग त्यालाच लोक महाराज बोलू लागले.तर हे सगळे मग हनुमान जयंतीला लेझिम खेळू लागले.त्यांच्यामुळे मंदिरात हनुमान जयंती साजरी होऊ लागली.खरतर आमच्यापैकी जरी मराठा चर्मकार ओबीसी आंबेडकरी अशी विविध सामाजिक घटकांची मित्रांची जंत्री असली तरी आम्हाला हनुमान जयंती साजरी केली पाहिजे असं कधी वाटलं नव्हतं.त्या निमित्ताने हे लोक मंदिराची रंग सफेदी करत वर्गणी काढत,संध्याकाळी प्रसाद वाटला जाई. सुंठवडा असं त्याला नाव होतं.त्यांचा टक्का वाढत होता.मग आम्हाला असुरक्षित वाटू लागलं,ते लोक गावाकडे राहणारे असणारे जवळपास तीस चाळीस इथं भाड्याने राहणे खानावळीत जेवणे आणि झोपायला मंदिराच्या छोट्या पटांगणात असे सुरू असायचे आम्हीही मग मंदिरात झोपायला सुरू केलं,आमच्यातील एक चर्मकार मित्र तर स्पष्टपणे म्हणाला की हे सगळं आपण लहानपणापासून जपलंय वाढवलं आपणच इथं परके ठरू लागलोय आता आपल्याला इथं वावर वाढवला पाहिजे,हे घडेपर्यन्त जात धर्माचा कधीही मुद्दा आला नव्हता,कोणत्याही प्रकारे अनुभव नव्हता. परंतु तशा काही वेगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या,आम्ही बसायचो तिथं कधी कुणी हटकायचे आवाज करू नका वगैरे मुलांचे खेळणे कमी झाले. मंदिर अगोदर उघडं असायचं त्याला दार नव्हतं.आमचा सगळीकडे मुक्त वावर असायचा,ते दार लावून नंतर टाळा लावण्यात आला.आमचा वावर सगळीकडून कमी होत गेला.हनुमान जयंतीला मोठा स्पीकर लावून आमच्याच घराच्या दिशेने तो फिरवण्यात आला त्याचा आवाज एवढा होता की आम्ही घरात काय बोलतोय तेही ऐकायला येत नव्हतं.मग मी जाऊन तो स्पीकर फिरवला.आणि एम्प्लीफायरचं बटन फिरवलं आवाज कमी केला.एकजण हटकायला आला मी म्हणालो आम्हाला ऐकायला येत नाही,आवाज थोडा कमी ठेव.तो गप्प बसला.स्पीकर फिरवल्याने फार फरक पडला नाही,पण त्यातल्या त्यात ठीक वाटलं,तसं दिवसभर मग म्हणजे आमच्या परीक्षा असतानाही स्पीकर सुरू असायचा आम्ही मित्र मग पुन्हा आवाज कमी ठेवा म्हणायचो.ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा सगळ्याच बाबतीत आहे.आम्ही तिथले स्थानिक असल्याने आणि तिथ आपलं बालपण गेल्याने आमच्यासाठी आमच्या मनात मंदिर परिसर एक वेगळी जागा होती,एवढं असूनही आम्ही कधी पाया पडलो नाही ना कधी कसला उपवास, ना काही पण हे सगळं आमचं आहे असं वाटत राहायचं आम्हा मित्रांना त्यात एक आश्वासकता होती.आम्ही सर्वधर्मीय मित्र एकोप्याने वाढलो. तिथं खेळण्यापासून बसण्यापासून आमच्या पालकांनी कधी आम्हाला हटकलं नव्हतं,ती आमच्यासाठी हक्काची सार्वजनिक जागा होती.आहे.या मंदिरातला मारुती कधीही उपद्रवी भीतीदायक वाटला नव्हता मात्र अलीकडे हा मारुती भीतीदायक बनवला जाऊ लागला आहे. तो चुकीच्या लोकांच्या तावडीत सापडला असं जाणवतं.त्याच्या नावाने हिंदुत्ववादी नवीन दुकान सुरू झालं आहे. जे सामाजिक एकोपा नष्ट करायला लागलं आहे.हनुमान खरच असता तर त्याची पहिली गधा अशाच लोकांच्या डोक्यात पडली असती."