मारुती कांबळेचं काय झालं? तुषार गायकवाड

राहुल गांधी यांचे लोकसभेतून निलंबन झाले? अदानी उद्योग समूहाचा भ्रष्टाचार लपवणे. त्याला सरकारी कंपन्या आंदण देणे हे देशप्रेम होऊ शकते का? सामना चित्रपटातील मारुती कांबळे चा काय झालं? असा प्रश्न उपस्थित करत तुषार गायकवाड यांनी केलेलं परखड विश्लेषण...

Update: 2023-03-26 09:32 GMT

७० च्या दशकात 'सामना' नावाचा एक मराठी चित्रपट भरपूर गाजला. या चित्रपटातील डॉ. श्रीराम लागू यांच्या पात्राचा एक संवाद 'मारुती कांबळेचे काय झाले?' हा सुपरहीट संवाद झाला होता. अगदी त्या काळातील मीम म्हणू हवं तर! चित्रपटाच्या कथानकानुसार चित्रपटातील खलनायक हिंदुराव धोंडे, गावातील निवृत्त सैनिक मारुती कांबळेचा रातोरात काटा काढतो. आणि मारुती कांबळे गायब झाल्याची हुल उठते. हिंदुरावची अपकिर्ती गावातील लोकांना माहीत असल्यामुळे मारुती कांबळेचा काटा हिंदुरावने काढला असणार, अशी शंका गावकऱ्यांना असते.

पण उघडपणे बोलल्यावर आपलाही मारुती कांबळे होईल. या भितीने कोणीही उघडपणे चर्चा न करता दबक्या आवाजात 'मारुती कांबळेचे काय झाले?' म्हणत चर्चा करत असतात. पण 'मारुती कांबळेचे काय झाले?' हे वाक्य हिंदुराव धोंडेच्या कानावर पडले की त्याचा तिळपापड होतो. श्रीराम लागू हाच प्रश्न हिंदूरावला विचारतात तेव्हा हिंदूराव श्रीराम लागूंचा काटा काढण्याचा प्रयत्न करतो.

त्याचप्रमाणे राहुल गांधीनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना, केंद्र सरकारला एकच महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तो म्हणजे, हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, 'अदानी उद्योग समूहात २० हजार कोटी रुपये कोठून आले? ते पैसे कोणाचे आहेत?' आता या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी केंद्र सरकार राहुल गांधींवर कारवाई करतंय! यातून अदानी उद्योग समूहात २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत हे स्पष्ट होत नाही का?

पंतप्रधान मोदी नक्की काय व का लपवत आहेत? हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी उद्योग समूहाला कोणत्याही न्यायालयात आव्हान द्यायला देखील सांगितले आहे. अदानी उद्योग समूह जर खरोखरच प्रामाणिक आहे. तर कोणत्याही न्यायालयात का जात नाही? कर नाही त्याला डर कशाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेपीसी समितीची विरोधकांची मागणी का मान्य करत नाहीत? देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आरोप झाले तेव्हा जेपीसी नेमली होती. चौकशीत काहीच निघाले नाही. तरीही २०१९ च्या लोकसभा निवडणूकांच्या प्रचारात नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधीना भ्रष्टाचारी म्हणण्याचा नीचपणा केला.

मग या न्यायाने प्रामाणिकपणाचा आव आणणाऱ्या पंतप्रधानांनी अदानीच्या समूहातील २० हजार कोटी रुपये कोणाचे हे देशवासियांना सांगायलाच पाहीजे! नाहीतर राहुल गांधींसारख्या निडर मताचे लोक मोदींना भ्रष्टाचारी म्हणतील. २० हजार कोटी मोदींचे / भाजपाचे / संघाचे आहेत म्हणतील. अशावेळी कोणाकोणावर खटले दाखल करणार?

आम्ही तर म्हणतो... सुरतच्या ज्या न्यायमूर्तींनी राहुल गांधी प्रकरणात निकाल दिला आहे. त्याच प्रामाणिक न्यायमूर्तींच्या न्यायालयात अदानी हिंडेनबर्गच्या विरोधात खटला का भरत नाहीत? २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची माहिती देशवासियांपासून लपवणे हा राष्ट्रवाद कसा असू शकतो?

भारतीय पंतप्रधानांना आपण भ्रष्टाचारी नसून फकिर असल्याचे सिध्द करण्यासाठी आयती संधी चालून आली असताना पंतप्रधान का घाबरत आहेत? जी काही ५६" दाखवायची आहे ती इथे का दाखवत नाहीत? अदानी उद्योग समूहाचा भ्रष्टाचार लपवणे. त्याला सरकारी कंपन्या आंदण देणे हे देशप्रेम कसे?

- तुषार गायकवाड

Tags:    

Similar News