सध्या दीपावलीचा उत्सवाचा माहोल आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या खरेदीची गर्दी आहे, त्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, तोरण, आकाश कंदील आणि विजेच्या झिलमील चमकणाऱ्या माळा, नवे कपडे खरेदी अश्या यागर्दीत तुम्हाला दिवे खरेदी करत असताना एक मातीचे, प्लास्टर ऑफ परिसचे, चिनीचे असे छोटे मोठे दिवे तुम्हांला दिसतील,
दिवा हा शब्द दिव या शब्दापासून निर्माण झाला, दिव याचा अर्थ दाखवणे, दिवा जिथे कुठे असेल तो परिसर, तिथल्या वस्तूं, मार्ग आपल्याला दाखवीत असतो, मग देवळात असला कीं देव दाखवतो, रस्त्यावर असला कीं मार्ग दाखवतो आणि घरात असला कीं घर उजळून टाकतो. आता विजेचा दिवा आणि त्याचे बटन आपल्या हातात आहे त्यामुळे आपल्याला मातीच्या किंवा त्याकाळातील दिव्यांचे फार महत्व समजत नाही मात्र समुद्रात भरकटलेल्या जहाज किंवा होड्यांसाठी दिपग्रह हॆ वरदान होते आणि दिपग्रहात देखील दिवाच असे मात्र तो भला मोठा. किंवा ज्यांनी पेट्रोमॅक्स ही हिन्दीतील आदिवासी जमातीतील कहानी वाचली असेल त्याला प्रेम आणि दिवा आणि प्रेमातून परिवर्तन याची जाणीव असेल.
परत दिवाळीच्या दिव्याकडे येऊ या, दिवाळीत काही ठिकाणी राजस्थान मधील भटक्या विमुक्त जातीच्या महिला-मुले एक वेगळ्याच प्रकारचा दिवा विकताना दिसतील, त्याला हाटरी असे म्हणतात. हाट म्हणजे बाजार, हाटारी म्हणजे दुकान.
दीपावलीच्या काळात मारवाडी, सोनारा आपल्या नव्या खात्याची पूजा करून सुरुवात करतात. तसे हटरी ही पाकिस्तान येथील सिंध प्रांतातून विस्थापित झालेल्या सिंधी समाजाची परंपारा आहे. व्यापारी संस्कृतीशी संबंधित असणारा या समाजात आपल्या मुलांवर व्यापाराचे संस्कार करण्यासाठी घरातील पालक हॆ प्रत्येकासाठी एक हटरी आणून दिली जाते.
प्रत्येक मुलाला त्याची हटरी ही छान पैकी सजवावी लागते आणि घरातील मोठ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि नमस्कार करण्यासाठी जेंव्हा ही छोटी मंडळी जाते तेंव्हा मोठे त्यांना भेट वस्तू आणि पैसे देतात.
आता मात्र हटरी हा केवळ दिवा राहिला असून सिंध प्रांतातील ही संस्कृती भारताच्या फाळणीने विस्थापित झालेल्या सिंधी समाजाने आपल्या सोबत जसे त्यांचे खाण्याचे पदार्थ पाणी पुरी, कोकीं, डाल पकवान, सन्ना भजी आणली तसे दीपावलीत ही हटरी देखील घेऊन आले.
तुमच्या आसपास जर सिंधी वस्ती किंवा सिंधी कॉलोनी असेल तर तुम्हाला ही हटरी म्हणजे भला मोठा दिवा पाहता येईल. व्यक्ती ही कुठूनही कुठे स्थलांतरित झाली कीं ती आपल्यासोबत आपली भाषा, संस्कृती आणि इतिहास घेऊन जातं असते. आज जगातील प्रत्येक देशात सिंधी समाज आपल्याला पाहायला मिळतो उद्योगपती गौतम अदानी असो किंवा सिनेमातील नवा बाजीराव रणवीर सिंग असो, जुन्या जमान्यातील अभिनेत्री साधना, टूनटुन अशी काही नावे ठळकपणे समोर येतात. एका हटरी या दिव्याच्या निमित्ताने इतके आठवले.