"ऑनलाईन परीक्षेचा सोलापूर पॅटर्न"

काय आहे ऑनलाइन शिक्षणाचा सोलापूर पॅटर्न? एखादी गोष्ट समजून न घेता राजकीय विरोध केल्यास त्याचे त्या राज्यावर कसा परिणाम होतो? काय आहे राज्यातील परिक्षेची स्थिती? ठाकरे सरकारला राज्यात परीक्षा घेण्यात अपयश आले आहे का? वाचा तुषार कोहळे यांचा लेख;

Update: 2021-01-05 03:03 GMT

Social media

कोरोना संकट काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांनी घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेमुळे विद्यार्थ्यांची दाणादाण उडून गेली होती. याला विद्यार्थी जबाबदार नव्हते, तर त्या त्या विद्यापीठांचा ढिसाळ कारभार व राज्य सरकारची बदलती धोरणे जबाबदार होती. त्यामुळे गेले सत्र शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत वाईट होते. मात्र, आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठातून ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात एक गोड बातमी आली.

सोलापूर विद्यापीठाने सत्र २०२०-२१ च्या होकेशनल कोर्सच्या ऑनलाईन हिवाळी परीक्षांना आजपासून सुरवात केली. जेथे महाराष्ट्रातील इतर काही विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेचा घोळ अजून संपला नाही, त्या काळात सोलापूर विद्यापीठाने चालू सत्राच्या परीक्षा सुरू करून बाजी मारली. शेवटी विषय हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा असतो, एकदा का विद्यार्थ्यांच्या हातून संधी व वेळ निघून गेली तर झालेल्या नुकसानाची परत भरपाई करता येत नाही.

२०१९-२० या शैक्षणिक सत्रात अशा अनेक विद्यार्थ्यांच्या संधी हातातून निघून गेल्या, त्यामुळे यावेळेस वेळेत परीक्षा सुरू केल्यामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे येथे आवर्जून कौतुक करायला पाहिजे.

सत्र २०१९-२० या वर्षाचे शैक्षणिक प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला मोठे अपयश आले. शैक्षणिक क्षेत्रातील सरकारच्या कारभारातील हा गोंधळ अजून ही सुरूच आहे. त्याचा थेट फटका नववी पासून तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील जवळपास ५० लाख विद्यार्थ्यांना बसत आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातून व विशेषकरून अंतिम वर्षाच्या परीक्षेतून विद्यार्थ्यांचे भविष्य ठरत असते, पण विद्यार्थ्यांची ही परीक्षा घ्यायला राज्य सरकार तयारच नव्हते.

नीट व जेईईची परीक्षा घ्यायला तर युवासेनेनेच विरोध केला होता, राज्य सरकारने देखील परीक्षा होणार नाही अशीच भूमिका घेतली होती. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते. महाराष्ट्र व पश्चिम बंगाल ही दोन प्रमुख राज्य होती. जे परीक्षा घेण्याचा विरोध करत होती. त्यामुळे याचा विरोध राजकीय वाटत होता. इतर क्षेत्रात राजकीय विरोध मुळे नुकसान झाले तर मागे पुढे त्याची भरपाई करता येऊ शकते , मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर त्याची भरपाई होत नाही. हे राज्य सरकारच्या लक्षातच आले नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर नीट व जेईईची परीक्षा घ्यावी लागली.

