मोडी लिपीतील नाणे!
मोडी लिपी म्हणजे काय? या मोडी लिपीचा मध्ययुगीन काळात कसा वापर केला गेला? मोडी लिपीचे महत्व काय वाचा आशुतोष सुनील पाटील यांचं विश्लेषण
मागील लेखात आपण संस्कृत भाषेतील नाणे पाहिले. आज मोडी लिपीतील नाणे पाहूया. मध्ययुगीन काळात मोडी लिपी ही मोठ्या प्रमाणात लिखाणासाठी वापरली जायची. मोडी लिपीत असलेले दस्त, पत्र, हस्तलिखिते आजही त्याची साक्ष देतात. शिवकाळानंतरही मोडी लिपी मोठ्या प्रमाणात वापरली गेलीच.
विसाव्या शतकापर्यंत मोडी लिपी लिखाणासाठी वापरली जायची. पण नंतर मात्र, ती बाद झाली. पत्रांवर पाहिली पण चलनात असलेल्या नाण्यावर आपण कधी मोडी लिपी पाहिलीत का ? आज आपण असेच एक नाणे पाहूया ज्यावर मोडी लिपीत अंकन आहे.
अशी काही नाणी आहेत. ज्यावर मोडी लिपीतील काही अक्षरं आपल्याला पाहायला मिळतात जसे शिवराई नाणे. शिवराई नाण्यांवरील 'राजा' शब्दातील 'रा' हा मोडी लिपीतील असतो तसेच शिवोत्तर काळातील दुदण्डी शिवराई च्या एका प्रकार 'श्री' या अक्षराच्या खाली 'सन' असे मोडी लिपीत अंकित असते. ही दोनही नाणी पाहा.
तर आता वळूया आपल्या मुख्य नाण्याकडे. हे मोडी लिपीत लेख अंकित नाणे आहे. देवास या संस्थानिक राज्याचे. देवास राज्य हे ज्युनिअर ब्रांच आणि सिनिअर ब्रांच असे दोन भागात विभागले होते. देवास राज्याच्या सिनिअर ब्रांच च्या महाराजा विक्रमसिंह पवार यांचे.
महाराजा विक्रमसिंह यांनी इ. स. १९३७ ते १९४७ या काळात राज्य केले होते. हे नजराणा प्रकारातील नाणे असून कुठल्यातरी महत्वाच्या वेळी टांकसाळीत केले असावे. कदाचित इ.स. १९३७ मध्ये राजाच्या राज्यारोहणाच्या वेळी ?
हे सोन्याचे नाणे अर्धी मोहर या मूल्याचे असून नाण्याचे वजन ५.१५ ग्राम आहे. नाण्यावर दोन्ही बाजूंनी बिंदुयुक्त वर्तुळात मोडी लिपीत लेख अंकित आहे. तो असा की पुढील बाजूवर बिंदुयुक्त वर्तुळात 'राज्य देवास/ मोठी पाती/ १९९४' म्हणजे 'हे नाणे देवास राज्याचे असून राज्याच्या सिनिअर ब्रांच कडून विक्रम संवत १९९४ (इ.स. १९३७) मध्ये टांकसाळीत केले आहे'. आणि मागील बाजूवर राजाचे नाव 'विक्रमसिंह/ पवार' असे अंकित आहे.
मोडी ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी नाणे समजावून सांगत आहे... पुढील बाजूवर पहिल्या ओळीत लाल रंगात- राज्य, निळ्या रंगात- देवास, केशरी रंगात- मोठी, हिरव्या रंगात- पाती आणि खालील निळ्या रंगात 1994 असे अंकित असून मागील बाजूवर पहिल्या ओळीत लाल रंगात- विक्रमसिंह तर दुसऱ्या ओळीत निळ्या रंगात- पवार असा लेख अंकित आहे. मला आशा आहे की आपल्याला या नाण्यावरील लेख आता पूर्णपणे लक्षात आला असावा.
हे नजराणा असून चलनात आले नव्हते. यावर कुठलेही मूल्य नाही. हे एक प्रकारचे स्मारक नाणे/ मुद्रा होते. फक्त भेट देण्याच्या हेतूने या काही मुद्रा तयार करण्यात आल्या असाव्या. मी आतापर्यंत हे एकमेव संपूर्ण मोडी लिपीतील नाणे पाहिले आहे. फारच सुंदर आणि आकर्षक असे हे नाणे आहे. आपल्याला ही थोडक्यात माहिती आवडली असेल अशी आशा. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. माहिती आवडल्यास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवत राहा.
धन्यवाद.
नाणे- todywalla auctions
- आशुतोष सुनील पाटील.