कोरोनाचा नवा 'अवतार': आहे कोण हा?
कोरोना विषाणूचा नवा अवतार( म्युटेशन व्हेरिअन्ट) ब्रिटनमध्ये दाखल झाला आणि पुन्हा "हा विषाणू एकदम डेंजर आहे पासून आता लस यावर काम करेल की नाही" थेट इथपर्यंत बातम्या,चर्चा सुरु झाल्या. पुन्हा पॅनिक मोड ऑन होण्याचे चान्सेस दिसत असतांनाच याविषयावर लिहिण्याची संधी सानिया भालेराव यांना मिळाली...;
कोरोना विषाणूने गेले कित्येक महिने जो धुडगूस घातला आहे त्याचे आपण सगळेच प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. साधारण डिसेंबर २०१९ मध्ये या विषाणूने जी एंट्री घेतली ती होतीच मोठी धडाकेदार. त्यानंतर हा विषाणू उच्छाद मांडत राहिला आणि संपूर्ण विश्व त्याच्यापासून आपला बचाव कसा होऊ शकेल, त्याला रोखण्यासाठी कोणती औषधं आणि उपाय योजना करता येईल यासाठी कामाला लागलं. आता जवळपास एक वर्ष होत आलंय आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली भीती काही अंशी कमी झाली आहे. अंतर -भानाचे सर्व नियम पाळले असता, योग्य ती स्वच्छता पाळली असता कोरोनापासून आपण बचाव करू शकतो हे आपल्याला आता ठाऊक आहे. कोरोना झाल्यास योग्य वैद्यकीय सल्याने, उपायाने त्यातून सुखरूप बाहेर पडणं शक्य आहे हे आपल्याला आता समजलं आहे. कोणताही सायंटिफिक बेस नसणाऱ्या बातम्या, फॉर्वर्डेड मेसेज यांच्याकडे दुर्लक्ष करायला आपण सगळेच शिकतो आहोत.
आता तर कोरोनाची लस सुद्धा तयार झाली आहे आणि लसीकरणाला सुरवात देखील होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन एक दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सापडला, कोरोना विषाणूमध्ये नवीन प्रकारचं म्युटेशन( उत्परिवर्तन) झालं आहे, अशी बातमी झळकली आणि पुन्हा गेल्या वर्षभरात लगेचच पॅनिक व्हायचं नाही हे आपण जे शिकलो आहोत ते विसरून लोक पुन्हा पॅनिक मोडमध्ये जायला लागले आहेत. कोरोना विषाणूंसोबतच्या या वर्षभराच्या प्रवासात एक गोष्ट जी मला स्वतःला महत्वाची वाटली आहे ती म्हणजे कोणत्याही ऐकीव बातमीवर लवकर रिऍक्ट न करता, त्याबाबत अभ्यासपूर्वक दृष्टिकोन ठेवून त्यामागचं विज्ञान समजावून घेऊन, परिस्थितीचं गांभीर्य खरंच किती आहे हे ठरवणं. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण विषाणूमध्ये होणारं म्युटेशन असतं तरी काय, ते का होतं, तसं झाल्यास आजार पसरवण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो आणि त्यामुळे या आजारावर तयार करण्यात आलेली लस निकामी होते का, हे थोडक्यात आणि शास्त्रोक्त पद्धतीने बघू.
माणसाच्या शरीरात शिरणं, त्याच्या प्रतिकार क्षमतेवर हल्ला करून त्याला गारद करणं हे लक्ष्य असलेले आणि यासाठी स्वतःमध्ये जमेल ते बदल करणारे अत्यंत खोडकर आणि कुख्यात जीव म्हणजे विषाणू! त्यात SARS COV २ म्हणजेच कोरोना विषाणू हा ज्या विषाणूंच्या कुटूंबामधून येतो त्यातले सदस्य म्हणजे ,वेळोवेळी स्वतःमध्ये म्युटेशन घडवून आणणारे महारथी. म्युटेशन (उत्परिवर्तन) म्हणजे काय असतं नक्की? तर विषाणूंमध्ये सुद्धा जेनेटिक मटेरियल असतं. त्यानुसार त्याचं डीएनए आणि आरएनए विषाणू असं वर्गीकरण केलं जातं. हे जेनेटिक मटेरियल म्हणजे न्यूक्लिओटाइड्सची विशिष्ट क्रमाने लावलेली रांग. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास चार अमिनो ऍसिड्सचे ठोकळे एका विशिष्ट क्रमात जोडले की या विषाणूंचा जीनोम तयार होतो. समजा हे चार ठोकळे आहेत अ, ब, क आणि ड. तर जेव्हा "अ" ला दिलेली जागा उडी मारून "ड" पटकावतो तेव्हा या ठोकळ्यांचा क्रम बदलतो आणि त्यामुळे या विषाणूच्या जीनोमवर परिणाम होतात. हा क्रम बदलणं म्हणजे म्युटेशन.