आधीच संभ्रम व गोंधळी परिस्थिती मुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नीट अभ्यास करायला वेळ मिळाला नसल्याने देश पातळीवरच्या या निकालात महाराष्ट्राचा टक्का घसरला. अनेक विद्यार्थ्यांना याचा आयुष्यभराचा फटका बसला. ज्या प्रकारे कृषी प्रश्न हाताळतांना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी हट्ट धरला नाही किंवा कृषी मंत्री म्हणून दादाजी भुसे यांनी निर्णयात लुडबुड केली नाही. शरद पवारांनी ते प्रश्न नीट हाताळले. त्यामुळे कृषी क्षेत्रात अडचणींचा सामना करतांना राज्य सरकारला यश आले तसे मात्र शिक्षण क्षेत्राबाबत असे घडले नाही.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी परीक्षा निर्णय प्रक्रिये सतत लुडबुड केली, त्यामुळे गोंधळात अधिक भर पडत गेली. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धाडसी निर्णय घेत मेडिकलच्या परीक्षा घेऊन दाखवल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या नाही तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना पदवी मिळणार नाही. पदवी नाही तर डॉक्टरांना प्रॅक्टिस व नोकरी करता येणार नाही. याचे गांभीर्य डॉक्टर असल्याने अमित देशमुख यांना माहीत होते, त्यामुळे त्यांनी परस्पर निर्णय घेत परीक्षा घेतल्या. हे धाडस उदय सावंत यांना पण दाखवता आले असते.पण त्यांनी ते धाडस व चातुर्य दाखवले नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत गेली.

मात्र, अशा चुका या २०२०-२१ या नवीन सत्रात राज्य सरकार करणार नाही अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने मागच्या २०१९-२० सत्रात ऑनलाईन परीक्षांसाठी काय नियोजन केले, याचा अभ्यास जरी केला तरी इतर विद्यपीठांच्या परिस्थितीत खूप सुधारणा होईल. सोलापूर विद्यापीठ हे महाराष्ट्रातले एकमेव विद्यापीठ होते ज्यांनी अंतिम वर्षा परीक्षा सह इतर सर्व वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने यशस्वी करून दाखविल्या, त्यात ७० हजार विद्यार्थ्यांनी अडीच लाख पेपर ऑनलाईन पद्धतीने घेतले. इतर विद्यापीठांनी फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यात ही अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई सह इतर विद्यापीठात परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना जो त्रास झाला तो सर्वांना माहीत आहे.

सोलापूर विद्यापीठासाठी आयसिटीआरडी ( इंडियन कौन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट) या संस्थेने ऑनलाईन पद्धतीचे परीक्षा घेण्याचे काम केले. आयसिटीआरडी यांना आधीच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा अनुभव असल्याने आपत्कालीन परिस्थिती नीट हाताळली. सर्व परीक्षा व्यवस्थित व विद्यार्थी पूरक व्हाव्या यासाठी त्यांनी टेक्निकल गोष्टीवर विशेष काम केले होते. सर्व्हर डाऊन होणार नाही. यासाठी अतिरिक्त सर्व्हरचा वापर केला. त्यामुळे आम्हाला परीक्षा घेतांना कोणताही अडथळा आला नसल्याचे केतन मोहितकर यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलतांना सांगितले. १५ जानेवारी पासून सोलापूर विद्यापीठ आपल्या इतर अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू करणार असल्याचे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

कोरोना संकट परिस्थितीत पुढील काळात सुधारणा झाली नाही तर या वर्षीच्या सत्र २०२०-२१ साठी पण १० वी, १२ वी, पदवी व पदवीत्तर सह इतर अभ्यासक्रम पकडून जवळपास ५० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रभावित होणार आहे. त्या हाताळतांना राज्य शासनाला व विद्यापीठ प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागेल. काही ठिकाणी तर अजून प्रवेश प्रक्रियाच पूर्ण झाली नाही, त्या विद्यार्थ्यांचे सत्र सुरू कधी होईल? त्यांच्या परीक्षा कधी होईल? याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. इतर राज्यातील विद्यापीठांनी, सीबीएसई ने आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या त्यामुळे त्यांचे विद्यार्थी अभ्यासाला लागले. विद्यापीठांनी व राज्य सरकारने आपल्या १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्या तर विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करायला सोपे जाईल. एकदा राजकीय नुकसान झाले तर ते मागेपुढे भरून काढता येते, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर ही न भरून निघणारी गोष्ट असते. हे सर्वांनीच लक्षात ठेवायला पाहिजे.

Tags:    

Similar News