आता तुम्ही म्हणाल हा विषाणू जर धडधाकट आहे, व्यवस्थितरित्या आजार पसरवतो आहे तर याला काय गरज आहे म्युटेशन करून नसते उद्योग करायची? यासाठी आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे की या विषाणूचं सगळ्यात पाहिलं मिशन म्हणजे माणसाच्या शरीरात शिरणं.. सो आपण कोरोना विषाणूंचं उदाहरण घेऊया. जेव्हा कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात शिरतो तेव्हा त्याचं लक्ष असतं स्वतःची आरएनए मोकळी करणं, त्याच्या कॉपीज करणं आणि ज्या माणसाच्या शरीरात तो शिरला आहे त्याची म्हणजेच होस्टची प्रतिकार शक्ती निकामी करून आजार पसरवण. या विषाणूची आरएनए गुंडाळलेली असते एका पाकिटामध्ये. या पाकिटाचं बाहेरचं आवरण असतं ग्लायकोप्रोटीन्सचं. यामध्ये सगळ्यात महत्वाचे असतात स्पाईक प्रोटिन्स. कारण या स्पाईक प्रोटिन्सच्या साहाय्यानेच हा विषाणू आपल्या फुफुस्सामधल्या (अल्व्हीओलाय) सेल्सला चिकटतो. या सेल्समध्ये ACE २ नामक रिसेप्टर असतात ज्यांच्यावर हे स्पाईक प्रोटीन बांधले जातात. एकदा का हा विषाणू या सेल्सवर जोडल्या गेला की मग इतर संप्रेरक याच्या पाकिटाचं आवरण फोडतात आणि एंडोसायटोसीसच्या माध्यमातून कोरोना विषाणूची आरएनए आपल्या शरीरात शिरते. मग आपल्या पेशींमधल्या मशिनरीच्या सहाय्याने कोरोना विषाणू स्वतःच्या आरएनएच्या कॉपीज बनवायला लागतो आणि अशा तऱ्हेने आपल्या शरीरात हा आजार पसरतो.
आता हे वाचून आपल्याला लक्षात येईल की कोरोना विषाणूची बरीचशी मदार ही या स्पाईक प्रोटीनवर अवलंबून आहे. आपल्या सेल्समधील ACE २ रिसेप्टरच्या रचनेशी साधर्म्य साधणारा सिक्वेन्स या स्पाईक प्रोटिन्सवर आणणं हा या विषाणूचा उद्देश. याआधी म्हटलं तसं हा विषाणू आहे SARS COV या विषाणूंच्या जातकुळातला. SARS नामक हे जे फ्लूचे ( इन्फ्लुएंझा ) विषाणू असतात नं, ते फार बदमाश असतात. होतं काय की जेव्हा हे विषाणू आपल्या शरीरात शिरतात तेव्हा आपली प्रतिकार शक्ती सुद्धा काम करतच असते. ती या विषाणूंच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करायला सुरवात करते आणि मग फुफुस्सामधल्या ACE २ रिसेप्टरशी स्पाईक प्रोटिन्सची बाइंड करण्याची क्षमता कमी होते आणि हा विषाणू निकामी पडायला लागतो. आता सर्व्हायव्हल इंस्टिक्टनुसार हा विषाणू आपल्या स्पाईक प्रोटिन्सच्या रचनेमध्ये बदल करायला बघतो आणि इथे वर सांगितल्या प्रमाणे तो अमिनो ऍसिड्सच्या ठोकळ्यांच्या क्रमात बदल करतो आणि स्पाईक प्रोटिन्सच्या सिक्वेन्समध्ये बदल होतात ज्यामुळे आपल्या शरीरतल्या अँटीबॉडीज आता या नवीन स्पाईक प्रोटीनला ओळखु शकत नाही आणि हा विषाणू अधिक जोमाने आजार पसरवण्यासाठी मोकळा होतो. अशा पद्धतीने स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन होतात आणि आपण नवीन विषाणूचा स्ट्रेन किंवा अवतार आला असं म्हणतो.
सो कोरोना विषाणूचा हा जो काही नवीन स्ट्रेन ( N501Y) ब्रिटनमध्ये सापडला आहे त्यात म्युटेशन हे स्पाईक प्रोटीन मध्ये झालं आहे असं तूर्तास म्हटलं जातंय . कोरोना विषाणूमध्ये आजपर्यंत जवळपास तीस ते पस्तीस छोटेखानी म्युटेशन्स झाले आहेत आणि मेजर असे म्युटेशन म्हणायचे झाल्यास ते दोन आहेत. यातलं एक म्हणजे D६१४G म्युटेशन, ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पण मोंन्टेफिऑरी ( montefiori) या ड्यूक विद्यापीठातील एड्स रिसर्च इन्टिट्यूटच्या डायरेक्टर पदी काम करणाऱ्या सायंटीस्टने केलेल्या रिसर्चनुसार या म्युटेशनमुळे कोरोना विषाणूवरील परिणामकारक लस बनवणं सोपं झालं आहे.
इवान कॉल्वे (EWAN Callway) यांनी Montefiori, kober यासारख्या जगविख्यात सायंटिस्टचे कोरोना विषाणूच्या संदर्भातले रिसर्च पेपर वाचून सप्टेंबर महिन्यात नेचर या मॅगझिनमध्ये कोरोना विषाणूच्या म्युटेशन्सबाबत एक अत्यंत सुरेख आर्टिकल लिहिलं होतं. या आर्टिकलमध्ये आजवर या विषाणूने स्वतःमध्ये केलेले बदल आणि या म्युटेशन्सचा अर्थ, परिणाम यावर उत्तम रीतीने वैज्ञानिक दृष्टीक्षेप टाकला आहे. कोरोना विषाणू हा जरी स्वतःचा बचाव करण्याकरिता आणि स्वतःला अधिक स्ट्रॉंग बनवण्याकरिता म्यूटेट होत असला तरीही त्याचं प्रत्येक म्युटेशन म्हणजे मानवजातीला धोका निर्माण करेल असं नव्हे. आपण या विषाणूमधल्या इटुकल्या पिटुकल्या बदलामुळे दरवेळी घाबरून जायला नको. जेव्हा इन्फ्लुएंझा परिवारातील विषाणूंवर लस बनवली जाते तेव्हा म्युटेशन्सचा अंदाज सायंटिस्ट्ना असतोच. स्पाईक प्रोटिन्समध्ये होणारे संभाव्य बदल लस तयार करतांना गृहीत धरलेले असतात. त्यामुळे लगेचच आता या कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही.
ब्रिटन मधील या नवीन कोरोना विषाणूच्या स्ट्रेनमध्ये आजार पसरवण्याची, आजाराची लक्षण गंभीर करण्याची किती क्षमता आहे याबाबत ठोस विधान करण्यासाठी लागणार सायंटिफिक डेटा आणि अनॅलिसिस तूर्तास तरी अपुरं आहे. डिसीज स्प्रेडिबिलिटी आणि डिसीज फटॅलिटी किंवा मॉरटॅलीटी रेट या दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे म्युटेशनमुळे आजार पसरवण्याची क्षमता जरी वाढली तरीही आरोग्यावर होणारे परिणाम अधिक वाढतील, मॉरटॅलीटी रेट अधिक वाढले अस होत नाही. सार्स या कुटुंबातील विषाणू जे मोस्टली श्वसनाचे आजार पसरवतात, त्याच्यामध्ये म्युटेशन होणं ही अत्यंत नैसर्गिक आणि कॉमन बाब आहे. आणि म्हणूनच कोरोना विषाणूचा नवीन संकरित अवतार आला तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. विषाणू इव्हॉल्व्ह होत जाणं हा त्याच्या लाईफसायकलचा भाग आहे.
सायंटिफिक फॅक्ट्स चेक केल्याशिवाय कोणत्याही बातमीवर चटकन विश्वास ठेवायचा नाही, उगाचच पॅनिक मोडमध्ये जायचं नाही आणि अंतर- भानाचे नियम पाळत राहायचे हे सुजाण नागरिक म्हणून आपण करत रहायचं. या विषाणूवर अभ्यास करणाऱ्या सायंटिस्टवर, जनहितासाठी उपाय योजना करणाऱ्या आपल्या प्रशासनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. योग्य ती काळजी घेतली, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ उत्तम ठेवलं आणि सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून आखून दिलेल्या नियमांचे,सूचनांचे पालन केले आणि विज्ञानाची कास धरून उपाय योजना केली तर आपण नक्कीच यातून बाहेर पडू असा विश्वास आपण सगळ्यांनीच बाळगायला हवा.
रेफरन्ससाठी रिसर्च पेपरच्या काही लिंक्स देते आहे. अधिक जाणून घ्यायचे असल्यास त्या जरूर बघा. .
1. https://www.historyofvaccines.org/.../viruses-and-evolution
2. https://www.nature.com/articles/d41586-020-02544-6
3.https://www.healthline.com/.../what-to-know-about...
4.https://www.sciencedirect.com/.../pii/S0092867420308205
5. https://www.who.int/bulletin/volumes/98/7/20-253591/en/